Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगावातील पाणलोट क्षेत्राचे नियोजन गरजेचे

गावातील पाणलोट क्षेत्राचे नियोजन गरजेचे

रवींद्र तांबे

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली आहे. त्यामुळे देशपातळीवर या गावाचा गौरव करण्यात आला. त्यानंतर शिवणी (जालना) व निढळ (सातारा) गावांनी पाणीसंकट दूर केले. तेव्हा या गावांचा आदर्श घेऊन आपल्या गावात पाणीटंचाई होणार नाही त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने काम केले पाहिजे. यासाठी नागरिकांनी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करायला हवे.

गावांमध्ये शासकीय योजनांच्या सहाय्याने गावकऱ्यांनी पाणलोट क्षेत्राचे योग्य नियोजन केल्यास पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करू शकतात. मात्र नियोजनाच्या अभावामुळे उन्हाळ्यात गावांमध्ये पाणीटंचाईला गावकऱ्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच वेळा मे महिन्याच्या शेवटी शासन मान्यता घेऊन पाण्यासाठी कामे सुरू केली जातात. मात्र अचानक पावसाच्या आगमनाने सुरू केलेले काम वाहून गेल्याने केलेला खर्चही वाया जातो. तेव्हा आतापासून कोणत्या गावात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते त्या गावांचे सर्वे करून कोणकोणत्या उपाययोजना पाणीटंचाईवर करता येथील त्यासाठी संबंधित त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शन गावांमध्ये आयोजित करण्यात यावेत. पाणी बचतीची सवय गावातील नागरिकांमध्ये निर्माण करावी.

राळेगणसिद्धी गावाने दुष्काळ पचवून एक आदर्श गाव म्हणून देशात ओळख निर्माण केली आहे. याचा सार्थ अभिमान राज्यातील प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे. त्या दृष्टीने आपले गाव आदर्श कसे होईल त्यासाठी गावातील गट, तट बाजूला सारून गावाच्या विकासासाठी एकवटले पाहिजे. दुर्दैव असे की सध्या असे वातावरण गावात दिसत नाही. झाले असते तर आज राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली नसती. यासाठी गावातील स्थानिक नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे.

आता पाणलोट क्षेत्र म्हणजे काय हे समजून घेऊ. “ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहून वाहते. त्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.” यासाठी आपल्या गावाचे क्षेत्रफळ किती आहे. गावातील नद्यानाले किती आहेत. पावसाचे प्रमाण व प्रमुख पीक कोणते घेतले जाते. याचा विचार करून गावातील मातीची धूप कमी होण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करावे. पावसाळ्यात पाणी अडविण्यासाठी ठिकठिकाणी पक्के बंधारे बांधावेत. बऱ्याच ठिकाणी पाईपच्या सहाय्याने सांडपाणी नाल्यात अथवा नदीच्या पात्रात सोडून दिले जाते. त्यामुळे नद्यानाल्यांतील पाणी दूषित होते. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. म्हणून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा.

शासकीय मदतीने किंवा गावातील नागरिकांच्या श्रमदानातून पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले जातात. जर बंधाऱ्यातून पाणी झिरपत असेल, तर दुरुस्ती करून घ्यावी. नळ योजना असल्यास नळ किंवा पाइप गळती चालू असेल तर पाणी वाया जावू नये म्हणून त्याची दुरुस्ती करून घ्यावी. पाण्याच्या टाकीतील गाळ काढावा. नवीन विहिरींचे बांधकाम त्याचप्रमाणे जुन्या विहिरीमधील गाळ काढून स्वच्छ करावे. अडविलेल्या पाण्याचा नागरिक व पाळीव प्राण्यांसाठी योग्य वापर करावा. पाणी दूषित होणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी घ्यावी. त्याचप्रमाणे पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. स्वच्छतेत देशात नंबर वन असलेल्या कोकण विभागात पाहा ना, बसने कोकणात जाताना उजव्या बाजूला पाणी दिसते. पावसाळ्यात तर सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो, हे जगजाहीर आहे.

नद्यानाले तुडुंब भरून वाहत असतात. सध्या नद्यानाले कोरडे झालेले दिसत असून चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे पाहत आहेत. याचा परिणाम म्हणजे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची वेळ नागरिकांवर आली आहे. काही गावातील नागरिक नदीत डुरके मारून तहान भागवताना दिसतात. यासाठी भूजलपातळी कशी वाढविता येईल त्यापेक्षा दरवर्षी कोकणात भूजलपातळी कमी का होते या विषयी ठोस उपाययोजना सुचविणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी.

जे पाणी प्रदूषित होते त्यावर योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात यावा. राज्यातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने बऱ्याच ठिकाणी नाल्याला धरण बांधून पाण्यासाठी पाट केला जातो. हे पाणी शेतात सोडले जाते. बऱ्याच वेळा पाण्याचा अपव्यय होतो. असे होऊ नये म्हणून ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. तसेच नागरिकांची पाण्याची गरज व उपलब्ध पाणी याचा काटकसरीने वापर करावा यासाठी जलसाक्षरता होणे आवश्यक आहे. तरच आपण विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

ज्या गावाने पाणीटंचाईवर विजय मिळविला आहे त्या गावात राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भेट द्यावी. त्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, गावच्या प्रत्येक वाडीतील एक नागरिक यांची समिती नियुक्त करावी. म्हणजे त्या गावाचा अभ्यास करून आपल्या गावाला पाण्याच्या संकटातून सोडवू शकतात. त्यासाठी गावातील पाणी कुठे मुरते यावर करडी नजर गावकऱ्यांनी ठेवली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -