Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यगुलाबी थंडी अन् निवडणुकांची धूम...!

गुलाबी थंडी अन् निवडणुकांची धूम…!

महाराष्ट्रात पाऊस थांबलाय. यामुळे थंडी सुरू झालीय. दिवसभरात जरी उष्मा जाणवत असला तरीही सकाळी आणि सायंकाळी हवेत गारवा असतो. महाराष्ट्रातील थंडी ही ग्रामीण भागात अधिक असते आणि जाणवतेही. थंडी सुरू झाली असली तरीही मध्येच केव्हाही पाऊस पडेल की काय? अशी मनात शंका घेऊनच सगळ्यांचा वावर असतो. थंडीचे प्रमाण वाढत जाईल त्यावेळीच आंबा, काजू, कोकम यांना मोहर येईल. आता सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या थंडीचे वातावरण फळपिकांना चांगलेच पोषक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे चांगलं पीक येईल, या अपेक्षेने बागायतदार शेतकरी आहे. मासेमारी करणारा मच्छीमारही गतवर्षी अडचणीतच होता. यावर्षी तरी परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा ठेवून मच्छीमार बांधव आहे. सतत जे वातावरणात बदल घडतात, त्याचे परिणामही सर्वत्र होत असतात. त्याचे व्यावसायिकतेवरही होणारे परिणाम असतात. गतवर्षी मासेमारीच्या हंगामात जे समुद्रीबदल घडत गेले त्याने मोठा आर्थिक फटका बसला. यावर्षी मासेमारीचा सध्याचा तरी हंगाम सुरू झाल्यापासून व्यवस्थित सुरू आहे. थंड, उष्मा, थंडी अशा या संमिश्र वातावरणातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.

कोकणातील राजकीय वातावरण आता कोणीही कितीही कोणत्याही विषयाचा इश्यू घेऊन तापवण्याचा प्रयत्न केला तरीही तो लवंगा फटाकाच… इतकाही आवाज होणार नाही. याचे कारण कोकणातील सहकारातील खरेदी-विक्री संघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीचा वरचष्मा राहिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यात खातंही उघडता आलेलं नाही. सध्या होत असलेल्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. सहकार क्षेत्रातील या यशाने कोकणातील भाजप अधिक मजबुतीने उभी राहत आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्येही भाजपला चांगलं यश प्राप्त होऊ शकेल. कोकणातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता होत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कोकणातील गावोगावचं वातावरण या थंड वातावरणातही गरम झालं आहे. निवडणुका म्हटल्या की, पक्षीय अभिनिवेश, स्पर्धा, शह-काटशह असं सारं सोबत असतंच असतं. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये गावातील ग्रामस्थांशी ज्यांचे अधिक चांगले संबंध असतात. रोजच्या त्यांच्या-त्यांच्या असलेल्या कामकाजात जो उपयोगी पडतो, वेळप्रसंगात धावून येतो. त्यांच्याशी ग्रामस्थ अधिक बांधले जातात. यात पक्षीय स्तरावरून गावात अधिकचा निधी कोण आणू शकतो. गावाचा विकास नि:स्वार्थ भावनेतून कोणाकडून होऊ शकतो? या सर्वांचा विचार ग्रामपंचायत निवडणुकीत होत असतो.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी गावाच्या ग्रामस्थांची एकत्रित बैठक व्हायची. या बैठकीत गावाने ठरवायचं तेच व्हायचं. शक्यतो ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडणुका होत नव्हत्या. पक्षीय स्तरावर तर क्वचितच निवडणुका व्हायच्या. काही गावांतून तर पंचवीस-तीस वर्षे गावचे नेतृत्व करणारे सरपंच होते. अगदी त्या-त्या गावच्या सरपंचांच्या किंवा गावपुढाऱ्यांच्या नावानेच त्या-त्या गावची ओळख असायची. एवढी एखाद्या व्यक्तिमत्त्वाची छाप गावावर असायची. आता गावाचं, कार्यकर्त्यांचं, राजकीय पक्षांचं, सर्वच स्वरूप बदललेलं आपणाला पाहायला मिळतं. यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आता काही ठिकाणी फारच चुरस पाहायला मिळते. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये गावचा सरपंच हा जनतेतून निवडून द्यायचा आहे.

यामुळे गावच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने योग्य-अयोग्य ठरविण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे. चांगलं-वाईट ठरविण्याचा अधिकार गावाला राहणार आहे. यामुळे निश्चितच गावोगावी गाव विकासाचा विचार करणारे सक्षम नेतृत्व पुढे येऊ शकते. ग्रामपंचायत निवडणुकीतून गावच्या विकासाचे योग्यपद्धतीने नियोजन या निवडणुकांच्या निमित्ताने झाले पाहिजे. गावच्या विकासाचे योग्य पद्धतीने नियोजन या निमित्ताने होणाऱ्या बैठकांतून झालं पाहिजे. कोकणातील सध्याच्या या थंड वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका होत आहेत. कोकणातील वातावरणात निवडणुकीच हे वातावरण निवडणुकांनी तापलं तरीही वातावरणातील गावो-गावच्या येणाऱ्या काळातील विकासाच्या नव्या दिशा देणाऱ्या आहेत.

-संतोष वायंगणकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -