Thursday, May 2, 2024
Homeमहत्वाची बातमीपंकजा मुंडेंकडून चूक महाग पडल्याची जाहीर कबुली

पंकजा मुंडेंकडून चूक महाग पडल्याची जाहीर कबुली

परळी : माझी चूक झाली असेल, विकास करण्यात, देण्या-घेण्यात चूक झाली असेल, मला वेळ मिळाला नसेल, पण आता मला वेळच वेळ आहे. लोकशाहीत प्रत्येकाला चुकीची किंमत चुकवावी लागते. जिथे मी तेथे तुमची साथ आहे. घुमून-फिरुन मला सांगितले जाते की परळीला सांभाळा. आता काय करता, परळीची एक चूक किती महागात पडली हे माहिती आहे ना. मी थांबणार नाही, झुकणार नाही. मी पातळी सोडून कधीही शत्रूवर टीका केली नाही. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. संघर्षाला मी घाबरत नाही. मंत्रिपद मिळाल्यास विकास करेन, असे म्हणत पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी येथे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कधीही सूडबुद्धीने, पातळी सोडून वागले नाही. हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मी सेवा करताना मागे राहिले असेल. एखाद्या माणसाचा नमस्कार मला दिसला नसेल. मात्र, या गर्दीत न दुखावता कुणी राहू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंचा पराभव झाला, तेव्हा भारतात सर्वच नेते पडले होते. त्यानंतर उत्तमराव पाटील यांनी मुंडेंना प्रदेशाध्यक्ष केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

पंकजा म्हणाल्या, आज गौरवाचा दिवस आहे. शत्रुत्वाचा नाही. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव झाला होता. माझाही पराभव झाला. या पराभवाची चर्चा जास्त झाली, पण मी हृदयातून पराभूत होत नाही, तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही.

पंकजा म्हणाल्या, मला ९२ हजार लोकांनी मतदान केले. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आजचा क्षण आपला आहे. मी सांगते विकासाच्या धामधूमीने एखादा विषय राहिला असेल, पण आज गौरव आणि स्वातंत्र्य दिन आहे. तुमच्या डोळ्यात समाधान आहे तोपर्यंत माझे राजकीय जीवन आहे. तुमच्या चरणी माझे राजकीय जीवन आहे. मला वाटतं की, घरी बसावे, पण तुमचे चेहरे डोळ्यासमोर येतात. नेत्यांचे काम आणि आत्मसन्मान देणे आहे. मात्र, हे काम जेव्हा बंद होईल तेव्हा माझ्या राजकारणात अर्थ राहणार नाही. आपल्या तोंडचा घास कुणीही हिरावून घेणार नाही याची काळजी करू. आपल्याला आता भक्कम उभे राहायचे आहे. लोकांनी रांगा लावण्यापेक्षा लोकांकडे जाणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण परत आणावे लागेल. सरकार कोणतेही असो, मला दौरा करायचा होता, पण पक्षाने इतर नेत्यांचा दौरा लावला. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप केला नाही. नाशिक, पिंपरी-चिंचवडला गेले. ओबीसी आरक्षणावर आवाज उठवला. मराठा आरक्षणासाठीही मागणी करणार. त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण करणारे सरकार आपल्याला हवे. हे सरकार आता तुमचे आहे. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -