Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआपले पर्यावरण-आपली जबाबदारी

आपले पर्यावरण-आपली जबाबदारी

  • मुंबई ग्राहक पंचायत: मंगला गाडगीळ

पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे दोन दिवस काही दिवसांच्या अंतराने येतात. त्यातील पहिला म्हणजे २२ मे हा जागतिक जैवविविधता दिन. नुकताच तो जगभर साजरा झाला. त्यापाठोपाठ ५ जून रोजी येणारा जागतिक पर्यावरण दिन. जैवविविधता ही भावी पिढ्यांसाठी प्रचंड मौल्यवान जागतिक संपत्ती आहे. असे असून सुद्धा मानवी विकास कामामुळे प्रजातींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. जैविकविविधता बहुधा वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या जातींच्या विविधतेच्या संदर्भात समजली जाते. अधिक खोलात विचार केल्यास प्रत्येक प्रजातीमधील अानुवांशिक फरक देखील जैवविविधतेत समाविष्ट असतो. उदाहरणार्थ, पिकांच्या जाती आणि पशुधनाच्या जाती वगैरे. केवळ इथेच जैवविविधता संपत नाही. परिसंस्थांची विविधता ही देखील जैवविविधतेत गणली जाते. उदाहरणार्थ समुद्र, जंगल, वाळवंट, पाणथळ जागा इ. या परिसंस्थांमध्ये मानव, वनस्पती, प्राणी परस्परांवर अवलंबून असतात. याबाबतीतील प्रचार आणि प्रसार यांचे महत्त्व आणि या विषयाबद्दलची जागरूकता लक्षात घेऊन, २२ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस’ म्हणून घोषित केला आहे. यामुळे जैवविविधतेच्या समस्या सोडवण्याला प्रोत्साहन मिळू शकेल. म्हणूनच २०१५ नंतर विविध विकास कार्यक्रम शाश्वत विकास उद्दिष्टांच्या कक्षेत आणले गेले आहेत.

डिसेंबर २०२२ मध्ये कुनमिंग-मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्कच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारानुसार काम झाल्यास २०५० पर्यंत निसर्गाची हानी थांबून निसर्ग सुस्थितीत येईल अशी संयुक्त राष्ट्रांना आशा आहे. मानव सर्व बाजूंनी तांत्रिक प्रगती करत असूनही आपण पाणी, अन्न, औषधे, कपडे, इंधन, निवारा, ऊर्जा अशा सर्व गरजांसाठी पर्यावरणावरच पूर्णपणे अवलंबून असतो. म्हणूनच या वर्षासाठी “From Agreement to Action: Build Back Biodiversity”–‘करारापासून कृतीपर्यंत-जैवविविधता परत तयार करा’ असे घोषवाक्य दिलेले आहे. यामध्ये आपल्या जैविक संपत्तीचा आदर करणे, संरक्षण करणे आणि संवर्धन करणे यांचा समावेश आहे. आपल्या संस्कृतीचा जैवविविधता हा मुख्य आधारस्तंभ आहे. उदाहरणार्थ, केवळ सुमारे ३ अब्ज लोकांना २० टक्के प्रथिने प्राणी पुरवतात. ८० टक्क्यांहून अधिक मानवी आहार वनस्पतींद्वारे पुरवला जातो. विकसनशील देशांमधील ग्रामीण भागात राहणारे सुमारे ८० टक्के लोक मूलभूत आरोग्य सेवेसाठी पारंपरिक वनस्पती-आधारित औषधांवर अवलंबून असतात. त्यामुळेच जैवविविधतेचे नुकसान म्हणजे आपल्या आरोग्यासह एकूणच धोकादायक नुकसान आहे. असेही सिद्ध झाले आहे की, जैवविविधतेच्या नुकसानामुळे झूनोसेस-प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होणारे रोग वाढू शकतात – तर दुसरीकडे, जर आपण जैवविविधता अबाधित ठेवली, तर ते कोरोना व्हायरससारख्या साथीच्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला बळ मिळते. परिसंस्थेचा प्रत्येक तुकडा जिगसॉ पझलप्रमाणे इतरांवर अवलंबून असतो. तापमानातील बदलाचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. जसजशी मानवी लोकसंख्या वाढू लागली आहे, तसतसे आपण अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे समृद्ध जैवविविधतेचे नुकसान होत आहे. तीन चतुर्थांश जमिनीवरील वातावरण आणि सुमारे ६६% सागरी वातावरण मानवी हस्तक्षेपामुळे लक्षणीयरीत्या बदलले आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या १ दशलक्ष प्रजाती नामशेषाच्या उंबरठ्यावर आहेत. हवामानातील बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण असे तिहेरी संकट आपल्यापुढे आहे. पुढील आठवड्यात ५ जूनला येणारा जागतिक पर्यावरण दिन २०२३ हा या दिनाचा ५० वा वर्धापन दिन आहे. यंदा या दिनाचे यजमानपद नेदरलँड आणि कोट डी’आयव्होर यांच्याकडे संयुक्तपणे आहे. हा दिवस पर्यावरणीय जागरूकतेच्या प्रसारासाठी सर्वात मोठे जागतिक व्यासपीठ आहे. या वर्षीचे घोष वाक्य आहे- ‘BeatPlasticPollution’ प्लास्टिक प्रदूषणावर मात करा. सरकार, उत्पादक कंपन्या आणि सामाजिक संस्थांसह लाखो लोक या अभियानात सहभागी होत असतात. एकंदरीत प्रदूषण कमी करण्यासाठी देश-विदेशातील सरकारे धोरण म्हणून काही निश्चित कार्यक्रम राबवत असतात. उदा. फ्रान्सचे सरकार जवळपासच्या विमान प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. त्यामुळे जनता या प्रवासासाठी विजेवर चालणाऱ्या रेल्वेचा वापर करेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ग्लासगो येथील ‘२०२१UNFCCC COP२६’ या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत आपल्या पंतप्रधानांनी LiFE, म्हणजेच लाईफ स्टाईल फॉर एन्व्हारमेंट ही संकल्पना मांडली होती. यंदा ही संकल्पना जोरदारपणे राबवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे ‘पाणी वाचवा’ आणि ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ अशी अभियाने चालवण्यात येतील.

प्रदूषणावर मात करण्यासाठी निरनिराळ्या उत्पादक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार विशेष नियम/धोरण राबवू शकेल. सर्वप्रथम एकल वापराच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर संपूर्ण बंदी आणणे. इथे ग्राहकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी या पिशव्यांच्या वापराला नाही म्हटले पाहिजे. जे प्लास्टिक परत वापरण्याजोगे आहे त्याच्याच उत्पादनाला परवानगी देणे. इथे सुद्धा ग्राहकांची भूमिका महत्त्वाची. ग्राहक अशी उत्पादने परत वापरू शकतात किंवा त्यापासून इतर काही वस्तू बनवू शकतात. जर तुम्हाला एखादी कंपनी/ मॉल अनावश्यक प्लास्टिक वापरताना दिसली (उदा. फळांसाठी जाळ्या) तर त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आवाज उठवा किंवा त्यांच्याकडे थेट तक्रार करा. पैशाची गुंतवणूक करताना फंड मॅनेजरला ते ESG सारख्या अधिक जबाबदार फंडात गुंतवायला सांगा. (Environment/Social /Governance) समस्येबद्दल तुमच्या स्थानिक प्रतिनिधींशी बोला. राजकारण्यांना कळू द्या की तुम्हाला या समस्येची काळजी आहे. एखादा नावीन्यपूर्ण उपाय किंवा प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करणाऱ्या स्टार्ट-अपबद्दल ऐकल्यास, तो मित्रमंडळींना सांगा आणि सोशल मीडियावर त्याचा प्रचार करा. स्थानिक प्लास्टिक क्लीन-अप गटांसह स्वयंसेवी काम करणाऱ्या धर्मादाय संस्थांना देणगी द्या. किराणा दुकानात तुमच्या स्वतःच्या पिशव्या आणा; ओव्हर-पॅकेज उत्पादने खरेदी करणे टाळा. विस्तारित वॉरंटीसह वस्तू खरेदी करा. त्यामुळे वस्तू लवकर बदलावी लागणार नाही आणि तिचा पुरेपूर उपयोग होईल. आशा सोडू नका. प्रगती होत आहे आणि गती निर्माण होत आहे. त्याचबरोबर प्लास्टिक प्रदूषणाबाबत प्रत्येकाची कृती महत्त्वाची आहे. या कारवाईला गती देण्याची वेळ आली आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी आणि जबाबदार ग्राहक आणि नागरिक म्हणून हे नक्की कराच.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -