Monday, June 17, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सवर्धापनदिनाचा असाही एक ‘सोहळा’

वर्धापनदिनाचा असाही एक ‘सोहळा’

राजरंग – राज चिंचणकर

सांस्कृतिक क्षेत्रात अनेक सोहळे उत्साहाने पार पडत असतात; पण कधी तरी अशा सोहळ्यांमध्ये आयत्या वेळेला काही तरी प्रश्न निर्माण होतो आणि त्या सोहळ्याचा रंगच बदलून जातो. असाच एक प्रसंग घडला, तो माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात! मात्र अचानक उद्भवलेल्या अडचणीवर योग्य निर्णय घेत, वाचनालयाने या सोहळ्याचा रंग उत्तरोत्तर अधिक वाढवत नेत, हा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.

मुंबईतले महत्त्वाचे वाचनालय म्हणून ओळख असलेले माहीम सार्वजनिक वाचनालय हे ग्रंथ देवघेवीसह सांस्कृतिक क्षेत्रातही उत्तम कार्य करत आहे. अलीकडेच वाचनालयाचा ४७वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांना निमंत्रित करण्यात आले होते. वाचनालयाचे व्यवस्थापक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने या सोहळ्याची चोख तयारी केली होती. कुमार सोहोनी यांच्या नाटकांच्या शीर्षकांनी व्यासपीठ सजवण्यात आले असल्याने, आपसूकच वातावरण निर्मिती झाली होती. मात्र या सोहळ्याला काही तास शिल्लक असतानाच, कुमार सोहोनी यांची प्रकृती अचानक बिघडली आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सदर सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचे, त्यांनी वाचनालयाला कळवले. साहजिकच वाचनालयाच्या मंडळींना यामुळे धक्का बसला; परंतु प्रसंगावधान राखत आणि या सोहळ्याला येणाऱ्या वाचनालयप्रेमी रसिकांच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी आयत्यावेळी एक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘वाचकांच्या वाचनालयाविषयी काय भावना आहेत’ या विषयावर उपस्थितांनी मुक्त संवाद साधावा; असे आवाहन रसिकांना करण्यात आले. वाचनालयाबद्दल आपुलकी असलेल्या तमाम रसिकांनी एकंदर स्थितीचे योग्य ते भान ठेवत, या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विशेष म्हणजे, कुमार सोहोनी यांचे भाषण रद्द झाले म्हणून उपस्थितांपैकी एकही रसिक श्रोता सभागृहातून उठून गेला नाही. आयत्या वेळेच्या विषयावर रसिक उत्स्फूर्तपणे व्यासपीठावर व्यक्त होत राहिले. मूळ कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल कुणीही, कुठल्याही प्रकारची नाराजी व्यक्त न करता उलट या मंडळींनी वाचनालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘हे केवळ वाचनालय नाही, तर ग्रंथमंदिर आहे’ अशी पावती देत, वाचनालयाशी संबंधित सर्व मंडळींचा उत्साहही रसिकांनी वाढवला. रसिकजन आणि वाचनालयाच्या सभासदांची ही आपुलकी पाहिल्यावर, वाचनालयाचे व्यवस्थापक मंडळ व कर्मचारी वर्गाला अक्षरशः गहिवरून आले. असा सुजाण आणि समजूतदार रसिकवर्ग वाचनालयाच्या कार्यक्रमाला लाभतो, याबद्दल वाचनालयाकडूनही उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

स्तंभलेखनाचे वाचन होते तेव्हा…

एखादी बातमी किंवा लेख वर्तमानपत्रात छापून येतो आणि नेहमीप्रमाणे वाचकवर्गाकडून त्याचे वैयक्तिकरीत्या वाचन केले जाते. परंतु वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एखाद्या लेखाचे जेव्हा जाहीररीत्या वाचन होते, तेव्हा त्या लेखन प्रक्रियेला मिळालेली, ती मोठी दाद असते.

‘प्रहार-रिलॅक्स’च्या याच स्तंभात गेल्या आठवड्यात ‘आपण आनंदयात्री प्रतिष्ठान’ या संस्थेच्या, ‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठ मंडळींच्या उपक्रमाबद्दल ‘सारे मिळून आनंदयात्री…!’ असे शीर्षक असलेला लेख प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा उपक्रम दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडला. सदर लेख प्रसिद्ध झाल्यावर, या संस्थेतर्फे वर्तमानपत्राच्या प्रती विकत घेतल्या गेल्या. पण या लेखाचे पोस्टररुपी प्रेझेंटेशन जेव्हा या कार्यक्रमात या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आले; तेव्हा त्या मंडळींना प्रचंड आनंद झाला. त्याचवेळी या लेखाचे जाहीर वाचन व्हावे, अशी जोरदार मागणी उपस्थितांमधून करण्यात आली. त्यांच्या विनंतीला मान देत, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सुर्वे यांनी व्यासपीठावरून ‘प्रहार-रिलॅक्स’च्या सदर लेखाचे जाहीर वाचन केले आणि संस्थेच्या कार्याची योग्य दखल घेतल्याबद्दल उपस्थितांनी लेखक व ‘प्रहार’चे जाहीर कौतुकही केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -