Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखओंकार स्वरूपा...

ओंकार स्वरूपा…

लता गुठे

या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चला तर मंडळी आपण गणेश स्वरूपाला समजावून घेऊया…

अष्टसिद्धि विनायक, तेजोमय चैतन्यरूप
ऊर्जेचा स्रोत अद्भुत, ओंकार हे स्वरूप…
वरील ओळींमधून मी गणेशाचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे… प्रत्येक वयामध्ये मला जाणवलेले गणेशाचे रूप वेगळे असल्यामुळे त्या त्या वयामध्ये गणेश तत्त्वांचा माझ्या मनामध्ये काहीतरी आकार निर्माण झाला आणि त्यातूनच गणेशाचे स्वरूप समजू लागले. मानवी मन विलक्षण आहे. सहसा ते तत्त्वाची पूजा करत नाही, त्यामुळे आपल्याकडे मूर्तिपूजेला महत्त्व आले आहे. मूर्तीही त्या विश्व तत्त्वाचे एक बाह्यरूप आहे. ते डोळ्याने दिसते म्हणून तो आकार आपल्या मनामध्ये साकार होतो, असे मला वाटते. अगदी लहानपणीपासून गणपती या तत्त्वाशी आपला परिचय झालेला असतो. शाळेत जायला लागलो की पहिला पाटीवर आपण श्री गणेशा रेखतो. पहिलं नातं त्या शब्दाशी पहिल्या तत्त्वाशी निर्माण होतं. ‘ओम श्री गणेशाय नमः’ घरातील पालक किंवा गुरुजी आपला हातात हात घेऊन या तत्त्वाचा उच्चार करून नकळत गणेशाचे स्वरूप उच्चाराबरोबर मनात आकार घेऊ लागते. मुलांसारखंच गणेशाचे हे ‘बाळ’रूप आहे. शंकराच्या आणि पार्वतीच्या मांडीवर बसलेला बाळ गणपती पाहताना प्रत्येकाची नेत्रं सुखावतात. जरा कळायला लागलं की, या बाल गणपतीची कथा ऐकायला मिळते. त्या कथेमध्ये पार्वतीच्या मळापासून गणपती बनवला, अशी आख्यायिका आहे. लेखकाला अशी आख्यायिका कशी सुचली असावी? याचा विचार केला, तर लगेच लक्षात येते की, सती पार्वती ही पर्वताची कन्या आहे. म्हणजे मातीपासून तिचा जन्म झाला. तिच्या शरीराच्या भागातूनच एका बालकाचा जन्म झाला. हे लॉजिक माझ्या विचारांना पटले.

पंचमहाभूतांपासून सृष्टीतील चराचराचा जन्म झाला आणि ती शक्ती सर्वात सामावली गेली. इथे गणपतीच्या दुसऱ्या स्वरूपाची ओळख होते. ती अशी… समाजातील चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी समजून, सामावून घ्यायच्या म्हटल्या, तर मन, विचार, व्यापक लागतात. अशा सर्व गोष्टी सामावून घेणाऱ्यासाठी विश्वासार्हता हवीच. श्रीगणेश बुद्धीचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात, अनेक समस्या निर्माण होतात. त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी बुद्धीची कसोटी लागते. अशा वेळेला श्री गणेशाकडे आपण बुद्धीची प्रार्थना करतो. मी शाळेत असताना नेहमी मंदिरात गेलं की, आई म्हणायची, माग देवा मला बुद्धी दे. बुद्धी हेही एक तत्त्व ज्ञानरूपी आहे. मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपण जीवन सुकर करत असतो आणि यामध्ये गणेश तत्त्व आपल्यासोबत कायम राहण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी श्री गणेशाची दहा दिवस जशी जमेल तशी आराधना करतो. कोणी दीड दिवस करतात, कोणी पाच दिवस, तर कोणी दहा दिवस, तर कोणी कायमच.

गणपतीच्या बाह्य स्वरूपाचं दर्शन घेताना अनेक मुलांना प्रश्न पडतात. हत्तीचे तोंड, मोठे कान, बारीक डोळे पोटापर्यंत आलेली सोंड विशाल भाळ मोठे पोट उंदराची सवारी हे सर्वच विलक्षण आहे. सर्व एकत्र होऊन गणपती बाप्पा तयार होते. विशाल तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. अशा सर्व गोष्टी गणेशाच्या ठायी असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यातून आपल्याला अनेक संदेश आणि शिकवण अंतर्भूत असल्याची दिसून येते. गणपती एकमेव देवता आहे की, ज्याला हत्तीचं डोकं आणि माणसाचे शरीर… येथे मुलांच्या मनामध्ये गणपतीची कथा ऐकता-ऐकता त्या रूपाचं चित्रं साकार होतं आणि बालमनामध्ये प्रश्न पडतो की, गणपतीला हत्तीचं तोंड का बर बसवलेलं असतं? मलाही हा प्रश्न पडला आणि मी जेव्हा शिक्षकांना विचारलं, तेव्हा आमचे गुरुजी म्हणाले, “हत्ती अतिशय शक्तिशाली आहे तसंच तो बुद्धिमानही आहे म्हणून गणपतीला हत्तीचं तोंड बसवलं असावं.” या उत्तराने समाधान झालं आणि मी गणपतीच्या प्रेमात पडले. प्रत्येक वर्षी आमच्या शाळेमध्ये गणपती बसवला जात असे. रोज एका वर्गाचा नैवेद्य आणि त्या वर्गाची पूर्ण जबाबदारी असे. गणपतीच्या पूजेसाठी फुलं, हार, गणपती समोर रांगोळी या गोष्टी करताना मला विशेष आनंद व्हायचा आणि गणपतीसमोर दहा दिवस आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असायचे त्यामध्येही मी भाग घेत असे.

एका वर्षी आम्ही सर्व गल्लीतील बाळगोपाळांनी गणपती बसायचं ठरवलं मग काय! लागलो तयारीला… नदीवरून शाडूची चिकन माती आणली. तिचा गोळा तयार केला. आमच्या छोट्याशा हाताने आमच्या मनामध्ये साकार झालेला गणपती होता तोच समोरच्या मातीच्या गोळ्यामध्ये अवतरला. त्यावेळेला काय आनंद झाला म्हणून सांगू! त्या गणपतीकडे पाहतच कधी संध्याकाळ झाली समजलं नाही. हळूहळू मग तो गणपती हळूच उचलून देवळीत ठेवला. त्याला गुंजाचे डोळे लावले आणि सुकल्यानंतर रंग पेटीतील रंगाने तो रंगवला देखील. आमच्या वाड्याच्या बाजूला आमचं दुकान होतं. त्या दुकानाच्या एका देवळीमध्ये त्यावर्षी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि जी काही सेवा होईल ती आम्ही केली. रोज आरती, प्रसाद नित्यनेमाने होऊ लागलं. आमच्याबरोबर आजूबाजूची मोठी माणसंही आरतीला येऊ लागली. आमचा गूळ-शेंगदाण्याचा प्रसाद आमचा गणपती बाप्पा गोड मानून घेऊ लागला.

नंतर मुंबईला आल्यानंतर मुलाच्या हट्टामुळे परत गणपती बाप्पाचे आमच्या घरी आगमन होऊ लागले ते आजपर्यंत… या आदीस्वरूपा गणरायाचे आगमनच मुळात खूप उत्साह निर्माण करते… गणेशाच्या तत्त्वाला समजून घेतलं, तरच त्याचं खरं रूप चित्तपटलावर साकार होऊ शकतं. मानवी जीवनाला सकस करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्या सर्वांशी गणेशतत्त्व जोडलेलं आहे, असं मला वाटतं. म्हणजे उदा. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, ही प्रेरणाच जगण्याला सकारात्मक ऊर्जा देते. त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. बुद्धी ही मानवाची सर्वात मोठी शक्ती आहे. तो विविध कलांचा अधिपती आहे. माणसाच्या ठिकाणी असलेले दैवी गुण असतात. त्याचा अविष्कार तेव्हाच प्रकट होतो, जेव्हा या आदीशक्तीपासून जाणीव होते. गणपतीचं एक रूप चिंतामणी असं आहे, म्हणजे तो माणसाच्या चिंता दूर करतो. चिंता हे अनेक गोष्टीचा नाश करते. चिंतामणीवर नितांत श्रद्धा ठेवली की आपोआपच चिंता दूर होते. म्हणून हे तत्त्वही अंगीकरायला हवं. हा गणनायक आहे. हा गुण जेव्हा माणसांमध्ये येतो, तेव्हा समाजामध्ये तो आपलं वेगळं स्थान निर्माण करतो. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची कुवत निर्माण करण्याचे कामही गणनायकाचेच. त्याची कृपा झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. अगदी गणेश पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. याचं कारण म्हणजे त्या काळातील लोकांनी गणपतीचे तत्त्व अंगीकारले होते.

गणपतीचे बाह्यरूप आकर्षक आहे, ते पाहता पाहता आपण स्वतःत हरवून जातो. गणपतीचे हात, पाय, डोळे, कान, सोड, पितांबर, शेला हे सर्व पाहताना आपण गणपती बाप्पाच्या प्रेमात पडतो म्हणूनच लहान-थोरांना सर्वांनाच गणपती हवाहवासा वाटतो. गणपतीचे स्वरूप आणि गणपती तत्त्व हे अन्य देवतांपेक्षा भिन्न असल्याचे आपल्याला दिसून येते. महादेव-पार्वतीचा पुत्र म्हणून परिचित असलेल्या गणपतीला ब्रह्मतत्त्वही मानण्यात आले आहे. काही ठिकाणी गणपती हाच ब्रह्म, विष्णू, महेश, इंद्र, सूर्य, चंद्र आहे, असे मानले जाते. गणपतीचे वाहन मूषक आहे. एकूणच गणपतीशी संबंधित गोष्टी विशेष आहेत. गणपतीच्या या स्वरूपामागे गहन अर्थ असल्याचे सांगितले जाते. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला श्री गणरायाचे आगमन होते. गणपतीचे केवळ नाव घेतले तरी त्याचे मोहक रूप आपल्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहते. गणपतीचे नेमके कोणते रूप जास्त भावते, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. सर्व गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -