Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडी'मोदींवर टीका करण्याची कुणाच्याही औकातीत नाही'

‘मोदींवर टीका करण्याची कुणाच्याही औकातीत नाही’

सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना ठणकावले

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या मुद्यावरून शुक्रवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. काँग्रेसने या प्रकरणी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच सभागृहात ‘मोदी चोर है’ ची जोरदार नारेबाजी केली. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींचा असा अवमान सहन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना २३ कोटी मतदारांनी निवडून दिले आहे. हे कुणाच्याही औकातीत नाही. मोदी कुणाच्या भीकेवर पंतप्रधान झाले नाहीत. त्यामुळे पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणणे सहन करणार नाही, असे सुधीर मुनगंटीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाचा नामोल्लेख टाळत म्हणाले. राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्याची कृती सभागृहात घडली. पण सभागृहात देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हटले गेले, अशी बाबही त्यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

आशिष शेलार यांनीही साधला विरोधकांवर शरसंधान

भाजप आमदार आशिष शेलार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर शरसंधान साधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारीच या प्रकरणी सभागृहात निवेदन केले होते. असे प्रकार यापुढे सत्ताधाऱ्यांकडून होणार नाही अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली होती. त्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यावर आमची काहीही हरकत नाही. पण ते नेहमीच मुख्यमंत्री व सहकारी आमदारांवर खोके-बोके म्हणून टीका करतात. हे कोणत्या नियमात बसते, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -