Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडीनितेश राणेंची रणनीती यशस्वी

नितेश राणेंची रणनीती यशस्वी

जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

मुंबई : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा राणेंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि पुन्हा एकदा सहकार क्षेत्रावर राणेंनी झेंडा रोवला.

२००९ आणि २०१५ ला जिल्हा बँक राणेंच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. मागील १५ वर्षांत राणेंच्या नेतृत्वात बँकेची झालेली प्रगती, उत्तम कारभार करून सभासदांचा, शेतकऱ्यांचा राणे यांनी विश्वास जिंकला होता. यामुळेच तीन पक्षांच्या आघाडीवर मात करण्यात राणे यशस्वी झाले.

मागील दोन वर्षांपासून या बँकेच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत होता. विशेष करून आमदार नितेश राणे हे सतीश सावंत यांना बँकेतून हद्दपार करायचे या निर्धाराने मैदानात उतरले होते. गेल्या वर्षभरात त्यांनी लावलेली फिल्डिंग अधिक मजबूत केली. प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केले. मतांची जुळवाजुळव केली. नितेश राणे यांची रणनीती पाहून विरोधक देखील हादरले. सतीश सावंत यांनी थेट सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करूया असा प्रस्ताव ठेवला. पण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेल्या आमदार नितेश राणे यांनी हा प्रस्ताव धुडकावून थेट मैदानात उतरले.

निवडणुकीच्या रणांगणात तीन पक्षांच्या आघाडीला नामोहरम केले. शेवटी नितेश राणेंना रोखण्यासाठी कटकारस्थान रचून अडकवण्यात आले. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंनी बँकेची तटबंदी अभेद्य केली होती. अखेरच्या १० दिवसांत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णायक भूमिका बजावली. माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून यंत्रणा हाताळली. यामुळेच निकालाच्या दिवशी विरोधकांना धूळ चारून जिल्हा बँकेवर भाजपच्या विजयाचा वारू उधळला गेला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -