Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane on Maratha Andolan : मराठा आंदोलनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अदृश्य...

Nitesh Rane on Maratha Andolan : मराठा आंदोलनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अदृश्य शक्ती घुसली आहे!

मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं काम मविआच्या कार्यालयातून शिजतंय

भाजप आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य

मुंबई : मराठा आंदोलन (Maratha Andolan) फार चिघळलं असून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड असे हिंसक प्रकार मराठा आंदोलनाच्या नावाखाली केले जात आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सर्वांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, हिंसा करु नका असं आवाहन केलं आहे. तरी राज्यभरात हिंसा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली भूमिका मांडली. मराठा आंदोलनात एक प्रकारची अदृश्य शक्ती घुसली आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

नितेश राणे म्हणाले, ज्या मराठा समाजाने याअगोदर ५८ मोर्चे काढले आणि जगाला आश्चर्य वाटलं की लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनदेखील कुठेही गालबोट लागलं नाही. त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा एका बाजूला आमचे जरांगे पाटील शांततेने बसून उपोषण करतायत आणि वारंवार सांगतायत, की तुम्ही अशा प्रकारे हिंसा सुरु ठेवली तर मी वेगळा निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ हाच होतो की या आंदोलनामध्ये एक वेगळ्या प्रकारची अदृश्य शक्ती घुसलेली आहे. त्या शक्तीच्या माध्यमातून हे आंदोलन आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम आणि रणनीती आखलेली आहे आणि त्यानुसारच या सगळ्या गोष्टी होत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

जरांगे पाटील जर शांततेचं आवाहन करत आहेत, मुख्यमंत्री साहेब शांततेचं आवाहन करत आहेत, सरकार आरक्षणावर काम करत आहे, तर मग दंगल कोणाला हवी आहे? दंगली घडवण्याचा कोणाचा इतिहास आहे? कोणाबद्दल मीरा बोरवणकर मॅडमनी पुण्याच्या दंगलीबद्दल उल्लेख केला आहे? आमच्यासारखे लोक वारंवार असं का बोलतायत की उद्धव ठाकरेची यासंदर्भात नार्को टेस्ट झाली पाहिजे?, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले, आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्या दंगलींमागचा मास्टरमाईंड कोण हे येणार्‍या दिवसांमध्ये शोधलं पाहिजे. आमचे गृहमंत्री आणि पोलीस खातं निश्चितपणे ते शोधेल, याचीच भीती असल्यामुळे वारंवार मग संजय राजराम राऊत असेल, सुप्रिया सुळे असतील आणि अन्य महाविकास आघाडीची लोकं आमच्या गृहमंत्री साहेबांचा राजीनामा मागत आहेत. कारण आता त्यांना भीती आहे की सत्य जेव्हा बाहेर येईल तेव्हा कळेल की जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे मविआच्या कार्यालयातून शिजतंय, हे बाहेर येईल, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -