Monday, May 20, 2024
HomeदेशMaharashtra NCC : महाराष्ट्राच्या एनसीसीने केली हॅटट्रिक; मिळवला 'हा' बहुमान!

Maharashtra NCC : महाराष्ट्राच्या एनसीसीने केली हॅटट्रिक; मिळवला ‘हा’ बहुमान!

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थातच एनसीसीने (NCC) यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्राची (Maharashtra) मान उंचावली आहे. महाराष्ट्राच्या एनसीसीने देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. तसेच ‘प्रधानमंत्री बॅनर’ (Prime Minister Banner) हा प्रतिष्ठित पुरस्कार सलग तिसऱ्यांदा पटकावत हॅटट्रिक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काल २७ जानेवारी रोजी महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२३-२४ च्या विजेत्या आणि उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला देखील गौरविण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.

यावेळी १२२ कॅडेटचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.

देशातील एकूण १७ एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी १ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’ चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. यावेळी, नागपूरच्या रिमाउंट व वेटेरिनरी स्काड्रन कॅडेटने सर्वोत्कृष्ट टेंट पेगर ट्रॉफी जिंकली.

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १९ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. राज्याने मुसंडी घेत मागील दोन वर्षांपासून प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याने तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्षे प्रधानमंत्री बॅनर पटकावत उत्तम कामगिरी केली आहे.

महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -