Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथननिसर्ग कोपला; सावरण्याची गरज...

निसर्ग कोपला; सावरण्याची गरज…

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

बऱ्याच दिवसांनी पुन्हा पाऊस आला आहे. कोकणात तर पावसाने आपली परंपरा कायम ठेवत जन्माष्टमीच्या दिवशीच पाऊस पुन्हा आला. तब्बल एक महिना विश्रांती घेऊन पावसाने पुनरागमन केले आहे. त्यामुळे सगळेचजण सुखावले आहेत. कोकणातील जिव्हाळ्याच्या गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा राहिला आहे. बाप्पाचे आगमन हे चैतन्य निर्माण करणारे असते. यंदा बाप्पाचे स्वागत करण्यासाठी पाऊस पण थांबणार अशी चिन्हे दिसत आहेत आणि यंदाच्या पावसाच्या प्रमाणानुसार तो असाच पडत राहावा, असेही सगळ्यांना वाटत आहे.

खरं तर ऑगस्ट हा महिना श्रावणाचा, रिमझिम पावसाचा. पण यावर्षी पावसाचा मूड तसा फार बरा दिसत नाहीय. आधीच तो जून संपता संपता अवतरला. त्यात सातत्य फारसं नव्हतंच. त्यात जुलै महिन्यात जो काही पाऊस पडला तो विध्वंस करून गेला. सलग दोन ते तीन आठवडले कोसळला. पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गायब झालेला पाऊस तब्बल एक महिन्यांची सुट्टी घेऊन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तो पुन्हा कोसळू लागला आहे. मात्र यंदाचे हे बिघडलेले पावसाचे वेळपत्रक येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे परिणाम दिसून येणार हे निश्चित आहे. विलंबाने दखल झालेल्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होणार हे निश्चित आहे. कोकणात जरी आंबा, काजू ही मुख्य पिके असली तरीही कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती होते. आपल्या घरामागे, छोट्या छोट्या जागांमध्ये कोकणातला शेतकरी अनेकदा स्वतःपुरता का होईना पण भात रुजवतो. भाजवळ, नांगरणी, पावसाच्या आगमनाचे चिन्ह दिसू लागले की पेरणी, लावणी अशा क्रमाने भात शेती होते. दसऱ्याला शेती सोनं घेऊन शेतात डोलू लागते आणि शेतकरी नव्या पिकाच नवं बांधतो. कोकणात गारवा, निमगारवा आणि हळव्या प्रकारची भातशेती होते. ती शेती कुठे केली जाते यावर त्यावर हे प्रकार अवलंबून असतात. पण या सगळ्याला पाऊस फारच महत्त्वाचा असतो. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात पडलेला पावसाचा परिणाम भातशेतीवर होणार हे स्पष्ट आहे.

भातशेतीची ही स्थिती असताना, ज्याप्रमाणे पावसाने यंदा ओढ लावली, त्याप्रमाणे जर थंडीने सुद्धा विश्रांती घेतली, तर त्याचा परिणाम आंब्यावर सुद्धा होण्याची भीती आहे. यंदाच्या हंगामात आंब्याचेही प्रमाण खूपच कमी होते. आंबा असून नसल्यासारखाच होता. त्याचा फटका बागायतदार, उत्पादकांना बसलेलाच आहे. त्यात कोकणातील या मुख्य पिकाकडे आणि त्यामुळे अडचणीत आलेल्या बागायतदार, उत्पादकांच्या अडचणींकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने अद्यापही पाहिले जात नाही ही खंत आहे. त्यामुळे हा बागायतदार यंदाही अडचणीत आहे. एकीकडे पिकांची ही स्थिती आहे, तर दुसरीकडे येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. कोकणात मुबलक पाऊस पडत असला तरीही प्रत्येक उन्हाळ्यात इथल्या अनेक वाडी वस्त्याना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे उन्हाळा डोळ्यांत पाणी आणतोच. हवामानावर, निसर्गावर माणूस अवलंबून असल्याने त्याच चक्र बिघडलं की, त्याचा थेट परिणाम मानव जातीवर होतो आहे. निसर्गाचे हे चित्र का बदलले आहे, वेळपत्रक का बिघडले आहे? याची सगळी कारणे हुशार मानव जाणत आहे. मात्र त्यावर उपाय माहिती असूनसुद्धा त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही.

प्रगत तंत्रज्ञानामुळे माणसांना येणाऱ्या अतिवृष्टी किंवा दुष्काळ याचा अंदाज आधीच येऊ लागला आहे. अल निनो वाऱ्याच्या प्रभावाने यंदाचे ऋतुमान हिंदोळे खाणार हे जवळपास स्पष्ट होते. अशा वेळी भविष्याचा वेध घेण्याची यंत्रणा मानवाकडे असताना या संकटांवर मात करण्यासठी यंत्रणा तयार कारणे आवश्यक झाले आहे. हे वर्ष कमी पावसाचे असल्याचे दिसत आहे. अशा वेळी ज्यांच्यावर हा बदलाचा परिणाम होणार आहे, त्या घटकांना पुन्हा सावरण्यासाठी शासनाने आणि तत्सम यंत्रणांनी आतापासून मास्टर प्लान तयार करणे आवश्यक आहे. याचा थेट फटका या घटकांना बसेल पण ते शासनापर्यंत मदतीसाठी जाऊ शकत नाहीत अशांसाठी शासनाने तत्काळ पावले उचलणे आवशयक आहेत. ठाशीव निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कारणे आवश्यक आहे, तरच या नैसर्गिक संकटातून आपण बाहेर पडू.

anagha8088@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -