Saturday, May 18, 2024
Homeदेशनरेंद्र मोदी, स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत यशस्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत यशस्वी पंतप्रधान

मोदींनी बदलली ‘रिफॉर्म’ शब्दाची व्याख्या...

गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘रिफॉर्म’ अर्थात सुधारणा म्हणजे केवळ पद्धत बदलणे नसून परिस्थिती बदलणे आहे. त्यामुळे आपल्या २० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी ‘रिफॉर्म’ची व्याख्या बदलली आणि त्याद्वारे अंत्योदयाचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत यशस्वी पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी बुधवारी केले.
 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय प्रमुखपदाच्या कारकिर्दीस २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भाषणाने झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते.
 
भाजपने नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविली, तेव्हा गुजरातमध्ये भयावह भूकंप झाला होता. त्यातून राज्याला सावरण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम ‘रिफॉर्म’ या शब्दाची व्याख्याच बदलली. त्यांच्यासाठी ‘रिफॉर्म’ म्हणजे केवळ पद्धतीत बदल करणे नसून परिस्थितीमध्ये बदल करणे असे त्यांना अपेक्षित आहे.

त्यानुसार त्यांनी प्रथम गुजरातचा आणि गेल्या सात वर्षांपासून देशाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. पूर्वी जीडीपीला मानवी चेहरा नव्हता, त्यामध्ये केवळ आकडेच दिसत असत. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक सुधारणेचा केंद्रबिंदू देशातील गरीब व्यक्तीला ठेवले आणि त्यामुळे आज देशाचा सर्वांगीण विकास साध्य होत असल्याचे अमित शहा म्हणाले.

‘गव्हर्नन्स गुरू’ म्हणजे नरेंद्र मोदी – फडणवीस

भारतीय राजकारणामध्ये आजपर्यंत अनेक ‘मॅनेजमेंट गुरू’ झाले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील पहिले ‘गव्हर्नन्स गुरू’ आहेत. प्रशासनाची नवी कार्यसंस्कृती त्यांनी अमलात आणली असून त्याद्वारे वेगवान विकासाचे पर्व सुरू झाले आहे. मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा त्यांचा २० वर्षांचा प्रवास लोकशाही आणि प्रशासनास नवी उंची देणारा ठरला आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -