Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजNagpanchami : चल गं सये वारुळाला...

Nagpanchami : चल गं सये वारुळाला…

  • विशेष : लता गुठे, विलेपार्ले, मुंबई

श्रावणामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि त्यानंतर सण उत्सवाचा सिलसिला सुरू होतो. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. हा सण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यांत उत्साहाने साजरा केला जातो.

श्रावण महिना हा सर्व महिन्यांचा राजा समजला जातो. कारण या महिन्यांमध्ये या सृष्टीला नवचैतन्य प्राप्त झालेले असते. सगळीकडे हिरवळीचा गालिचा पसरलेला असतो. रानफुलांनी माळरान सजलेले असते. डोंगरदऱ्यांतून झरझर खाली कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, खळखळ वाहणाऱ्या नद्या, शेतात वाऱ्यावर डोलणारी पिकं, ऊन-पावसाचा खेळ, नभात सप्तरंगांची इंद्रधनुष्याची कमान हे सर्व चित्र श्रावणात पाहून श्रावण एखाद्या जादूगाराप्रमाणे वाटतो. खरं तर तोच हा या सृष्टीचा खरा चित्रकार असावा, असे मला नेहमी वाटते.

मानवाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे, कारण तो निसर्गाचा एक भाग आहे. म्हणूनच मानवाच्या जीवनाचे अनेक घटक ऋतुचक्राशी बांधले गेले आहेत. हवामानात होणाऱ्या बदलानुसार शेतीत येणारे फळ, फुलं, पीकही बदलते. तसे बदल जीवनातही आपोआप सवयीने आपण अंगीकारतो. यातूनच जे सण, उत्सव साजरे करतो. त्यामध्ये नैवेद्यासाठी वापरले जाणारे पदार्थ त्या त्या ऋतूप्रमाणे असतात. हा आपल्या संस्कृतीचा पारंपरिक भाग असतो. असाच श्रावणामध्ये येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि त्यानंतर सण उत्सवाचा सिलसिला सुरू होतो. म्हणूनच श्रावणाला सणांचा राजा असं म्हटलं जातं. या महिन्यांमध्ये व्रतवैकल्य, पूजाअर्चा यालाही अत्यंत महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील शुक्रवारी जिवतीची पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात आणि उत्साहाला उधाण येते.

आदीम काळापासून निसर्गाविषयी त्याच्या लहरीपणामुळे माणसाच्या मनात भीती आणि कुतूहल, आश्चर्य, गूढ अशा भावना निर्माण झाल्या. त्यातून अस्था-अनास्था, श्रद्धा, चालीरीती या सर्वांचा संबंध मानवाच्या जीवनाशी निर्माण झाला. ग्रामीण भागात आजही शेतकऱ्यांचे जीवन निसर्गाच्या अनेक घटकांवर अवलंबून असते. शेती व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर आधारित असल्यामुळे निसर्गपूजेला अनन्यसाधारण महत्त्व होते आणि आजही आहे. त्यातूनच पूजाअर्चा, व्रत, उपवास या सर्वांचा मानवी जीवनाशी असलेला अनन्यसाधारण संबंध श्रावणात येणाऱ्या सण उत्सवाशीसुद्धा जोडला गेला आहे. परंपरेने चालत आलेली संस्कृती तिचे संवर्धन आजही ग्रामीण भागांमध्ये केलेले दिसते. पूर्वापार चालत आलेला शेती व्यवसाय आणि त्या व्यवसायाशी निगडित असलेले सण उत्सव ग्रामीण संस्कृतीची मोठी ठेव आहे. पारंपरिक पद्धतीने आजही सर्व सण साजरे केले जातात.

श्रावणात येणारा पहिला सण नागपंचमी… महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत नाग नृत्याचा प्रचार असलेला दिसून येतो. या नृत्याचा संबंध सर्जनशक्तीशी मानला जातो. हा सण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यांत उत्साहाने साजरा केला जातो. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये नागपंचमी हा सण कसा साजरा केला जातो, हे मी या लेखामधून सांगणार आहे, कारण माझं लहानपण ग्रामीण भागात गेल्यामुळे तिथले सण उत्सव बालमनात रुजले आणि कायम आठवणीत कोरले गेले. नागपंचमी सण हा स्त्रियांचा सण समजला जातो. त्यामुळे माझ्या विशेष आवडीचा. लहानपणी नागपंचमी सण पुढे चार-आठ दिवस असतानाच आजीबरोबर मी तुला बाजाराला जायची आणि नवीन कपडे, मेहंदी, नखपॉलिश असं नटण्याचं सर्व सामान घेऊन यायची. मग ते सर्व मैत्रिणींना दाखवताना काय मौज यायची म्हणून सांगू!

आता पंचमीचा सण आला की, सारं सारं आठवतं. कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेतील ओळी आठवतात आणि मन उदास होतं…
चार दिसावर उभा, ओला श्रावण झुलवा,
न्याया पाठवा भावाला, हिला माहेरी बोलवा…

लेकीला माहेरी बोलविण्यासाठी आईने केलेली गोड मागणी शांताबाईंच्या कवितेतून किती सुरेख पद्धतीने व्यक्त झाली आहेत.

पूर्वी नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू जायचा, तेव्हा त्या स्त्रीला माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी सासू-सासरे, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशा वेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सासूला म्हणते,
पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात न्यायला।
बंधू आल्यात न्यायाला, रजा द्या मला जायला।

पंचमी सणाला सासरी नांदणाऱ्या नववधूला माहेरावून भाऊ किंवा वडील घ्यायला यायचे त्याला मुऱ्हाळी असे म्हणतात. माहेरी आल्या की, मैत्रिणी सोबत मनमोकळ्या गप्पा आणि त्यासोबत उंच उंच झोके चढताना मिळणारा आनंद मनसोक्त माहेरचं सुख उपभोगायच्या. असं हे सासर माहेरचं स्त्रियांना असलेलं कौतुक सर्व गाण्यांमधून, जात्यावरच्या ओव्यांमधून व्यक्त होत असे. माहेरच्या श्रावणातलं सदैव मनाला वेडावणारं सुखाचं सरोवर. किती सुरेख आहे नाही…!

आजही या सिमेंटच्या जंगलात राहताना प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याची चाहूल लागताच मनात श्रावणी झुले झुलू लागतात.‌ लालचुटूक मेंदीच्या हाताचा तो ओला सुगंध मनात दरवळू लागतो आणि मन गावाच्या दिशेने धावू लागतं…

ज्वारीच्या लाह्याचा खमंग वास येऊ लागतो. दोन दिवसांवर पंचमी राहिली की, आई ज्वारी पाण्यातून काढून कपड्यात गुंडाळून ठेवायची. नंतर ती सावलीत सुकवायची याला ‘उमलं’ असं म्हणतात आणि मग चुलीवर मोठी कढई ठेवून त्यावर ज्वारीच्या लाह्या भाजायची. भाजताना येणारा तडतड आवाज आणि त्याबरोबर फुलून येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाह्या पाहिल्या की, कधी तोंडात जातील असं व्हायचं… मग लाह्या भाजून झाल्या की, नदीच्या कडेची चिकन माती आणून त्याचा नागोबा आम्ही तयार करायचो. नागोबाच्या अंगावर हळदीचे पिवळे ठिपके देऊन गुंजाचे डोळे लावायचे. या नागोबाची देवघरात नागपंचमीच्या दिवशी पूजा व्हायची. त्यावेळी असे रेडिमेड नागोबाचे चित्र, नागोबा मिळायचे नाहीत. देवघराच्या भिंतीला पोतेरा देऊन त्यावर आजी बोटाने नागोबाचं आख्खं कुटुंब काढायची. असं घरोघरी चाललेलं असायचं.

वडील किंवा चुलत्याच्या मागे लागून झाडाच्या‌ फांदीला झोका बांधायला लावायचा. या झोक्यावर झोके घेत पुढील कित्येक दिवस आनंद लुटत असू.

पूर्वी माझ्या लहानपणी गावात आमचा चौकाचा वाडा होता आणि वाड्यासमोर मोठं अंगण होतं. त्या अंगणात सडा टाकून त्यावर ठिपक्यांची सुरेख रांगोळी मी काढायची. काकू, आई संपूर्ण वाड्याची साफसफाई करायच्या. जमिनी शेणाने सारवल्या की, त्यावर छान त्यांची उमटलेली बोटं, यामुळे त्या परवराला वेगळंच सौंदर्य प्राप्त व्हायचं.

नागपंचमी हा सण तीन दिवस साजरा करतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्व स्त्रिया उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आजही आहे. घरची पूजा ऑटोपून गल्लीतल्या सर्व स्त्रिया सकाळी ओट्यावर जमा व्हायच्या. प्रत्येकीच्या हातात पूजेचं ताट असायचं. त्यामध्ये दूध, लाह्या, गूळ, हळदी-कुंकू आणि भिजलेली चण्याची डाळ ही सर्व पूजेची सामग्री घेऊन वारुळाला जायच्या. आईबरोबर मीही जायची. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वाटेत गवत वाढलेले असायचे. त्या गवतावर रानफुले फुललेली आणि त्या फुलावर रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना दिसायची. त्या वातावरणात मन उत्साहाने भरून जायचे. त्या गवतातून वाट काढत एकापाठोपाठ एक गाणी म्हणत वारुळापर्यंत जायच्या. तिथे गेल्यानंतर वारुळात दूध, लाह्या टाकून मनोभावे पूजा करायच्या. घरी यायला निघायच्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव म्हटलेले असायचे.

संध्याकाळी नागपंचमीच्या दिवशी गल्लीतल्या सर्व लहानथोर स्त्रिया अंगणात एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या…
आखाड माशी एकादशी
नागपंचमी कोणत्या दिवशी
नागपंचमीचा कानवला
पुढे उभा श्रावण पोळा
साजणे बाई…
आणखी एक गाणं मला थोडंसं आठवतं ते असं…
या गं सयांनो या गं बायांनो तुम्ही इथे बसा
श्रीकृष्णाला देवी निघाल्या रंग पाहा कसा
ग्रामीण भागातील स्त्रिया नागोबाला आपला भाऊ मानतात आणि त्यासाठी गाणेही म्हणतात.
नाग भाऊराया तुला वाहते दूधलाह्या
दर्शनाला येती शेजारच्या आयाबाया

हातात हात घालून गोल गोल फिरत एक एक पाऊल पुढे-मागे टाकत त्याला फेर धरणे असं म्हणतात. समोर वाकून अशा प्रकारची गाणी म्हणत त्याला फेराची गाणी असं म्हणतात. एक-दोन स्त्रिया पुढे चालीवर गाणी म्हणत आणि त्यांच्या पाठीमागे इतर स्त्रिया अशी विविध प्रकारची गाणी आजही म्हणतात. त्याबरोबर झिम्मा-फुगडी, पिंगा असे खेळ खेळायच्या शेवटी बसल्या की कोणीतरी म्हणायचं नाव घ्या गं… मग लाजून ओठातल्या ओठात हसत लहान-मोठे उखाणे घेत हळूच नवऱ्याचं नाव घ्यायचं. या सर्व उत्साहात कधी अर्धी रात्र उलटायची समजायचंही नाही. दिवसभर शेतात केलेल्या कामाचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. हे चार-पाच दिवस त्यांच्यासाठी मुक्त जगण्याचे असायचे. खेळ खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळं करायच्या.

पंचमीचा दिवस उजाडला की, सकाळपासून घरातली सर्व मंडळी तयारीला लागत असत. स्त्रियांची लगबग सुरू होत असे. देवघरात प्रथम नागोबाला दूध, लाह्या वाहून, मनोभावे पूजा करून, हात जोडून सुखी संसारासाठी, दिवस-रात्र शेतात काम करणाऱ्या धन्याला सुखी ठेव, दंश करू नको… अशी विनंती करून प्रार्थना करतात.

रात्री ओट्यावर बसून आम्हा मुलांना आजी कालिया नागाची गोष्ट सांगायची, म्हणायची… आजच्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागाची पूजा करण्याची प्रथा पडली. गोष्ट संपली की, आम्ही सर्व मनोभावे श्रीकृष्णाच्या व नागदेवतेच्या पाया पडायचो.

एकदा नागपंचमीच्या दिवशी आमच्या शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते, ती अशी… एका गावात एक शेतकरी राहत होता. शेतात आऊत हाकत होता. शेतात वारूळ होतं. त्या वारुळात नागाची पिल्लं होती. त्याच्या अवजारामुळे ती पिल्ले मृत्युमुखी पडली. त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला; परंतु शेतकऱ्याला याचा खूप पश्चाताप झाला. त्याने शंकराच्या मंदिरात जाऊन तपश्चर्या करून उःशाप मिळवला आणि नागदेवतेने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. तो दिवस ‘नागपंचमी’ म्हणून साजरा केला जातो, असेही म्हणतात.

या गोष्टीची आठवण म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगर चालवत नाहीत, कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाहीत, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियमांचे पालन आजही ग्रामीण भागात केले जाते. आमच्या गावामध्ये नागनाथांचे मंदिर आहे. तीन दिवस नागनाथांची यात्रा भरते. गावगावांवरून अनेक भाविक नागनाथाच्या दर्शनाला येतात.

पंचमीच्या दुसऱ्या दिवशी गावातील सर्व स्त्री-पुरुष-मुलं मंदिराच्या समोरच्या पारावर घरात पूजलेले नाग पाटावर सजवून एकत्र घेऊन येतात. परत इथे सामुदायिक नागदेवतेची पूजा करून दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व सर्वांचे संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. नंतर त्या पूजेच्या नागांचे नदीमध्ये पाण्यात विसर्जन करतात. या सर्वांतून श्रद्धेबरोबर मनातली भीतीही व्यक्त होते. याबरोबरच आणखी एक कारण असे आहे. श्रावण महिन्यात शेतात धान्यांनी भरलेली पिकं असतात आणि गवतही खूप वाढलेलं असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदीर होतात. उंदरापासून होणारा त्रास सापांमुळे कमी होतो. ‌नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. धान्याची नासाडी वाचावी म्हणूनही नागपंचमीच्या निमित्ताने कृतज्ञता म्हणून नागोबाची पूजा केली जात असावी. शेतात तरारून आलेल्या शेताकडे पाहून शेतकरी राजा सुखावतो‌. उंच उंच झोके घेऊन ‘नागपंचमी सण’ मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -