Share

निशिगंधा वाड, प्रसिद्ध अभिनेत्री

समुपदेशनाबाबत माझं मत सकारात्मक आहे. आजच्या काळात लोकांना अंतर्मुख होऊन जीवनप्रवास करण्याची किती गरज आहे, याची जाणीव झाली आहे. याची अनेक कारणं आहेत. व्यक्तिनिष्ठ बोलायचं झालं, तर लहानपणी बाहेरचं जग घरात इतकं डोकावत नव्हतं, असं वाटतं. घरातल्या संस्कारांचं गाठोडं पाठीवर, मनात घेऊन आपण बाहेरच्या जगाला सामोरं जात असू. पण आता संवादच खुंटला आहे. आज माणसं डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला बसली असली तरी, एकमेकांशी कमी आणि हातातल्या फोनशी जास्त बोलतात. हे चित्र आज घरोघरी बघायला मिळतं. अशा वेळी असं लक्षात येतं की, सामाजिक वास्तव आता ग्लोबल झालं आहे. माणसाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष यशप्राप्ती या दरम्यानच्या विविध पातळ्यांवर बरेचदा नैराश्याचा सामना करावा लागतो. यात वय, लिंग, जात, आर्थिक स्तर असा कोणताही भेद उरलेला नाही. सर्वच स्तरातल्या माणसांना या वैश्विक सत्याचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच समुपदेशनाची गरज आहे.

आता समुपदेशन म्हटलं की, कोणाकडून सल्ला घ्यायचा हाही एक प्रश्नच आहे. या गोष्टीची गरज आहे; पण या गरजेची पूर्ती योग्य माणसाकडून होते आहे किंवा नाही, हे पण तपासून बघायला हवं. मला नैराश्य आलं आहे किंवा मी नैराश्याला सामोरं जात आहे, असं म्हणायला लोकांना हल्ली संकोचायला होत नाही. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपणं किती गरजेचं आहे, हे आता लोकांना कळू लागलं आहे. त्यातही आपल्या भारतीय संस्कृतीची जमेची एक बाजू अशी आहे की, आपल्याकडे विचारांचं, संस्कारांचं अक्षय्य धन आहे. तसंच आपला विचार-आशय इतका संपन्न आहे की, दुसऱ्या बाजूकडे झुकताना आपल्याला असं वाटतं की, तो कोणाकडून मिळाला पाहिजे किंवा कोणी दिला पाहिजे. म्हणजे ती व्यक्तीसुद्धा तितकीच त्या विषयात सौष्ठवपूर्ण असायला हवी.

मला वाटतं की, वैयक्तिक परिघामध्येही लोक आता मोकळेपणाने बोलतात. मुलं आणि तरुणांमध्येही याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आपल्याला मदतीची गरज आहे, याची जाणीव त्यांना झाल्याचं पदोपदी दिसून येतं. यात त्यांना काही वावगं वाटत नाही. पण एक कुटुंब म्हणूनही आपण त्याबद्दल अंतर्मुख होणं, आवश्यक आहे. मुलांना किंवा कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला समुपदेशनासाठी बाहेर जाण्याची गरज का बरं भासावी, त्यांना घरातच हा आधार आणि समुपदेशन का बरं मिळू नये, नात्यांमधला तो हळवेपणा पुन्हा एकदा यायला हवा आहे. ते एकमेकांमधलं बॉंडिंग, एकमेकांविषयी वाटणारी काळजी, एकमेकांना थोडा वेळ देणं आवश्यक आहे. वेळ देणं म्हणजे आई-वडिलांनी मुलांना नाही, तर मुलांनीही आई-वडिलांना वेळ द्यायला हवा. तसं झालं तर ती सुद्धा एक प्रकारची मदत ठरू शकते. गंमत म्हणून आपण असं म्हणू की, माणूस पूर्वी घोड्यावर स्वार व्हायचा. म्हणजे माणसाने निसर्गावर राज्य करायला सुरुवात केल्यानंतर तो घोड्यावर स्वार होऊन फिरू लागला. पण ज्यांच्याकडे अधिक जबाबदारीची पदं होती, त्यांच्या रथाला अनेक घोडे होते. त्याचप्रमाणे नाती समजून घेतली, तर आपल्या या अनेक अश्वांच्या रथाला चांगला सारथी मिळू शकतो.

आज आपण अनेक आघाड्यांवर लढत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. बायका एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळताना दिसतात. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या निभावताना त्यांची तारांबळ उडत असते. पण या विशिष्ट वयातल्या महिलांच्या मानसिकतेविषयी समाजात फारसा विचार होताना दिसत नाही. आपण महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करतो. पण त्यांच्या मानसिक आरोग्याकडे तितक्या सहजपणे पाहिलं जात नाही. आज कारकिर्दीत वेगाने पुढे जात असताना महिलांना या समुपदेशनाची किती गरज आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा. याकडे फार सुजाण दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. मी स्वत: कोणाला उपदेश करण्याच्या हेतूने बोलत नाही; मात्र या दृष्टिकोनातून आता थोडीफार संपन्नता निर्माण झाली आहे, असं मला वाटतं. त्यातच बॉलिवूडमधले कलाकार याबाबत जागरूकता निर्माण करत आहेत. नैराश्यावर बोलायला हवं, असं आवर्जून सांगत आहेत. हे सगळं खूप सकारात्मक आहे.

अर्थात, लोकांचा नैराश्याबद्दलचा किंवा मानसिक आरोग्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन नव्या बदलाची नांदी असला तरी मला असंही सांगावंसं वाटतं की, प्रत्येक वेळेला बाहेरून मदत घेऊ नका. आपल्या आत डोकावण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं वाचा. वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचनामुळे आपण समृद्ध होत असतो. मला कोणत्या तरी माणसाच्या खुर्चीतच जाऊन कशाला बसायला पाहिजे किंवा कुठल्या सभागृहात जाऊनच कशाला बोलायला पाहिजे? अर्थात तेही करा, त्यात काही वावगं नाही. पण स्वत:पासून सुरुवात करायला काय हरकत आहे? चांगलं वाचा. अत्यंत संपन्न अशा संस्कृतीचा वारसा आहे आपल्याकडे. त्यामुळे जे आवडेल ते वाचा. आपल्याकडे सुरेख गाणी आहेत. ती ऐका. मराठी भाषेची श्रीमंती आणि समृद्धी थोडी अनुभवा. ही सुद्धा एक प्रकारची स्वमदतच आहे, नाही का? यामुळेही आपलं समुपदेशन होत असतं. आपण स्वत:च स्वत:मध्ये बदल करून बघायला काय हरकत आहे? मला गरज आहे, मी मदत घेत आहे हे म्हणण्यात काहीच चूक किंवा वावगं नाही. हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मी ते स्वत:साठी आणि ज्यांच्यासाठी जगते आहे, त्यांच्यासोबत सुंदर पद्धतीने व्यतीत केलं पाहिजे.

समजा, आपल्याला आपल्या मुलाने किंवा मुलीने सांगितलं की, मला अमूक एक त्रास होत आहे आणि मदतीची गरज आहे, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. त्याला किंवा तिला काही तरी गंभीर आजार झाला आहे, असं समजून कोणासमोर काही बोलू नकोस, गप्प बस असं अजिबात सांगू नये. उलट, आपणच त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. प्रत्येक नात्याकडे मोकळेपणाने बघावं आणि आपल्या नात्यात काही उणं राहिलं आहे का, हे तपासूनही बघावं. फुलाचा सुगंध फुलातूनच उगम पावतो आणि दूरपर्यंत पसरतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वत: अंतर्मुख होऊन थोडा विचार करण्याची आज गरज आहे, असं मला वाटतं आणि लोक या मार्गाने प्रवास करत आहेत. आणखी एक मुद्दा म्हणजे, आपल्याला समुपदेशनाची गरज आहे किंवा नाही हे आपण स्वत: ठरवायला हवं; इतरांवर अवलंबून राहू नये. आपण स्वत:शी प्रामाणिक असायला हवं. तुम्ही स्वत:ला जिंकलं तरच जग जिंकू शकता आणि तेच समुपदेशन आहे, असं मला वाटतं. समुपदेशन या शब्दात ओमकार आहे. पूर्ण स्वरूपी स्वत:चा विकास आणि त्याला एका चांगल्या ज्ञानाचं अधिष्ठान असायला हवं.

Recent Posts

Nitesh Rane : निवडणूक आयोगाला प्रश्न विचारुन संजय राऊतने अकलेचे तारे तोडू नयेत!

आमदार नितेश राणे यांचा राऊतांना खोचक सल्ला उद्धव ठाकरे आम्हाला शिव्याशाप देऊन आमचंच मताधिक्य वाढवतात…

1 hour ago

अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणार या ३ राशींचे चांगले दिवस, सोन्याप्रमाणे चमकणार नशीब

मुंबई: अक्षय्य तृतीया यंदाच्या वर्षी १० मेला साजरी केली जात आहे. यावेळेस अक्षय्य तृतीयेला गुरू-चंद्राच्या…

1 hour ago

पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे निवडून येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास प्रचंड शक्तिप्रदर्शनासह डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कल्याण…

2 hours ago

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…

2 hours ago

Amit Shah : निकालाच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या आधी ४०० पारचं लक्ष्य पार करणार!

भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा नवी दिल्ली : लोकसभा…

2 hours ago

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले…

2 hours ago