Sunday, May 19, 2024
Homeमहामुंबईमनसेतर्फे भांडुपमध्ये गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन

मनसेतर्फे भांडुपमध्ये गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून व‌ अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे विद्यार्थी सेनेतर्फे भांडुपमध्ये भव्य गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे.

दीपावलीनिमीत्त आयोजित या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला आणि छोटे किल्लेदार असे दोन गट केले आहेत. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘शिवचरित्र’ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच खुला गटासाठी प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये, दुसरे पारितोषिक ३३३३ रुपये, तृतीय पारितोषिक २२२२ रुपये देण्यात येणार आहे. तर छोटे किल्लेदार यांच्यासाठी प्रथम पारितोषिक २००१ रुपये आणि दुसरे पारितोषिक १००१ रुपये देण्यात येईल.

सदर स्पर्धेत नोंदणीसाठी अखेरची तारीख २६ ऑक्टोबर २०२२ असून स्पर्धा परिक्षणाचा कालावधी २९ आणि ३० ऑक्टोबर २०२२ असा असणार आहे.

किल्ल्यांची मांडणी ही शिवकालीन असावी, व परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. अधिकृत स्पर्धेची नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मिलिंद करंजे (८३६९५९५९९७), सचिन पाटणकर (८३६९८९४२१४) यांच्याशी संपर्क साधावा.

या स्पर्धेत स्पर्धकांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती व्हिडीओ क्लीपच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहोचवता येतील. घराशेजारी, आवारात गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याची परंपरा आहे. युवांमध्ये एक संघटनात्मकता व सकारात्मकता निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांच्यात सृजनशीलता निर्माण व्हावी, आपला सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच ऐतिहासिक महत्व दृढ व्हावे हा स्पर्धा आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.

गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभणार आहेत. तसेच स्पर्धेचे नियोजन मिलिंद करंजे, अमित मुरकर, अमोल पवार, सर्वेश सावंत, सचिन पाटणकर, जनार्दन सावंत यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य अमोल साळुंके यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -