Friday, May 17, 2024
Homeरविवार विशेष‘मीरे’चा सूर...

‘मीरे’चा सूर…

आपल्या प्रत्येकाचा वर्तमानातला जन्म हा पूर्व जन्मजन्मांतरीच्या संचितावर अवलंबून असतो, असं मानलं जातं. ते खरंही असावं. आपला जन्म कुठल्या घरात होतो, कुठले संस्कार होतात, आयुष्यात आपण काय करतो, कोणाकोणाशी आपला संपर्क होतो, या साऱ्या ऋणानुबंधाच्या गाठी असतात. अनेकदा अनेकांना, आयुष्यभर प्रयत्न करूनही असाध्य राहणारी गोष्ट, कुणा एखाद्याला अगदी पोरवयात साध्य होते. विधात्याकडून गोड गळ्याची देणगी प्राप्त झालेली तामिळनाडूतल्या वेल्लोरची मुलगी कलैवाणी, अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षीच शास्त्रीय संगीतातल्या रागदारीतला भेद जाणू लागते आणि वयाच्या आठव्या वर्षी तत्कालीन आकाशवाणी मद्रास केंद्रावरून तिचं गायन प्रसारितही होतं. हे सगळं अकल्पित, अचंबित करणारं असलं तरी सत्य आहे. या मुलीच्या बारशाच्या दिवशीच ज्योतिषानं पुढे ती मोठी गायिका होईल, असं भविष्य कथन केलं होतं. त्याला साजेसं नाव ठेवावं, असंही वडिलांना सुचवलं होतं. म्हणून या मुलीचं नाव कलैवाणी म्हणजे कलावती, बुद्धिमती ‘माँ सरस्वती’ ठेवण्यात आलं. घरी त्याचं लघुरूप वाणी झालं. निव्वळ गायन, संगीतच नाही, तर पेंटिगचाही व्यासंग असलेल्या कलैवाणीनं आकाशवाणीपासून चित्रवाणीपर्यंत आपलं नाव सार्थक केलं. पाणिग्रहणानंतर वाणीला जयरामची जोड लाभली. विलक्षण गोड गळा, सर्व सप्तकातून फिरणारा आवाज, उत्कृष्ट स्वर नियमन, सुरेल हरकती, तानकाम तसेच अनवट रचना लीलया गाण्याच्या वैशिष्ट्यांमुळे चित्रपटसृष्टीत सुवर्ण महोत्सवी कारकीर्द वाणी जयराम यांनी गाजवली. दक्षिणेवर तर १२ वर्षे त्यांचं अधिराज्य होतं. या दक्षिणी लतेनं तमिळ, कन्नड, मल्याळमसह राजस्थानी, गुजराथी, ओडिसी, बंगाली, मराठी आणि हिंदी भाषेत गायलेली कित्येक गाणी रसिकांच्या हृदयात आजही गुंजन करतात. वाणीनं कर्नाटक संगीतचा व्यासंग करावा, असा आईचा आग्रह होता. मात्र तिचा अनुराग जुळला चित्रपट संगीताशी. सिलोन रेडिओवर आपलं गाणं लागावं, असं या लहान गुड्डीचं स्वप्न होतं. योगायोग असा की, वाणी यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणातल्या ‘गुड्डी’ या चित्रपटातल्या ‘बोले रे पपीहरा’ या गाण्याची सिलोन रेडिओने त्याकाळी अक्षरशः पारायणं घातली आणि वाणी जयराम यांची स्वप्नपूर्ती झाली.

बोले रे पपीहरा
‘गुड्डी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी त्यांना हिंदीत पहिली संधी दिली होती. ऋणानुबंध कसा असतो बघा. १९६९ च्या सुमारास त्यांचा वसंत देसाई यांच्याशी परिचय झाला होता. त्यांचा आवाज ऐकून, देसाई यांनी कुमारजीं (पंडित कुमार गंधर्व) बरोबरच्या एका मराठी गाण्यासाठी वाणी जयराम यांना विचारले आणि तिथेच ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या. वसंत देसाई या मराठी संगीतकारानं कुमारजी आणि वाणी जयराम या दोन दक्षिणी गायकांकडून, रसिकांना अक्षय तुष्टता देणारं मराठी गीत दिलं, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत रुष्टता मोठी’. या नाट्यपदाव्यतिरिक्त ‘माळते मी माळते’, ‘उठा उठा हो सूर्य नारायण’ अशी काही चित्रपट गीतं, पाडगावकरांची ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, कुसुमाग्रजांची ‘हळूच या हो हळूच या’ ही बालगीतं, ‘बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींचं स्फूर्तिगीत, काही भावगीतं आणि भक्तिगीतं गाऊन त्यांनी ती चिरंतन केली.

वाणी जयराम यांना भक्ती संगीतात अधिक रस होता. पार्श्वगायन सुरू करण्याआधीपासूनच त्या भक्ती संगीत गात होत्या. १९७९ साली संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मीरा’ चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक होते गुलजार. वाणी जयराम यांच्या सुरात गुलजार यांना मीरा गवसली. वाणी जयराम यांना घेऊन ते या चित्रपटाचे संगीतकार पंडित रविशंकर यांच्याकडे गेले. पंडितजींनाही हेमा मालिनी साकारत असलेल्या मीरेसाठी वाणी यांचा आवाज रुचला आणि इतिहास घडला. या चित्रपटातल्या मीराबाईंच्या रचना पंडितजींनी अद्भुत प्रासादिक स्वरसाजानं सजविल्या. वाणी जयराम यांच्या भावपूर्ण आणि अभिजात गायकीनं त्या अधिकच उठावदार झाल्या. ही भजनं गाताना त्या मीरारूपच होऊन गेल्या. ‘मीरा विरहिणीच्या भावशब्दांत, कलैवाणीचा सूर झाला अद्वैत’. चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार यांची निवड त्यांनी संपूर्ण सार्थ ठरवली.

तत्कालीन मद्रासमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आकडेमोडीची खातेसुमारी करणाऱ्या वाणी, लग्नानंतर बदली घेऊन मुंबईत आल्या. गुणग्राहक पती जयराम यांनी त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकण्यास प्रवृत्त केलं. नेहमीच यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं नव्हे, तर कधी कधी यशस्वी स्त्रीमागे पुरुषही असतो, असं म्हणता येईल. वाणी जयराम यांनी उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडे तालीम सुरू केली. संगीताशी संगत करण्याच्या निर्धार करून, त्यांनी विशेष रुची नसलेल्या आकडेमोडीबरोबर काडीमोड घेत, संगीत पेशालाच
गळ्याशी घेतलं.

‘गुड्डी’च्या यशानंतर चित्रगुप्त, मदन मोहन, ओ. पी. नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, एस. एन. त्रिपाठी, सी. रामचंद्र, जयदेव, नौशाद, आर. डी. बर्मन यांच्यासारख्या प्रतिथयश संगीतकारांबरोबर वाणी जयराम यांनी संगीतकाम केलं. मात्र एक एक गाण्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अधिक गाणी मिळाली नाहीत. बऱ्याच काळानंतर गुलजार यांनी त्यांच्या मीरा फिल्मसाठी वाणी जयराम यांना साद घातली. या चित्रपटातली सर्व १४ गाणी वाणी जयराम यांनी गायली. ‘मेरे तो गिरिधर गोपाल दुसरों न कोई’ या रचनेसाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना देण्यात आला. १९७४ साली मुंबईहून चेन्नईला (मद्रास) आल्यावर एम. एस. विश्वनाथन, एम. बी. श्रीनिवासन, के. व्ही. महादेवन, एम. के. अर्जुनान, जेरी अमलदेव, इलयराजा या दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी स्वरकाम केलं.

वाणी जयराम या स्वरसाधनेप्रमाणेच गृहसाधनाही दक्षतेनं करतात, ही विशेष बाब म्हटली पाहिजे. दैनंदिन जीवनात अत्यंतिक साधी दिनचर्या आचरत असलेल्या वाणी एखाद्या सामान्य गृहिणीप्रमाणे स्वयंपाकापासून ते साफसफाईपर्यंत सर्व कामे स्वतःच करतात. गाण्याव्यतिरिक्त चरित्रं, आत्मचरित्रं आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचनात त्यांना रुची आहे. हंस पक्ष्याप्रमाणे नीरक्षीर विवेक ठेवून यातून बरेच काही शिकता येतं, असं त्या मानतात. ईश्वरासमोर आपण सर्वजण समान असल्याचं त्या सांगतात आणि उच्चनीचता बाळगणं गैर मानत त्यानुसार आचरणही करतात. लहानपणी वाढदिवशी आईच्या वयाच्या, त्यांच्या घरी घरकाम करणारीलाही त्या वाकून नमस्कार करीत.

पार्श्वगायन सुरू करण्याआधीपासूनच भक्ती संगीत गात असलेल्या वाणी जयराम यांनी आपल्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जाणिवेनुसार, निखळ शुद्ध भक्ती संगीतावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. आपल्या परीनं ते प्रचलित करण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. तमिळ, हिंदीत कविता करत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. दासी होकर तेरी मैं उदास कैसे रहू प्रभू, बस आसपास के लोगों ने मुझे प्यार के बदले मे जहर पिलाया, चाहे सारा जग रुठे, राह ना बदलो आ प्रभू’ अशा शब्दांतून त्या आत्मकथन करतात. ७४व्या गणराज्य दिनी या गानसरस्वतीला पद्मभूषणाची महिरप लाभल्यानं त्यांचा यथायोग्य सन्मानच झाला आहे.

-नितीन सप्रे

(टीप : लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी. न्यूज, (दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत.)
nitinnsapre@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -