Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMemory : स्मरणशक्ती

Memory : स्मरणशक्ती

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

एखाद्या गोष्टीची आवड निर्माण केल्यावर ते काम मग अभ्यास असो वा कला त्यात आपण निपुण होतो. विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटे किंवा त्यांना माहीत असलेल्या एखाद्या गोष्टीशी निगडित करून शिकवले, तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. जसे एखादे गाणे सतत कानावर पडल्याने ते आपल्याला पाठ होते तसेच एखाद्या गोष्टीला सातत्याने वेळ दिला की, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.

लहानपणी शाळेत किंवा गणपतीच्या कार्यक्रमात एक खेळ खेळला जायचा किंवा त्यास ‘स्पर्धा’ म्हणूया. एका टेबलावरच्या काही वस्तू दाखवल्या जायच्या आणि त्या लक्षात ठेवून त्या लिहून काढायला सांगितल्या जायच्या. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वस्तूंची नावे कशी लिहिता येईल, यासाठी बुद्धीला अशी सवय करण्यासाठी अशा प्रकारचा खेळ घरच्या घरी खेळून आम्ही या स्पर्धेत भाग घ्यायचो.

बुद्धिमत्तेला चालना मिळावी असे अनेक खेळ होते. त्यापैकीच एक हा ‘स्मरणशक्ती’ वा ‘स्मृती’ वा ‘मेमरी’ खेळ. सोबती कोणत्या प्रकारचे इतर स्पर्धक आहेत त्यावर आपण निवडून येणे, न येणे अवलंबून असायचे. माझ्या आठवणीप्रमाणे जेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत मी भाग घ्यायचे, तेव्हा मला कधीच स्पर्धेत बक्षीस मिळायचे नाही; परंतु आमच्या सोसायटीतल्या गणपतीच्या काळात घडवून आणलेल्या स्पर्धेत भाग घ्यायचे, तेव्हा हमखास पारितोषिक मिळायचे.
हा खेळ खेळून झाल्यावर एकदा आमच्या सोसायटीतल्या एका वयस्कर गृहस्थाने आम्हाला विचारले की, टेबलाच्या बाजूच्या खुर्च्यांवर काय ठेवलेले होतं? आमच्यापैकी एकही जण उत्तर देऊ शकलो नाही. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्ही बरोबर आठवलेत, तरच ते तुम्हाला मिळणार! आम्ही सगळ्यांनी बुद्धीला जोर दिला. टेबलाच्या बाजूच्या खुर्च्यांवर काय होते, हे एकही जण बुद्धीला जोर देऊनही सांगू शकले नाही. त्यामुळे त्या खुर्च्यांवर काही मिठाईचे बॉक्स, काही खेळणी ठेवलेली होती, ती आमच्यापैकी कोणालाही मिळू शकली नाही.

मला इथे हे सांगायला आवडेल की, आयुष्याचेही असेच आहे. आपल्याला कधी कधी जबरदस्तीने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले जाते, त्यात आपण थोडेफार सफल होतो नाही. पण या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक इतर चांगल्या गोष्टींपासून आपण वंचित होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीत लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते की, कुठेही गेल्यावर चौरस नजर महत्त्वाची असते, यावर प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकाची दृष्टी या संदर्भातील वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कधी कुठे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचा आणि कुठे व्यापक दृष्टी ठेवून जग अनुभवायचे, हे आपले आपल्यालाच ठरवावे लागेल.

या संदर्भात अजून एक उदाहरण मला प्रामुख्याने द्यायला आवडेल की, आजकालच्या काळात लहान मुले मोबाइल अत्यंत उत्तमरीत्या हाताळतात. मोबाइलवर कोणतीही गोष्ट शोधून काढणे असो वा कोणताही खेळ खेळणे असो त्यातील त्यांची गती वाखाणण्याजोगी असते; परंतु त्यांना एखादी कविता पाठ करायला सांगा ती महिनोन्-महिने त्यांची पाठ होत नाही. इथे परत प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे का? तर ही सर्व मुले बुद्धिमानच असतात; परंतु बुद्धीचा वापर त्यांना काही ठिकाणी करता येत नाही. याचे मी कारण शोधून काढले.

आपल्याकडे म्हटलं जाते की, आवड असली की सवड मिळते. त्याच धर्तीवर मला इथे सांगायचे आहे की, एखाद्या गोष्टीची आवड निर्माण केली, त्या गोष्टीची सातत्याने सवय लावून घेतली की, ते काम मग अभ्यास असो की कोणतीही कला यात आपण निपुण होतो. यासाठीच शिक्षकांना त्यांच्या अभ्यासक्रमात काही विविध प्रकारची शिकवण्याची साधने (Teaching Aids) वापरण्यास सांगितले जाते. विद्यार्थ्यांना उत्सुकता वाटेल त्यांचे लक्ष आकर्षित होईल किंवा त्यांना माहीत असलेल्या एखाद्या गोष्टीशी निगडित करून शिकवले, तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि हा फायदा शिक्षक करून घेतातच! आयुर्वेदाप्रमाणे मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी त्यांना बदाम खाऊ घाला असे सांगितले जाते, असे माझ्या वाचनात आलेले आहे. त्याचा कितपत फायदा होतो हे मला तरी माहीत नाही. पण आजच्या मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही गोष्ट परत परत करून घेण्याची गरज आहे. इथे फक्त अभ्यासाबद्दल जर बोललो, तर जे वर्गात शिकले ते आई-वडिलांनी घरात करून घेण्याची गरज आहे.

क्लासेसमध्ये करून घेण्याची गरज आहे; हे जरी खरं असले तरी तसे घडताना दिसत नाही आणि त्यामुळे शिकलेले विस्मृतीत जाते. एखाद्या मालिकेचे गाणे किंवा सिनेमातले गाणे परत परत कानावर पडते आणि ते आपल्याला पाठ होते आणि नकळतपणे आपण ते गुणगुणतो, त्यातील कुठचाही शब्द चुकत नाही सूर चुकत नाही. याचे कारण मुळी आपण सातत्याने ते कळत-नकळतपणे आपल्या कानावर पडते आणि पाठ होते. त्यामुळे अभ्यास असो, कला असो किंवा क्रीडा असो सातत्य, पुनरावृत्ती ही फार महत्त्वाची असते. कमी अभ्यास केला तरी चालेल, पण सातत्याने तोच तोच अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्रगती महत्त्वाची आहे; परंतु तर ती जर कासवाच्या गतीने झाली, तर ती जास्त का टिकून राहते. त्यामुळे एखाद्या गोष्टीला वेळ द्या. परत परत वेळ द्या! अभ्यास असो वा कला कौशल्य याविषयी जरी ऊहापोह करण्याचा मी प्रयत्न केला असेल तरी हेच मला नातेसंबंधांविषयीही अप्रत्यक्षपणे सांगायचे आहे!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -