Sunday, June 16, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेDombivali MIDC Fire : डोंबिवली स्फोटाने हादरली! सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू

Dombivali MIDC Fire : डोंबिवली स्फोटाने हादरली! सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्फोटाच्या भीषण आवाजानंतर काही वेळातच आगीचे व धुराचे लोळ परिसरात पसरले होते. या भीषण स्फोट दुर्घटनेत सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर स्फोटात जखमी झालेल्या ५८ जखमींना डोंबिवलीतील एम्स, नेपच्यून, ऑरिदम, शास्त्री नगर, ममता, गजानन, शिवम या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. यापैकी ६ कामगारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १७ गाड्या, १२ पाण्याचे टँकर, ८ ते १०ॲम्ब्युलन्स, पोलीस, एनडीआरएफ, टीडीआरएफ, केडीएमसी अधिकारी कर्मचारी वर्गाने धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण व धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवताना कसरत करावी लागली. हा स्फोट इतका भीषण होता की,आजूबाजूच्या सप्तवर्णा, अंबर, ओमेगा,डेक्कन आदी ८ ते १० कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यातील काही कामगारही जखमी झाले आहेत. कंपनीपासून जवळच असलेल्या कल्याण शीळ रोडवरील शोरूम्स,सोनारपाडा आणि सागाव येथील अनेक फ्लॅट्स, घरे आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, उद्योगमंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ३ ते ४ किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

स्फोटात जाखमी झालेल्यांमध्ये ओमेगा, श्रीनिवास, कॉसमॉस, डेक्कन, पीमको, चावरे इंडस्ट्री, महाल प्रिंटिंग प्रेस, शक्ति एन्टरप्रायजेस, मॉडेल इंडस्ट्री, राज सन्स इंडस्ट्री, टेक्नॉ फायबर आदि कंपनीतील कर्मचारी जखमी झाले आहेत. नेपच्यून हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केलेल्या प्रतीक वाघमारे, रुदयांश दळवी (५ वर्ष) यांना उपचारानंतर सोडण्यात आले. राजन गोठणकर, अक्षता पाटील यांना सिटी स्कॅनसाठी पाठविण्यात आले होते. राजन गोठणकर हे डोंबिवलीतील गांधी नगर येथे राहण्यास असून ते आपल्या शुद्ध लाइट्स या कार्यालयात बसले होते. झालेल्या स्फोटाच्या आवाजाने ते जखमी झाले आहेत.

काल्हेर येथे राहणारे किशोर विसपुते हे कंपनीच्या बाहेर आपल्या चारचाकी गाडीत बसले असता, स्फोटामुळे गाडीच्या काचा फुटल्याने शरीरात काचा घुसून ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ आयसीयु मध्ये ठेवण्यात आले आहे. अंबर कंपनीत कामाला असणाऱ्या बदलापूर येथील मधुरा कुलकर्णी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. जासई येथे राहणारे बबन देवकर हे तुळजापूर येथून मळी घेऊन एसडीए इंडस्ट्रीज येथे रिकामी करत असतांना स्फोट झाल्याने ते जखमी झाले असून स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता कि त्यांना कानठळया बसल्या असून एका कानाने ऐकू येत नाही. तर त्यांचा दूसरा सहकारी टँकर रिकामी करून बाहेर गेल्याने तो या स्फोटातून वाचला आहे. हेमांगी चौक या मुलुंड येथे राहणाऱ्या ब्रिक्स केमिकल कंपनीत ऑफिसमध्ये काम करीत असतांना स्फोटाच्या हादऱ्याने ऑफिसचे पीओपी सीलिंग कोसळल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तर याबाबत नेपच्यून हॉस्पिटलचे डॉ. राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता २०१२ पासून डोंबिवली एमआयडीसी परिसरातील हा चौथा स्फोट असून स्फोटाच्या तिव्रतेमुळे शीळ रोडवरील घरे, दुकाने यांच्या काचा फुटल्याचे सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -