राष्ट्रीय सेवा योजना इतरांसाठी चांगलं करा

Share

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

शाळा, कॉलेजमध्ये डिसेंबर हा कला, क्रीडा महोत्सवाचा महिना. परीक्षा नाहीत तसे सारेच उत्साही. वातावरणात सुखद गारवा, नाताळची सुट्टी, ट्रेकिंगला कुठे जायचे? चालू वर्षाला निरोप, नव्या वर्षाचे स्वागत कसे करायचे?, ही खलबते कॉलेज कट्ट्यावर रंगतात. अशा अल्हाददायक वातावरणात आधीच्या काही वर्षांत तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी एका दिवसासाठी एन.एस.एस.च्या कॅम्पला भेट देण्याचा योग आला होता. त्यानिमित्ताने एन.एस.एस.ला उजाळा देण्याचा माझा प्रयत्न. ‘इतरांसाठी चांगलं करा’.

एन.एस.एस. -‘राष्ट्रीय सेवा योजना अर्थात National Service Scheme.’ भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत शाळा, कॉलेजच्या ११वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना समुदायिक सेवा देण्यासाठी अनुभव प्रदान करणे आहे. एन.एस.एस.चे मुख्य उद्दिष्ट, ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातल्या प्रश्नांची ओळख करून देणे, जागृती निर्माण करणे. युवकांमध्ये जबाबदार नागरिक ही भावना विकसित करणे. यासाठी वर्षभर कार्यक्रम आणि लहान कालावधीसाठी शिबीर आखले जातात. एन.एस.एस.चे बोधवाक्य ‘Not Me But You, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी/समाजासाठी’. बोधचिन्हातील गोलातील चाक काळाची गती दर्शविते, नेव्ही ब्लू रंग विश्वाला सूचित करतो. एन.एस.एस.चा स्वयंसेवक मानवजातीच्या कल्याणासाठी आपला वाटा देण्यास तयार आहे. गतीमान चक्रातील लाल रंग म्हणजे युवकांचा सळसळता उत्साह होय.

विद्यार्थ्यांनो! एन.एस.एस.मध्ये स्वतःला, स्वतःबरोबर समाजाला ओळखण्यासाठी रोजची चौकट मोडून, समाजातील प्रत्येकाशी मोकळ्या श्वासाने, पूर्वग्रह दूषित न ठेवता मोकळ्या मनाने, विशाल दृष्टीने अनेकांचे जीवनमान पाहा. त्याचे प्रश्न ऐका, संवाद साधा, समजून घ्या, जमेल तेवढी मदत करा, मार्गदर्शन करा. तुमचा स्वतःचा आयाम, परिघ जेवढा वाढेल तेवढे तुम्ही समृद्ध व्हाल. महाराष्ट्रात समाजधुरिणींची मोठी परंपरा आहे. आताचे कुष्ठरोग निर्मूलनाचे बाबा आमटे यांचे आनंदवन, आरोग्यसेवा-दारूबंदी गडचिरोली येथे राणी-अभय बंग, एड्सग्रस्त मुलांचे घर, नगर येथील गिरीश-प्राजक्ता कुलकर्णी यांचे स्नेहालय, मेळघाटातील बैरागडमध्ये आदिवासींचे वैद्यकीय आणि सारे प्रश्न सोडविणारे स्मिता-रवींद्र कोल्हे, अंधश्रद्धा निर्मूलनचे नरेंद्र दाभोलकर, नर्मदा बचावच्या मेधा पाटकर, अण्णा हजारे…
युवकांनो यांची कार्य वाचा. ज्यायोगे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. वरील सर्व आपले सर्वस्व झोकून समाजातील एखाद्या घटकासाठी काम करणाऱ्यांची ही उदाहरणे अाहेत. असे अनेक आहेत. त्यांची रक्तच वेगळी असतात. विद्यार्थ्यांनो एन.एस.एस.मध्ये फक्त गुणांसाठी किंवा प्रमाणपत्रांसाठी नव्हे, तर डोळस होण्यासाठी प्रवेश घ्या.

आजचा युवक आत्मकेंद्री झाला आहे, चंगळवादी आहे, अशी युवकांवर टीकाटिप्पणी होते; परंतु बरेच युवक वेगळी वाट धुंडाळताना दिसतात. उदा. अमेय फाऊंडेशन, आशा एज्युकेशन. स्वतःला विचारा, यात मी कुठे आहे? दोस्तांनो! खाली एन्जॉय, इसीसे लाइफ नही बनती! कुछ करके दिखाना है, कुछ करना है! हेच आजच्या लेखाचे मिशन आहे. ‘एन.एस.एस. – इतरांसाठी चांगलं करा.’
स्वतःच्या पलीकडे बघणाऱ्यांची, आव्हाने पेलणाऱ्या युवकांची संख्यासुद्धा खूप आहे.

१. शालेय शिक्षणाला वंचित राहणारी, प्रवरा नदीच्या काठी वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजूर मुलांना आर्थिक मदत करीत शिक्षणाची वाट दाखविणारा ऊस कामगाराचा मुलगा, संगमनेरचा प्राथमिक शिक्षक सुखदेव किसन इल्हे. दिवसातून एका तरी व्यक्तीला आधार दिल्याशिवाय अंथरुणाला पाठ टेकवायची नाही, असा इल्हे सरांचा शिरस्ता. दुर्बल व्यक्तींच्या मदतीसाठी सतत झटणारे ते व त्यांची आधार संस्था.

२. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात २००४पासून परिस्थितीचे लक्ष्य ठरलेल्या अंदाजे ५० मुलांचे ब्रह्मचारी पालकत्व स्वीकारले आहे. त्या युवकाचे नाव संतोष गर्जे. अनिल कपूरचा मिस्टर इंडिया हा चित्रपट नव्हे, खराखुरा मिस्टर इंडिया संतोष गर्जे.
असेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे दोन युवक. एक म्हणजे घरातूनच वकिलीचा वारसा मिळालेले ऋषिकेश दातार यांनी लहान वयातच अनेकांना परवडेल, अशी खात्रीशीर सोप्या पद्धतीने कायदेशीर सल्ला देण्यासाठी ‘वकील सर्च डॉट कॉम’ ही स्वतःची संस्था सुरू केली. आणि दुसरे म्हणजे अपघातात जखमी झालेल्या प्राणी-पक्ष्यांवर उपचार करून त्यांना निवारा देण्यासाठी गणराज जैन यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १४ वर्षांपूर्वी ‘पाणवठा’ ही संस्था काढली. आजपर्यंत ४५००पेक्षा अधिक प्राणी-पक्ष्यांवर यशस्वी उपचार केले. येथेच न थांबता प्राण्यांचे महत्त्व, जंगलातील वणवा आदी प्रश्नांवर प्रबोधन करतात.

मुंबईत अनेक वेळा स्वयंस्फूर्तीने कॉलेज युवक आणि सेवाभावी नागरिक एकत्र येऊन समुद्रकिनारे, गड-किल्ले साफ करतात. कोणतीही संघटना किंवा अभियान नाही की सचिव -अध्यक्ष अशी पदे नाहीत. प्रत्येकाच्या स्वतःच्या व्यापामुळे या कामात सातत्य राहत नाही. जिथे परिवर्तन घडवून आणायचे आहे, तेथे कुणाचीही वाट न पाहता दोन-चारजण एकत्र येऊन काम सुरू करताच जनसमुदाय सहभागी होतो. मग मीडिया, शासन दखल घेते.

विधायक कार्य करणारी संस्था एका जिल्ह्यापुरती किंवा गावापुरती मर्यादित राहिल्यास परिसरापुरते तरी काम नियमितपणे, नीटपणे होऊ शकते. प्रत्येक जुन्या खेड्यात, शहरात जनसेवेसाठी उभारलेली महाविद्यालये, रुग्णालये, पाणपोया अन्य काही साधने, अशी कामे सुरू केली जातात, नंतर त्यांची अवस्था, व्यवस्था पहिली जाते का? नव्याने भर पडते का? हे पाहिलेच जात नाही. हे काम एकट्या दुकट्याचे नाही. वाचा फोडायला येथे माध्यम हवे.

प्रत्येकाची कुवत, क्षमता, क्षेत्र वेगळं! अशी अनेक समाजसेवी माणसं समाजात आहेत. म्हणून माणुसकी आणि समाजाचं स्वास्थ्य टिकून आहे. प्रत्येकजण समाजाचं देणं लागतो. आपल्या कामात तरी आपण प्रामाणिक राहावे, जमेल तेवढा खारीचा वाटा उचलावा.
क्रिकेटचे मैदान गाजविणारे ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वाॅ कलकत्त्यामधील कुष्ठरुग्ण मुलांसाठी काम करणाऱ्या ‘उदयन’ या संस्थेशी गेली २३ वर्षे निगडित आहे. त्यानं एक मुलगी दत्तक घेतली आहे. द्वारकानाथ संझगिरींच्या लेखातून : मानवतेला झेंडा नसतो, धर्म नसतो, राष्ट्रगीत नसतं, देश नसतो, हे स्टीव्हने दाखवून दिले. बाबा आमटे देवमाणूस. ते त्यांच्यातच राहिले, पण एक सेलिब्रेटी आपलं संपन्न आयुष्य जगता-जगता हृदयाचा एक कोपरा, आयुष्याचा छोटा काळ त्यांना देऊ शकतो. त्यातून शेकडोंचे आयुष्य बदलू शकते. “जगा समृद्ध, जेवा भरपेट, पण दोन घास वंचितांसाठी काढून ठेवायला विसरू नका. काही कुटुंबे त्यातून मीठ-भाकर खातील.” एन.एस.एस.च्या निमित्ताने “चांगले व्हा आणि इतरांसाठी चांगलं करा.”
mbk1801@gmail.com

Recent Posts

Mumbai University Exams: लोकसभा निवडणुकीचा विद्यार्थ्यांना फटका; मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

'असं' असेल नवे वेळापत्रक मुंबई : देशभरात निवडणुकांची (LokSabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात…

38 seconds ago

farmer scheme : शेतकऱ्यांना ‘या’ तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना? मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या…

36 mins ago

Vande Bharat Metro: आता येत आहे वंदे भारत मेट्रो, रेल्वेने ट्रायल रनची तयारी केली सुरू

मुंबई: रेल्वेने गेल्या काही वर्षात वेगाने मॉर्डन होण्याची शर्यत लावली आहे. मॉर्डनायझेशनच्या या मार्गावर रेल्वेने…

2 hours ago

Success Mantra: जीवनात आनंद आणतात या छोट्या छोट्या सवयी, बदलून जाईल तुमचे आयुष्य

मुंबई: प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. कधी कधी लोक आपले लक्ष्य मिळवण्यासाठी संपूर्ण जोर लावतात…

3 hours ago

वाढत्या उन्हामुळे तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत आहे का?

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे काही ना काही आजार सुरूच होता. यातील एक म्हणजे डोकेदुखी. आज…

4 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४ आर्थिक लाभ मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणीच्या विकासासह…

7 hours ago