Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमहाविकास आघाडीच्या ‘बंद’चा पेणमध्ये फज्जा

महाविकास आघाडीच्या ‘बंद’चा पेणमध्ये फज्जा

व्यापाऱ्यांचा विरोध, तर विविध पक्षांचे ३५ - ४० कार्यकर्तेच रस्त्यावर

देवा पेरवी
पेण : उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खीरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला पेणमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला असून या ‘बंद’चा फज्जा उडाला आहे. महाविकास आघाडीच्या बंदच्या आवाहनाला पेण शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद न करता विरोध दर्शविला. आघाडीतील पक्षांचे मिळून ३५ ते ४० कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काही वेळासाठी तरी दुकाने बंद ठेवा अशी विनंती करूनही दुकाने बंद न झाल्याने जनतेत या ‘बंद’चे हसू झाले.

यावेळी पेण शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. भाजप सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चाचे रूपांतर पेण येथील कोतवाल चौक येथे जाहीर सभेत झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्वरित गृहराज्यमंत्री पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केली. यावेळी पेणमधील काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका, ते कायम आपल्या सोबत आहेत असे सांगून सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी केल्याचे जाहीर केले.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकमेकांसोबत आहोत असे सांगितले. कुटुंबामध्ये थोडेफार अंतर्गत वाद असतात. मात्र संकटकाळी आम्ही सर्व भाऊ एकत्र आलोत. आमच्यात फूट पडण्याचा भाजपने कधीच प्रयत्न करू नये असा इशारा दिला. यावेळी पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध केला.

सदर मोर्चामध्ये नेते रशाद मुजावर, नरेश गावंड, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण पाटील, हिदायतुल्ला कुवारे, राष्ट्रवादीचे नेते गंगाधर पाटील, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, विशाल बाफणा, हबीब खोत, वहीद खोत, तजीम मुकादम, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे, शेकापचे संजय डंगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, दिलीप पाटील, नरेश सोनवणे, अच्युत पाटील, रवींद्र पाटील, प्रसाद देशमुख, संजय पाटील, अशोक वर्तक, तुकाराम म्हात्रे, विजय पाटील, लवेंद्र मोकल आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -