Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरकापणीची वेळ अन् पावसाचा खेळ...

कापणीची वेळ अन् पावसाचा खेळ…

परतीच्या पावसाचा विक्रमगड तालुक्यात धुमाकूळ सुरूच

संजय नेवे

विक्रमगड : तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वारा व विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाने शेतात कापलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागांतील भातशेती कापणीसाठी तयार झाली असून भात कापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतामध्ये ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवळे सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवण्याचे स्वप्न बळीराजाने बघितले होते. मात्र, अचानक आलेल्या परतीच्या पावसाने कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली होती. परतीच्या पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.

या पावसाने तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरावून घेतला आहे. परतीचा पाऊस आणखी दोन ते तीन दिवसांत थांबला नाही तर कापलेले भातपीक खराब होऊन वर्षभराची मेहनत पाण्यात जाण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या वर्षी परतीच्या पावसाने विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील कापणीसाठी तयार झालेल्या भातपीक खाली पडल्याने भातपिकांची धूळधाण झाली आहे.वर्षभराच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. – प्रमोद विश्वनाथ पाटील, शेतकरी, आपटी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -