Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMaharashtra Saints : इथे संतांचिये नगरी

Maharashtra Saints : इथे संतांचिये नगरी

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

भारत देशात अनेक संत झाले. त्यांनी समाजाच्या सर्व थरांत-अशिक्षित, गरिबी, अज्ञान यात समाज प्रबोधनाचे कार्य केले. संतांचे स्वार्थहीन, प्रेरक, चैतन्यमयी विचार समाजाला उद्बोधक, प्रेरणादायी ठरतात.

पला भारत देश हा ‘असंख्यात एकता’ या तत्त्वानुसार चालतो. भारतातील प्रत्येक राज्याची आपली अशी संस्कृती आहे. तेथील संतपरंपरा, खाद्यपदार्थ, कला, नृत्य, गायन या सर्वांत आपापली वैशिष्ट्ये सांभाळून, यातले सौंदर्य, चांगले विचार यांची जपणूक करण्यासाठी भारत कार्यक्षम आहे. भारत देशात अनेक संत झाले. त्यांनी समाजाच्या सर्व थरांत-अशिक्षित, गरिबी, अज्ञान यात समाजप्रबोधनाचे कार्य केले. संतांचे स्वार्थहीन, प्रेरक, चैतन्यमयी विचार समाजाला उद्बोधक, प्रेरणादायी ठरतात. म्हणूनच म्हणतात की, “हेचि दान देगा देवा| तुझा विसर न व्हावा|

न लगे मुक्ती आणि संपदा| संत संग देई सदा||” संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत रामदास अशी संतपरंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.

संत तुलसीदास हे उत्तर भारतातील अत्यंत नामवंत संतकवी. संत तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ व ‘विनय पत्रिका’ या रचना भारतभर प्रसिद्ध आहेत. तुलसीदास यांची भक्तिगीते अत्यंत सुबोध, रसाळ, अर्थवाही, हृदयस्पर्शी, भावपरिलुप्त असून, त्यांची काव्ये अशिक्षित लोक सुद्धा चौपाई दोहा म्हणून व्यक्त करतात. संत तुलसीदास यांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमी संवत १५५४ रोजी झाल्याचे मानतात. तुलसीदास लहान असतानाच अनाथ झाले व त्यांचे पालन-पोषण त्यांच्या काकांनी केले. तुलसीदासांनी पारंपरिक संस्कृत शिक्षण घेतले व ते संस्कृत साहित्याचे अभ्यासक झाले. त्यांना लवकरच अध्यात्माची ओढ लागली व श्रीराम आणि हनुमंताची उपासना सुरू केली. संत तुलसीदासांनी ‘हनुमान चालिसा’ची रचना केली. हे भगवान हनुमंताच्या गुणांची स्तुती करणारे स्तोत्रं आहे.

तुलसीदासांच्या जीवनात वयाच्या २८व्या वर्षी सात्त्विक व सौंदर्यशाली स्वभावाची त्यांची पत्नी रत्नावली आली. ते तिच्या प्रेमात पूर्णपणे अडकले. एकदा ते आपल्या पत्नीच्या ओढीने घनदाट, काळ्याकुट्ट अंधारात, वादळी वाऱ्यात, कोणत्याही संकटाला न जुमानता मध्यरात्री पत्नीच्या माहेरी पोहोचले, तेव्हा त्यांची विवेकशील पत्नी रत्नावली विनोदाने त्यांना म्हणाली,
“अस्थि चर्म मय देह मम तामै जैसी प्रिती |
तैसी जो श्रीराममैंह होती न भव भीति ||”

याचा अर्थ, “माझ्या प्रीतीची नदी तुम्ही ओलांडलीत. हेच प्रेम श्रीरामांवर केलेत तर हा भवसागर तुम्ही सहज ओलांडून जाल.” हा क्षण तुलसीदासांच्या जीवनातील परिवर्तनाचा क्षण होता. त्या क्षणी त्यांनी संसारातील नश्वरता व निरर्थकता जाणली व क्षणार्धात त्यांनी घर सोडले. त्यांनी रामेश्वर, व्दारका, बद्रीनाथ, जगन्नाथपूरी अशा तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. चौदा वर्षे भारतभ्रमण केल्यावर संत तुलसीदासांनी काशीला गंगातीरी हनुमान मंदीर घाटावर गोपाल मंदिरात एका खोलीत बसून ‘रामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिला. हे काम त्यांनी तीन वर्षात पूर्ण केले. संत तुलसीदासांनी विश्व बंधुत्वाची वाणी जगाला दिली. अवधी भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. ‘रामचरितमानस’ हे त्यांचे महाकाव्य घराघरांत पोहोचले. त्यांनी रामाचे व्यक्तिमत्त्व-एकवचनी, आदर्श पुत्र, बंधू, सखा, पती, प्रेमळ मित्र असे चितारले आहे. प्रपंच व त्याग, संसार व वैराग्य, भक्ती व ज्ञान यांचा समन्वय साधणाऱ्या या काव्यसाहित्याच्या लेण्यातून ते अजरामर झाले.

मानव विश्व कल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन संत तुलसीदासांनी कवितावली, विनयपत्रिका, गीतावली, कृष्णं गीतावली, दोहावली, जानकी मंगल, बरवै रामायण, रामाज्ञाप्रश्नं, पार्वती मंगल, राम लीला नेहछू हनुमान-बाहुक असे आपले शाश्वत विचारसाहित्य मागे ठेवून लोकशिक्षणाचे प्रचंड कार्य केले. आपल्या साहित्यरूपाने ते अमर आहेत.

संत मीराबाई यांचा जन्म इ. स. १४९८ मध्ये राजस्थानच्या मेडता या परगण्यांतील कुडकी नावाच्या गावी राठोड घराण्यात झाला. मीराबाई या पिढीजात संपन्न घराण्यातील मुलगी. रतनसिंहांची ती कन्या. तिच्या आजोबांनी तिला लहानाचे मोठे केले. संत मीराबाईंच्या लहानपणीची एक कथा आहे. एक दिवस एक साधू तिच्या घरी आला. त्याच्याजवळ श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती तिने पाहिली. तिचे मन त्या मूर्तीवर जडले. असं म्हणतात की, त्या साधूला स्वप्नात दृष्टांत झाला व बालकृष्णाची मूर्ती बाल मीराला देण्याचा त्याला त्याच्या गुरूचा आदेश झाला. त्या साधूने ती मूर्ती मीरेलाच अर्पण केली. त्या मूर्तीवर तिने जीवाभावाने प्रेम केले.

नंतर लोकरीतीप्रमाणे मीराबाईंचा विवाह चितोडचा महाराणा संग यांचा वडील मुलगा राजा भोजराज यांच्याशी झाला. लग्नानंतर मीराबाईंनी आपल्यासोबत गोवर्धन गिरीधारीची मूर्तीही नेली. लग्नानंतर मीराबाईची सासू व नणंद उदाबाई यांना तिची ही कृष्णभक्ती आवडली नाही. म्हणून त्या दोघींनी मीराबाईला खूप त्रास दिला.

मीरा स्वत: राणी असूनही हातात झांज, चिपळ्या घेऊन हरीकीर्तन करीत असे. ती पायात घुंगरू घालून हरीनामाचा गजर करीत बेभानपणे नाचत असे. त्यामुळे राजघराण्याच्या प्रतिष्ठेला बाधा येते असे तिच्या सासरच्या मंडळींना वाटत असे. भक्तिमार्गाचा, अध्यात्माचा वसा घेणारी संत मीराबाई राजवैभवाचे आकर्षण संपवून कृष्णभक्तीसाठी बाहेर पडली. संत मीराबाई पुढे चितोड, मेडता, मेवाड, मारवाड, वृंदावन अशी ठिकाणे फिरत, काशीयात्रा करून द्वारकेस जाऊन राहिली.

असे म्हणतात की, मीराबाई चितोड सोडून गेल्यावर चितोडच्या राजघराण्यावर सतत संकटे येत राहिली. शांती व आनंद यांचा अस्त झाला. राणाने कसेही करून तिला चितोड येथे आणावे यासाठी दोन व्यक्ती पाठविल्या. “मी द्वारकानाथ रणछोडची आज्ञा घेऊन येते”, म्हणून पायात घुंगरू बांधून व हातात चिपळ्या घेऊन ती नाचत-भजन गाऊ लागली. त्यातच तिचे भान हरपले व भजन संपताच तिची प्राणज्योत मावळली.

ज्या कृष्णाच्या मूर्तीची संत मीराबाईंनी प्राणापलीकडे जपून जन्मभर उपासना केली, ती मूर्ती आठ हातांची, शंख,चक्र, गदा, पद्म, गायी चरणाची काठी, गोवर्धन पर्वत, शेष हे हातातील पदार्थ दोन हातात ओठांवर धरलेली मूर्ती या वस्तू मीराबाईच्या पदातील वर्णनाशी जुळतात. सात्त्विक निरागसता, प्रांजळ भाव, सौंदर्य, उत्कट भक्तीभावना हे संत मीराबाईंचे गुण दर्शवितात. संत मीराबाई आत्मप्रचितीच्या पायावर उभे राहून टीका, संकटे यांना झेलणारी एक महान संत होय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -