Categories: मनोरंजन

ज़िन्दगी बोझ बनी हो, तो…

Share

श्रीनिवास बेलसरे

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी आंतरधर्मीय प्रेमावर एक वेगळाच सिनेमा काढला होता. त्याकाळी हल्लीसारखे धार्मिक विषयांवर वातावरण तापलेले नसल्याने तो चालूनही गेला. ‘दिलकी राहें’ या १९७३ साली आलेल्या सिनेमाची नायिका होती रेहाना सुलताना आणि नायक होता राकेश पांडे. पहिला विवाह फसल्याने आणि पत्नी सोडून गेल्याने वैफल्यग्रस्त झालेला नायक दारूच्या आहारी जातो. व्यसनी बनतो आणि सतत घरे बदलत राहतो. कुठेच तो आठवडाभरापेक्षा टिकत नाही. मात्र एकदा त्याची तब्येत बिघडल्याने समोरच राहणाऱ्या डॉक्टर रेहाना यांची मदत त्याला घ्यावी लागते. थोडे बरे वाटल्यावर तो तेही घर सोडून जाणार असतो. मात्र एक चांगली डॉक्टर या नात्याने रेहाना त्याला अजून किमान आठवडाभर विश्रांती घेण्याचा आणि त्यासाठी तिथेच राहण्याचा सल्ला देते.

राकेशला बरे होण्यास वेळ लागल्यामुळे दोघांच्या भेटी वाढतात आणि त्यांच्यात प्रेम निर्माण होते. मात्र रेहाना ही मुस्लीम, तर राकेश हा हिंदू असल्याने रेहानाची आई (सुलोचना लाटकर) लग्नास अनुमती देत नाही. उलट राकेशशी असलेले सर्व संबंध तोडायला सांगते.

रेहानाने शेजारधर्म म्हणून राकेशकडून आपली फी घेतलेली नसते. त्या बदल्यात त्याने तिला संगीत शिकवावे, असा त्यांच्यात एक प्रेमळ करार झालेला असतो. त्याच्या संगीताच्या ओढीने आईची अनुमती नसतानाही रेहाना त्याच्याकडे जात राहते आणि त्यांच्या भेटी सुरू राहतात. मात्र दोघांच्या प्रेमाला काहीही भविष्य नाही, ही वेदनादायी जाणीव रेहानाला अस्वस्थ करत राहते. आपल्या एकत्र येण्यात असलेल्या अडचणीची कल्पना आल्याने ती खूप निराश होते.

गीतकार जसवंतराय शर्मा ऊर्फ ‘नक्ष लायलपुरी’ यांनी या प्रसंगासाठी एक सुंदर गझल लिहिली आहे. लतादीदींचा नाजूक उदास करून टाकणारा आवाज आणि मदनमोहन कोहली यांचे आशयाला अगदी अनुरूप असे संगीत यामुळे गाणे आजही अनेकांच्या स्मरणात कायमचे बसले आहे. ज्यांचे ज्यांचे प्रेम असफल झाले आणि असे लाखो आहेत, त्यांना या गाण्याने गतकाळाबद्दल कितीही पश्चाताप झाला तरी एक वेगळाच दिलासाही मिळतो! लतादीदींच्या आवाजातले हे गाणे श्रोत्यांचे सगळे भावविश्व घेरून टाकते. त्यांना भूतकाळात केव्हा घेऊन गेले ते त्यांच्या लक्षातही येत नाही.

कोणत्याही प्रेमकथेच्या परीपूर्तीची अट म्हणजे मीलन, प्रियकर प्रेयसीने आयुष्यासाठी एकत्र येणे, लग्नबंधन! तेच तर या भिन्नधर्मी प्रेमिकांत अशक्य झालेले असते. त्यामुळे रेहानाच्या मनात ‘या प्रेमाच्या रिती मी कशा पार पाडू? किती ही माझी अगतिक अवस्था?’ असे प्रश्न सतत मनाला डाचत असतात. ती स्वत:शीच म्हणते –

रस्म-ए-उल्फतको निभाएं, तो निभाए कैसे?

तिला वाटते सगळीकडे जणू आग लागलीये, अशा स्थितीत मी माझा पदर त्या ज्वालांपासून कसा सांभाळू? तो वणवा तर मलाही ग्रासून टाकत आहे. जणू माझ्या प्रेमाचे पाखरू त्या वणव्यात इकडून तिकडे उडते आहे. त्याचा इवलासा जीव आता मी कसा वाचवणार?

हर तरफ आग हैं, दामन को बचाए कैसे… रस्म- ए- उल्फतको निभाएं, तो निभाएं कैसे?

केवळ दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत म्हणून त्यांच्यात समाजाने एक अदृश्य भिंतच उभी केली आहे. ती लांघणे कसे शक्य आहे, हा विचार रेहानाला अगतिक करून टाकतो. तिला आपल्या प्रियकराबरोबर जीवन जगण्याचा मार्गच दिसत नाही. भेदाभेदाच्या सर्व भिंती पाडून टाकायची तिची उत्कट इच्छा आहे. तशी ती प्रत्येक तरुण मनाची असतेच. पण परंपरावादी समाजातील एका तरुणीच्या क्षीण निर्धारापेक्षा एकंदर समाजाच्या रितीरिवाजांची शक्ती कितीतरी जास्त आहे, ही जाणीव तिला उदास करून टाकते.

दिलकी राहो में
उठाते हैं जो दुनियावाले,
कोई कहे दे के, वो दिवार गिराए कैसे?
रस्म ए उल्फतको निभाए,
तो निभाये कैसे…

हतबल रेहानाला कुणाकडे तरी हे दु:ख व्यक्त करून मन मोकळे करावेसे वाटते. कधी तर ‘ही सगळी बंधने योग्य नाहीत, ती माणसाचे मन मारून, त्यालाही एका अर्थाने मारून टाकत आहेत. कृपा करून हा अदृश्य हिंसाचार थांबवा’ असे समाजाला ओरडून सांगावेसे वाटते. पण तिलाच जाणवून जाते की, दु:खात बुडालेल्या प्रेमाच्या शोककथा अनंत आहेत. पण त्या सांगण्यासाठी हवे ते संगीतच हरवले आहे. माझ्या हृदयाची सतारच आता तुटून पडली आहे. तिच्या तारा निखळल्या आहेत.

दर्दमें डुबे हुए, नगमे हज़ारो हैं, मगर,
साज़-ए-दिल टूट गया हो,
तो सुनाएं कैसे? रस्म-ए-उल्फतको निभाए…

प्रेमात खोल बुडालेल्या आणि आपल्या प्रियकराची काळजी लागून राहिलेल्या प्रेयसीची मानसिक अवस्था मोठी वेदनामय आहे. ती म्हणते मी सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या असत्या. जर ओझे फक्त दु:खाचे वाहायचे असते, तर मी ते कितीही सहन केले असते. पण या कोंडीतून सुटकेच्या सगळ्या वाटा बंद झालेल्या असताना सगळे जीवनच एक ओझे बनले असेल तर मी काय करू? जगण्याचे ओझे मी कसे पेलू?

बोझ होता जो गमोंका
तो उठा भी लेते…
ज़िन्दगी बोझ बनी हो,
तो उठाये कैसे…
रस्म-ए-उल्फतको निभाएं…

नक्ष लायलपुरी यांनी ही गझल लिहून कितीतरी असफल प्रेमकहाण्यांना दिलासा दिला आहे. अशी गाणी ऐकून आपण खरे तर एका अर्थाने गेलेल्या काळाला भेट देत असतो. त्या दु:खाना जागे करत असतो. पण कधीकधी असे निघून गेलेल्या काळाला, आपल्या आयुष्यातून कायमच्या निघून गेलेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहायला हवी ना!

Recent Posts

मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…

41 mins ago

राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…

1 hour ago

ICC Women’s T20 World Cup महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असणार भारताचे सामने

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…

1 hour ago

खोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…

2 hours ago

PBKS vs CSK : पंजाबचा विजयी सिक्सर हुकला, चेन्नईने २८ धावांनी चारली पराभवाची धूळ

मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा…

2 hours ago

Jason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस…

5 hours ago