Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीरस्त्यावर निघताहेत आगीच्या ज्वाळा; परळमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून गळती

रस्त्यावर निघताहेत आगीच्या ज्वाळा; परळमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून गळती

मुंबई : परळ परिसरात महानगर गॅसच्या पाईपलाईनमधून वायूगळती झाली. या वायूगळतीमुळे पाईपलाईन असलेल्या भागातील रस्त्यावर आग लागली. आगीच्या ज्वाळा जमिनीतून बाहेर निघत होत्या. येथून काही अंतरावरच एक पेट्रोलपंप आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाच अग्निशमन दलाचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, संपूर्ण गॅसच्या पाईलपाईनला आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.

हा परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. गॅस पाईपलाईनला आग लागल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य सुरु केले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाईपलाईनमधून वायूगळती सुरु असल्याने ही आग विझताना दिसत नाही. अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून पाईलपाईनजवळ जाऊन आग विझवताना दिसत आहेत. ही आग आणखी भडकू नये, यासाठी त्यावर सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. याठिकाणी आता फोम टँकर आणण्यात आला आहे. पाण्याने आग न विझल्यास फोमचा वापर करण्यात येईल.

सुरुवातीला याठिकाणी आगीच्या ठिणग्या पडत होत्या. त्यानंतर आग चांगलीच भडकली. वायूपुरवठा बंद न झाल्याने पाण्याचा जोरदार फवारा मारूनही ही आग विझत नव्हती. या काळात महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी येणे अपेक्षित होते. परंतु, बराचवेळ उलटूनही महानगर गॅसचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही दुकानांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आजूबाजूची काही दुकान बंद करण्यात आली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -