Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकुशीनगर आता जगाच्या नकाशावर

कुशीनगर आता जगाच्या नकाशावर

देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर विकासाची गंगा समाजातील तळागाळाच्या आणि आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांपर्यंत आणि विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तसेच देशातील पायाभूत सुविधा, दळणवळण व्यवस्था अत्याधुनिक करण्याची नितांत आवश्यकता आहे. असे झाले तरच विकासकामे, उद्योग-धंदे आदींची व्याप्ती व गती वाढविणे शक्य आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशाग्र बुद्धीने आधीच हेरली आणि सत्तेवर येताच त्यादृष्टीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असेच तेज – तर्रार सहकारी घेतले, तसेच प्रमुख राज्यांमध्ये सक्षम व ठोस निर्णय घेऊ शकणारे मुख्यमंत्रीही नेमले. त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आणि त्या सर्व संबंधितांनी या जबाबदाऱ्या चोखपणे बजावण्यास सुरुवात केली. त्याचाच परिणाम आता दिसू लागला आहे.

आपल्या देशात अनेक अशी ऐतिहासिक ठिकाणं किंवा तीर्थक्षेत्र आहेत जी गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यांचा विकास केल्यास ते स्थळ उर्वरित जगाशी जोडले जाऊन तेथील पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नानाविध छोटे – मोठे व्यवसाय उभे राहतील आणि संपूर्ण परिसराचा विकास होऊन कायापालट करणे शक्य होईल. याच विचारातून उत्तर प्रदेशातील कुशीनगर या आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थस्थळाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले गेले. या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन पार पडले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कुशीनगरच्या जिल्ह्याला विकास योजनांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी यामुळे या जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाल्याचे मानले जाते. त्यामुळे जगाच्या नकाशावर या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल. कुशीनगर विमानतळावर येणारे प्रवासी लुम्बिनी बोधगया, सारनाथ आणि कुशीनगरचा प्रवास करू शकतील. यासह श्रावस्ती, कौशांबी, संकीशा, राजगीर आणि वैशालीपर्यंत प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे हे कुशीनगर आज विमानतळामुळे जगाशी जोडले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले आहे. कुशीनगरचा विकास करण्याला उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारतर्फे प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणे विकसित करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि बौद्ध भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. ते उभारण्यासाठी २६० कोटींचा खर्च झाला आहे.

या विमानतळाचे टर्मिनल ३,६०० चौरस मीटर परिसरात पसरलेले आहे. एकावेळी जवळपास ३०० प्रवाशांना येण्या-जाण्याची सुविधा या टर्मिनलवर मिळू शकेल. कुशीनगर विमानतळावर ३.२ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद रन-वे उभारण्यात आला आहे. हा उत्तर प्रदेशातील आतापर्यंतचा सर्वात लांब रन-वे ठरला आहे. या रन-वेवर प्रत्येक तासाला आठ विमाने ये-जा करू शकतात. दिवसाबरोबर रात्रीही विमाने उतरण्यास सोपे व्हावे, यासाठी नवीन सुविधा येथे केली जात आहे. या अाधी २४ जून २०२० रोजी या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्यात आले होते. या विमानतळावरून श्रीलंका, जपान, चीन, तैवान, साऊथ कोरिया, थायलंड, सिंगापूर आणि व्हिएतनाम यांसारख्या दक्षिण आशियाई देशांना जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली ते कुशीनगरसाठी थेट विमानसेवा २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी कुशीनगरला मुंबई आणि कोलकाताशी जोडले जाणार आहे. म्हणजे देशातील प्रमुख शहरांतून येथे दळणवळण शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ पर्यटनालाच प्रोत्साहन मिळेल असे नाही, तर स्थानिक शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या शेतमालालाही मोठा उठाव मिळेल. सोबतच पशुपालक, छोटे व्यापारी यांनाही या विमानतळाचा फायदा होईल. रोजगाराच्या, व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील हे निश्चत. म्हणजेच कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणीचे ठिकाण म्हणून राहणार नाही, तर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे प्रमुख स्थळ म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळवेल. येत्या तीन-चार वर्षांत देशात २०० हून अधिक विमानतळ, सीपॉडचे नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न असणार आहे. मोदी सरकारच्या उडाण योजनेंतर्गत गेल्या काही वर्षांत ९०० हून अधिक नव्या मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ३५० हून अधिक हवाई सेवांचा प्रारंभ करण्यात आला आहे. जे अगोदर सेवेत नव्हते असे ५० हून अधिक नवीन विमानतळं सुरू करण्यात आली आहेत. अशा अनेक धडाकेबाज निर्णयांमुळे, पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीतील ‘सबका साथ, सबका विकास’ साधणे शक्य होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -