Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअमली पदार्थांच्या विळख्यात कोकण...!

अमली पदार्थांच्या विळख्यात कोकण…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अमली पदार्थ सेवन करणारे तरुण याच्या आहारी गेल्याचे चित्र स्पष्ट असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही याचे लोण पोहोचले आहे. त्याची कारणे कोणतीही असोत; परंतु अमली पदार्थ सेवनाच्या नादी लागलेली एक पिढी यात पूर्ण बरबाद होऊ लागली आहे. अमली पदार्थांचा हा विषय फार गंभीर आहे. यामुळे हा काही राजकीय इश्यू नाही. नाशिकला ललित पाटीलला पकडल्यानंतर अमली पदार्थ विक्री हा विषय चर्चेला आला असला तरीही अमली पदार्थ विक्री करणाऱ्या यंत्रणेची माहिती स्थानिक पोलिसांना निश्चित असते. पोलीस यंत्रणेला अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यवस्थेबद्दल काहीच माहिती नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळे अमली पदार्थ विक्री व्यवस्था पूर्णपणे थांबवायची असेल, तर त्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागेल.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुळात या विषयात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट झाली, त्यावेळी साहजिकच कोकणातील अमली पदार्थ सेवनाचा आणि त्यात मोठ्या प्रमाणावर तरुणाई कशी गुंतली हा विषय चर्चेला आला. जेव्हा अमली पदार्थ सेवन करणारी तरुणपिढी यात कशी गुंतत चाललीय, हे समोर येत असल्याने कोकणातील पोलीस प्रमुखही अस्वस्थ आहेत. म्हणूनच कोकणात पोलिसांकडून तरुण-तरुणींच्या जनजागृतीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. कारण हा सामाजिक प्रश्न आहे. समाजघटकातील सर्वांनीच याविषयात एकत्र येऊन हे थांबविले पाहिजे.

रत्नागिरीचे एस. पी. धनंजय कुलकर्णी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल या दोन्ही पोलीस प्रमुखांकडून हा विषय फार जिव्हाळ्याने हाताळला जात आहे. कोकणच्या सीमेवर असलेल्या गोवा राज्यामध्ये अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट आहे. गांजा विक्री तर कोकणात सर्वत्रच होत आहे. मोठ्या प्रमाणावर याची विक्री होते. अफू हे कोकेणसारखे अमली पदार्थ कोकणात गोवामार्गे येत आहेत. गोवा राज्याजवळ असलेल्या जिल्ह्यातील, तालुक्यातून हा विक्री व्यवसाय तेजीत आहे. दोन महिन्यांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्रकिनारी चरसची पाकिटे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आढळून आली. दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गातील किनाऱ्यावरही चरसची पाकिटे आढळून आली होती. किनाऱ्यावर सापडणारी ही पाकिटे कसली आहेत, हेच सिंधुदुर्गातील पोलिसांना समजून आले नव्हते. त्यामुळे याविरोधात कारवाई करणे दूरच. या अमली पदार्थांच्या बाबतीत पोलीसही दुर्लक्ष करतात. याचे कारण अमली पदार्थ विक्री व्यवस्थेचे गुन्हे एकदा दाखल झाले की, हा राज्याचा विषय होत नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणाही यामध्ये तपास करीत असतात. यामुळे साहजिकच ही नसती आपत कशाला मागे लावून घ्या. यामुळेही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते; परंतु अमली पदार्थ सेवन करण्याने एक पिढीच त्यात बरबाद होऊ शकते. हे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजून आल्याने पोलीस यंत्रणा त्यासाठी प्रयत्न करीत आहे.

खरंतर कोकणच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर चरसची पाकिटे सापडल्यानंतर त्याची सखोल चौकशी होणे अपेक्षित होते. जर या संदर्भाने चौकशी झाली असेल तर कोकणच्या किनारपट्टीवर ही चरसची पाकिटे आली कुठून? समुद्रमार्गाने अमली पदार्थ तस्करी होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणेने शोधली पाहिजेत आणि त्यासंबंधी कार्यवाहीही व्हायला हवी. एकीकडे तरुणाईचे प्रबोधन करून अमली पदार्थ सेवनापासून त्याला रोखता येईलच असे नाही. त्यासाठी अमली पदार्थ बाजारात उपलब्धच होणार नाहीत, यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. पोलीस यंत्रणेतील जे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याकडून तोडबाजी करून अमली पदार्थ बाजारातील विक्री व्यवस्थेला बळ दिले जाऊ शकते. गांजा विक्री प्रकरणातही हप्तेबाजीतून तो सुरू राहावा म्हणून खाकीवर्दीतील काहींकडून प्रयत्न होत आहेत का? त्याची चौकशी वरिष्ठ पोलीस यंत्रणेकडून करण्याची आवश्यकता आहे.

कोकणातही अमली पदार्थ विक्री व्यवस्था रोखणे ही बाबही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अमली पदार्थ येण्यासाठी आणि आणण्यासाठी एक ना अनेक मार्ग आहेत. गोव्यातून सिंधुदुर्गात आणि मग सिंधुदुर्गातून अखंड कोकणात अशी ही अमली पदार्थांची दुर्गंधी सगळीकडे पोहोचवली जाऊ शकते. तरुणाई याकडे एक ‘थ्रिल’ म्हणून ओढली जाते. नशेची एकदा सवय लागली की, ती थांबवणे अवघड होते. शाळा, महाविद्यालयात दुर्दैवाने एकदा हे लोण पसरले तर ते कोकणातील घरांपर्यंत कधी जाऊन पोहोचेल, हे सांगताही येणार नाही आणि मग ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होईल. शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांनीही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. हे केवळ शाळा, महाविद्यालयीन वेळेत फक्त आमची जबाबदारी असं शिक्षक, प्राध्यापकांनी म्हणून चालणार नाही, तर समाजातील जबाबदार घटक म्हणून हे रोखण्याची जबाबदारी त्यांचीही आहे. समाज म्हणून आपलीही आहे. कोकणातील तरुणाईला ही किड लागू नये म्हणून सर्वांनीच सतर्क राहायला पाहिजे.

कोकणातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी अमली पदार्थविरोधी घेतलेली भूमिका रोखण्यासाठी चालविलेले प्रामाणिक प्रयत्न निश्चितच स्वागर्ताह आहेत. फक्त हे मिशन म्हणून सुरू राहायला पाहिजे. यामध्ये खाकी वर्दीतूनच अडथळे निर्माण होतील; परंतु ते अडथळे दूर करून जे अधिकारी अशा हप्तेबाजीत गुंतलेले असतील त्यांच्यावरही कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटीलची भ्रष्टाचारी सुरत समोरच आली आहे. या चांगल्या मिशनला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरही खात्यांतर्गत कारवाई झालीच पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -