Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकोकणवासीयांसाठी आकाश झाले खुले

कोकणवासीयांसाठी आकाश झाले खुले

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे उद्घाटन कोकणचे भाग्यविधाते व केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तसेच देशाचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या साक्षीने शनिवारी पार पडले. कोकणवासीयांच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आकाश खुले झाले. नारायण राणे यांनी विमानतळासाठी तब्बल तीस वर्षे केलेल्या संघर्षाला अखेर फळ मिळाले. राणे आणि कोकणातील जनतेचे स्वप्न साकार झाले. देशात प्रत्येक राज्यातील दोन-चार शहरांत विमानतळ आहेत. कोणत्याही विमानतळाच्या उद्घाटनाला एवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती. कोणत्याही विमानतळाच्या उभारणीला एवढी दीर्घ काळ म्हणजे तीन दशके प्रतीक्षा करावी लागली नव्हती. चिपी विमानतळ कोकणवासीयांना संपन्न आणि समृद्धीकडे नेईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. कोकण रेल्वेच्या उभारणीत मधू दंडवते यांचे जेवढे योगदान मोलाचे आहे, तेवढेच चिपी विमानतळाच्या उभारणीत नारायण राणे यांचा वाटा सर्वात मोलाचा आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या सांगण्यावरूनच १९९०मध्ये राणे यांनी सिंधुदुर्गमधून विधानसभेची निवडणूक लढवली व आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी या जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. रस्ते, शाळा, वीज, बसेस सर्वच क्षेत्रांत त्यांनी सिंधुदुर्गचा कायापालट घडवला. विमानतळ झाल्यावर खऱ्या अर्थाने कोकणवासीयांना समृद्धीचे दार खुले होईल, हे त्यांनी ओळखले होते. त्यांच्या आग्रहावरूनच सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यंटन जिल्हा घोषित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून घेतल्यावर राणे यांनी पहिल्या आठवड्यातच नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित केली. विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात या प्रकल्पासाठी आपण तीस वर्षे कसा पाठपुरावा केला, त्याचा आलेख राणे यांनी आपल्या भाषणातून मांडला. याच विमानतळाला जे कोणी विरोध करीत होते, तेच आजच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असल्याचे त्यांनी जोरकसपणे सांगताच, संबंधितांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.

कोकणातील महामार्गाचे काम ज्यांना दिले, त्या कंत्राटदारांना गाठून त्यांच्याकडून काय कोणी मिळवले, याची तपशीलवार माहिती राणेसाहेबांकडे आहे. हेच लोक विमानतळाचे श्रेय घेण्यासाठी पुढे नाचताना दिसतात. व्यासपीठावरून राणे जे काही बोलले ते रोखठोक होते, सत्य होते, वास्तव होते. राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर होते, त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी दुटप्पी व मतलबी वागत असतील, तर त्यांनी तशी त्यांना तंबी द्यायला हवी होती; पण उलट त्यांनी अशा लोकप्रतिनिधींचा मला अभिमान वाटतो, अशी फुशारकी मारली. एकीकडे कोकणचा विकास गतीमान होईल, असे म्हणायचे व दुसरीकडे विकास प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांचे कौतुक करायचे…, हा दुटप्पी प्रकार आहे. सिंधुदुर्गमधील विकासाचे प्रकल्प हे केवळ राणेसाहेबांच्या अथक परिश्रमातून, कल्पकतेतून आणि त्यांच्या पाठपुराव्याने उभे राहिले आहेत. महाआघाडी सरकारने विशेषत: शिवसेनेने कोकणासाठी काय वेगळे करून दाखवले, हे एकदा जाहीरपणे सांगावे. केवळ फुकाच्या गोष्टी सांगून व भावनिक आवाहन करून मते मिळविण्याचे दिवस संपले आहेत.

विमानतळाचे उद्घाटन झाले असले तरी महामार्ग ते विमानतळ असा अॅप्रोच रोड (जोड रस्ता) झालेला नाही, तो एमआयडीसीने तातडीने केला पाहिजे, असे राणे यांनी स्पष्ट सुनावले. त्यासाठी ३४ कोटी रुपये पाहिजेत. विमानतळावर वीज, पाणी यांची पुरेशी व्यवस्था झाली पाहिजे, याकडेही लक्ष वेधले; पण त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. जे प्रश्न आहेत, जे विमानतळासंबंधी मुद्दे मांडले गेले, त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी साधा उल्लेखही केला नाही.

खोटे बोललेले शिवसेनाप्रमुखांना आवडत नसे, असे राणेसाहेबांनी आपल्या भाषणातून खडसावून सांगितले. त्यांचा रोख शिवसेनेतील खोटे बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर होता. त्यावर आपल्या पक्षातील खोटे बोलणाऱ्यांची कानउघाडणी करण्याऐवजी राजकीय मल्लिनाथी करण्यातच मुख्यमंत्र्यानी धन्यता मानली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री, महलूसमंत्री, पर्यटन व पर्यावरणमंत्री, उद्योगमंत्री, पालकमंत्री असा सरकारचा मोठा ताफा या कार्यक्रमाला हजर होता. पण राणे साहेबांनी मांडलेले प्रश्न किंवा विमानतळासंबंधीच्या त्रुटी याविषयी कोणी ब्र सुद्धा काढला नाही. ते आले, त्यांचे स्वागत झाले, व्यासपीठावर आले आणि भाषण झोडून गेले… यापलीकडे या सरकारने कोकणला काय दिले? वादळ-अतिवृष्टीत ते असेच कोकणात आले होते व दोन-चार तासांतच मुंबईला परतले. कोकणातील जनता डोळे मिटून बसलेली नाही. सरकारच्या या बनवेगिरी व दिखाऊपणाला लोक कंटाळली आहेत. त्याची किंमत या सरकारला मोजावी लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -