Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीAshadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या का करावा विठ्ठलाचा जप...

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या का करावा विठ्ठलाचा जप आणि दिवसभर उपवास!

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. वारीत सहभागी झालेला प्रत्येक वारकरी वारीत दंग झाला आहे. विठ्ठलभेटीसाठी जाणं म्हणजे प्रत्येक वारकर्‍यासाठी स्वर्गसुखच! पण कामाच्या धबडग्यात अडकलेल्यांना मात्र इच्छा असूनही हे स्वर्गसुख अनुभवता येत नाही. कारण, वारीला जाण्यासाठी कामावरुन महिनाभर सुट्टी घेणं म्हणजे पोटावर पाय आणण्यासारखं आहे. नंतर बॉसने कायमचीच सुट्टी दिली तर? असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. म्हणून मग विठ्ठलभक्त आषाढी एकादशीला जमेल तशी विठ्ठलाची भक्ती करतात. अशावेळी अनेकजण उपवासही करतात.

बरेचदा आषाढी एकादशी किंवा कोणताही उपवास करणं यावर प्रत्येकाची मतमतांतरं असतात. पण उपवास करण्यामध्ये विठ्ठलाचा नव्हे तर आपला फायदा आहे. हे विसरुन कसं चालेल? शिवाय यातून पराकोटीचा आनंदही मिळतो. आता ते कसं याबद्दल यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त आपण जाणून घेऊयात…

‘विठ्ठल’ शब्द केवळ उच्चारल्याने होतात व्याधी दूर

‘वि ठ्ठ ल’ हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे. या शब्दातील प्रत्येक अक्षरावर हलका जोर देऊन त्याचे सतत उच्चारण केल्यास हृदयाचे विकार जास्त उद्भवत नाहीत. तसेच पचनसंस्था सुरळीत राहायला मदत होते. याचे कारण म्हणजे ‘विठ्ठल’ शब्दातील ‘व’ आणि ‘ल’ ही अक्षरे वासना केंद्राच्या स्वाधिष्ठान चक्रावर असल्याने मनातील वासना कमी होतात. तसेच ‘ट’ आणि ‘ठ’ ही दोन्ही अक्षरे हृदयाजवळच्या चक्रावर येतात, त्यामुळे ‘ठ’ उच्चारताना आपल्या पोटातील अवयवांवर जोर पडल्याचे जाणवते. यामुळे भूकेवर नियंत्रण राहून पचनसंस्था सुधारते आणि हृदयविकार दूर होतात.

जाणून घ्या आषाढी एकादशीच्या उपवासामागचे शास्त्र

आपल्याकडे एक म्हण आहे, ‘एकादशी दुप्पट खाशी’. उपवासाच्या दिवशी काही चवीचे पदार्थ फार दिवसांनी खायला मिळतात, म्हणून काहीजण उपवासाच्या नावाखाली या पदार्थांवर तावच मारतात. मग उपवास करुनही पोटात त्रास होतोय असं म्हणतात. हे कितपत योग्य आहे? उपवास करणे म्हणजे बटाट्याचे पदार्थ, शेंगदाणे, साबुदाण्याचे पदार्थ खाणे नव्हे. उलट यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. उपवास करणे म्हणजे खरंतर पोटाला आराम देणे. त्यामुळे पचन होण्यास हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. फळे, शहाळ्याचे पाणी, ताक, दूध, लिंबू सरबत असे पदार्थ या दिवशी खावेत.

 

आषाढ म्हणजे पावसाचा महिना. या काळात हवा थंड असते. आपल्या हालचालीही काही प्रमाणात कमी होतात. कामाचा वेग मंदावतो. त्यामुळे पचनाचे कामही मंदावते. तसेच एकादशीचे येणे चंद्रभ्रमणावर अवलंबून असते. पौर्णिमा जसजशी जवळ येते तशी समुद्रातील आणि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कमी पाणी शरीरात गेलेले चांगले. आपण जितके खातो तितके जास्त पाणी पचनाला लागते. म्हणून शरीरात पाण्याच्या पातळीचे संतुलन राहावे, तसेच पचनाला थोडा आराम देण्यासाठी एकादशी दिवशी उपवास करण्यास सांगितले जाते. आणखी एक कारण म्हणजे घरातल्या गृहिणीलाही रोजची पंचपक्वान्ने बनवण्यातून काही काळ आराम मिळावा.


त्यामुळे यंदा वारीला जायला मिळालं नाही तरी हरकत नाही. त्याऐवजी शरीरस्वास्थ्याचा विठ्ठल जपा. विठ्ठलाचं नामस्मरण करत उपवासाचे शास्त्रीय कारण समजून घेऊन उपवास करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -