Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024‘नाईट रायडर्स’समोर बंगळूरुचे ‘रॉयल चॅलेंज’

‘नाईट रायडर्स’समोर बंगळूरुचे ‘रॉयल चॅलेंज’

पहिल्या विजयासाठी केकेआर उतरणार मैदानात

  • ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता
  • वेळ : सायं. ७.३० वा.

कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२३ च्या ९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी होणार आहे. कोलकाताला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर बंगळुरुने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून शानदार विजय नोंदवल्यामुळे बंगळूरु उत्कृष्ट लयीत दिसत आहे. दुसरीकडे हंगामी कर्णधार नितीश राणासमोर डझनभर आव्हाने दिसत आहेत. कारण नियमित कर्णधार श्रेयस अय्यरसह शाकिब अल हसनदेखील आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे.

केकेआर तब्बल चार वर्षांनी ईडन गार्डन्सवर खेळणार आहे. या सामन्यात घरच्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा नितीश राणाचा संघ प्रयत्न करेल. यजमान संघाचा ईडन गार्डन्सवरील आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे आणि त्यांना हाच फॉर्म कायम ठेवायला आवडेल. लीगमधील पहिला विजय नोंदवण्यासाठी केकेआरला या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार असून आंद्रे रसेल आणि कर्णधार नितीश राणा हे मोठे खेळाडू फॉर्ममध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यातील त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य म्हणजे आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर यांच्यातील ५० धावांची भागीदारी. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची २२ धावांची धडाकेबाज खेळीही केकेआरसाठी सकारात्मक होती; परंतु गोलंदाजीत त्यांचे मुख्य आधार टीम साऊथी आणि सुनील नरेन त्यांच्यासाठी चिंतेचे कारण बनले. पंजाब किंग्जविरुद्ध केकेआरची शीर्ष फळी अपयशी ठरली असली तरी जेसन रॉयच्या आगमनाने त्यांची आघाडी मजबूत होईल. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरची पोकळी भरून काढण्यासाठी कोलकाताचा मधली फळी मजबूत करण्याचा इरादा असेल.

दुसरीकडे बंगळूरुने स्पर्धेतील त्यांच्या मागील लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त सामना केला होता.  बेंगळूरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस शानदार फॉर्ममध्ये आहे. हाच फॉर्म पुढील सामन्यात कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. बंगळूरुसाठी सर्वात चांगली बाब म्हणजे सलामीवीर म्हणून विराट कोहलीही फॉर्मात आहे. मुंबईविरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली होती. तसेच गोलंदाजांनीही विरोधी फलंदाजांना रोखून चांगली कामगिरी केली. बंगळूरु तोच फॉर्म कोलकाता विरुद्ध कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. फलंदाजी ही बंगळूरुची ताकद असून आघाडीसोबत तळाला दिनेश कार्तिकसारखे फलंदाज आहेत जे मोठे फटके खेळू शकतात. पहिल्या सामन्यात कार्तिक लगेच बाद झाला असला तरी फिनिशर म्हणून तो कमाल करू शकतो. त्यामुळे कोलकात्याच्या गोलंदाजांवर अधिक दबाव असणार आहे.

विजयी रथावर स्वार रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला त्यांच्या संघात एक बदल करावा लागेल कारण, क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने रीस टोपली स्पर्धेतून बाहेर पडला आहे. डेव्हिड विली त्याच्या जागी येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला मागील सामन्यामध्ये अपेक्षित सुरुवात करता आली नाही; तरीही त्या सामन्यात त्यांनी पंजाबविरुद्ध तशी चांगली कामगिरी केली होती.

गत विजयामुळे बंगळूरुचा संघ कोलकाताविरुद्ध आत्मविश्वासासह उतरेल; परंतु यजमानांना कमी लेखता येणार नाही. ईडन गार्डन्स स्टेडियमच्या खेळपट्टीने सामान्यत: फलंदाजांना मदत केली आहे आणि या ठिकाणी काही उच्च स्कोअरिंग टी-२० सामनेही पाहायला मिळाले आहेत.  फिरकीपटूंनाही थोडी मदत मिळू शकते. शिवाय या मैदानावरील बाऊंडरी मोठी नसल्यामुळे फलंदाजांना मदत मिळून मोठी धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे चाहत्यांना सामन्यात चौकार षटकारांचा पाऊस पाहायची पर्वणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -