Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘काळी राणी’ प्रलोभनांचा अस्त

‘काळी राणी’ प्रलोभनांचा अस्त

  • नंदकुमार पाटील : कर्टन प्लीज

नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत रत्नाकर मतकरी यांनी प्रेक्षकांनी दखल घ्यावी, असे काम केलेले आहे. पण रंगभूमीवर त्यांचे जास्त प्रेम दिसलेले आहे. ‘लोककथा ७८’ पासून तर ते आताच्या ‘काळी राणी’पर्यंत मधल्या काळात वंचितांची रंगभूमी याच दरम्यान ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाट्य आणि इतर दखल घेणारी नाटके तुफान लोकप्रियता मिळवून देणारी ठरली. उच्च निर्मिती, कलाकारांचे योगदान या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत असल्या तरी दर्जेदार, प्रज्ञा, प्रतिभा दाखवणारे लेखन हे त्याचे मूळ कारण आहे. मतकरी यांनी या तिन्ही क्षेत्रांत आपले कार्यक्षेत्र फक्त लेखनापूर्ती मर्यादित न ठेवता दिग्दर्शन, निर्मिती यात सुद्धा अनमोल कामगिरी केलेली आहे. ‘इंदिरा’ या जागतिक व्यक्तिरेखेला प्राधान्य देणाऱ्या नाटकाच्या निर्मितीत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. नाटक हा त्यांच्या कामाचा आत्मा होता. त्यामुळे प्रेक्षकांना जे हवे तेच त्यांच्याकडून अचूकपणे लिहिले जात होते. यातून मतकरी नावाचा एक स्वतंत्र असा प्रेक्षक वर्ग निर्माण झालेला आहे. सांगायचे म्हणजे प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत येण्यासाठी त्यांचे नाव पुरेसे आहे. असे असताना या नाटकाच्या बाबतीत आणखी एका गोष्टीची चर्चा होताना दिसली, ती म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांचे हे शंभरावे नाटक आहे. या निमित्ताने जे कलाकार, तंत्रज्ञ जोडले गेले त्यांची अनेक दशकातल्या प्रयोगाची संख्या सुद्धा जाहिरातीत नोंदवली गेली होती. ही जाहिरातबाजी प्रेक्षकांमध्ये अप्रूप निर्माण ठरली. मंगल केंकरे यांची वेशभूषा फोटो सेशनमधून जाहिरातीत दिसली. पुढे ती रंगमंचावर पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली.

‘मतकरी – केंकरे – केंकरे’ या नाटकाच्या फार्म्युल्याला अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री मनवा नाईक यांची हटके भूमिकेची जोड लाभली आणि मल्हार व दिशा या नाट्य संस्थेने त्याला दुजोरा दिला. नाटकाचे शीर्षक ‘काळी राणी’ असले तरी चंदेरी दुनियेचा रंगीबेरंगी माहोल प्रेक्षकांना नाटक पाहायला लावतो, नव्हे गुंतून ठेवतो.

चित्रपटसृष्टी म्हणजे मनोरंजन, चंगळ संस्कृती, झगामगा, दिखावा, स्पर्धा पण याच वलयांकित कलाकारांच्या अंतरंगात डोकावून पाहिले, तर खल-खलबते, कुरघोडी, राजकारण सारे काही यात दडलेले असते. अनेक मुखवटे परिधान करून येथे कलाकार वावरत असतात. जो चातुर्य, चलाखी दाखवतो तो टिकतो. याचा अर्थ समोरचा व्यक्ती कमकुवत आहे, असा अर्थ लावून चालणार नाही. बुद्धिबळाच्या पटावर राणी काही घर चालत असली तरी सावधगिरीही महत्त्वाची. नीरा म्हापसेकर ही युवती प्रसिद्ध अभिनेत्री होण्यासाठी चंदेरी दुनियेत आलेली आहे. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून वावरत असताना स्त्री म्हणून पुरुषाची मर्जी सांभाळली की, यश संपादन करता येते. यावर नीराचा विश्वास. लालजी हे चित्रपट उद्योगातले बढे प्रस्थ आहे. ती त्यांच्या सहवासात येते तेव्हा मोहित मैत्र हा नवलेखन सुद्धा त्यांच्या सान्निध्यात आलेला असतो. या दोघांना लालजी हे अंतर बाह्य पूर्णपणे कळलेले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेता येईल का, या विचाराने नीरा, मोहित मनाने एकत्र आलेले आहेत. काय केले म्हणजे वैभव प्राप्त होईल, यासाठी या दोघांनी केलेली धडपड म्हणजे ‘काळी राणी’ हे नाटक सांगता येईल. एकंदरीत मतकरी यांचा कथा प्रवास लक्षात घेतला तर रहस्य, उत्कंठा वाढवणारी कथा लिहायची तर ती त्यांनीच हे आता वाचकांना कळून चुकलेले आहे. तोच काहीसा अनुभव याही नाटकात येतो. विजय केंकरे यांनी दिग्दर्शक या नात्याने यातल्या मोहित या पात्राला मनोगत व्यक्त करायला लावले आहे. त्यामुळे प्रसंग समजून घ्यायला मदत होते. यात सुद्धा प्रकाशयोजना करणाऱ्या तंत्रज्ञची सतर्कता महत्त्वाची वाटते ही कुशल कामगिरी शीतल तळपदे यांनी केली आहे. साधारण ऐंशीच्या दशकातली ही कथा आहे. रंगभूषा, वेशभूषा, भाषा यांनी ती व्यक्त होतेच पण प्रदीप मुळ्ये यांनी ती नेपथ्यातूनही दिसेल असे पाहिलेले आहे. मंदार चोळकर यांचे गीत आणि अजित परब यांचे संगीत सारे काही दाद देणारे आहे.

डॉ. गिरीश ओक यांनी चित्रपटसृष्टी मुरलेल्या, चंगळ संस्कृतीच्या आहारी गेलेल्या लालजीची भूमिका केली आहे. या लालजीची स्वतःची अशी जीवनशैली आहे. मौजमजा करण्यासाठी वाढलेल्या वयाचे कारण द्यायचे नाही, अशा वृत्तीचा तो आहे. सुवासिक पान, मध्य आणि सोबतीला हिंदी गाणे गुणगुणने असे त्यांचे श्रीमंतीचे जीवन आहे. ओक त्यांनी भूमिकेत ते उत्तमपणे सादर केलेले आहे. हिंदी भाषा या भूमिकेची गरज आहे. ते यात सराईतपणे दाखवतात. मनवा नाईक यांनी नीराची भूमिका यादगार केली. प्रेमातही विविधता असते, हे दाखवणारी ही व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे केली आहे. हरीश दुधाडे यांनी महत्त्वाकांक्षी, स्वार्थी व्यवहार, द्वंद्व अवस्थेतला मोहित प्रभावीपणे दाखवलेला आहे. आनंद पाटील, चंद्रलेखा जोशी यांच्या भूमिका यात पाहायला मिळतात. प्रदीप कदम यांचा कलाकार म्हणून यात सहभाग आहे. प्रलोभनाचा शेवट हा आनंदी असेलच असे नाही, तो अस्वस्थ आणि अस्ताकडेही नेणारा असतो. असा काहीसा विषय ‘काळी राणी’ या नाटकात हाताळलेला आहे. प्रिया पाटील, डॉ. माधुरी नाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

‘काळी राणी’ या नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाचे निमित्त घेऊन नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, दिग्दर्शक एन. चंद्रा, अभिनेत्री अश्विनी भावे, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांना निमंत्रित केले होते. प्रयोग झाल्यानंतर छोटेखानी कार्यक्रमात या सर्व मान्यवरांना रंगमंचावर निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. गिरीश ओक यांनी नाटकात प्रत्येक गाणे हे अर्धवट गायले होते. तेव्हा आता येथे एक तरी पूर्ण गाणे गावे, अशी विनंती एन. चंद्रा यांनी केली. गाणी गाणे हा काही ओक त्यांचा पिंड नाही; परंतु त्यांनी सुरेल आवाजात संपूर्ण गीत सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -