Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजरा तुम दिल को बेहलाओ...

जरा तुम दिल को बेहलाओ…

  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

टी. गोविंदराजन आणि एस. कृष्णमूर्ती यांचा ‘सुरज’ हा १९६६ सालचा सिनेमा. त्याचे दिग्दर्शन केले होते टी. प्रकाशराव यांनी. त्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वात हिट ठरलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा.

‘सिल्व्हर ज्युबिली हिरो’ म्हणून गाजलेल्या राजेंद्रकुमारचा वैजयंतीमालाबरोबरचा हा तिसरा सिनेमा! या यशस्वी जोडीबरोबर होते डेव्हिड, अजित, मुमताज, जॉनी वॉकर, ललिता पवार, आगा, मुक्री आणि ‘दो कलिया’मधून सिनेसृष्टीत लहानपणीच पदार्पण केलेली नीतू सिंग! बालकलाकार म्हणून दिसलेल्या नीतू सिंगबरोबरच या सिनेमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात डेव्हिड या गुणी कलाकाराला प्रथमच चक्क राजाची भूमिका देण्यात आली होती. राजा विक्रमसिंह म्हणून डेव्हिड आणि राजकुमारी अनुराधा म्हणून वैजयंतीमाला यांच्यामधले अब्रार अल्वी यांनी लिहिलेले बाप-लेकीचे प्रेमळ संवाद खूप रंजक होते.

राजेशाही, तिच्यातल्या नाट्यमय घटना आणि राजपुत्र, सरदार यांच्यात झालेल्या तलवारबाजीने रंजक बनलेल्या कथानकात विशेष रंगत आणली होती ती शंकर-जयकिशन यांच्या सुरेल संगीताने! हसरत जयपुरी यांची बहुतेक गाणी खूप लोकप्रिय झाली. यात सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शंकर-जयकिशन यांनी आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्याबरोबरीने शैलेंद्रची दोन गाणी शारदा या दाक्षिणात्य गायिकेला दिली होती. तिच्या अनुनासिक आवाजात ती गाणीसुद्धा त्या काळी लोकप्रिय होती. ‘तितली उडी, उड जो चली…’ आणि ‘देखो मेरा दिल मचल गया, तुने देखा और बदल गया…’ या गाण्यांनी शारदाला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. ‘बिना का गीतमाला’तही ती गाजली.

या सिनेमाला एकूण ३ फिल्मफेअर पारितोषिके मिळाली. ती सर्व संगीताशी संबधित होती. त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर गायक ठरले महम्मद रफी, सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला हसरत जयपुरी यांना आणि सर्वोत्तम संगीतकार म्हणून गौरविण्यात आले शंकर-जयकिशन या त्या काळच्या हुकमी यशस्वी जोडीला!

ज्या गाण्याने सिनेमाला ही अत्यंत प्रतिष्ठित अशी तीन फिल्मफेअर पारितोषिके मिळवून दिली, ते गाणे एका नाट्यमय प्रसंगावर बेतले होते. डाकू असलेला राजेंद्रकुमार जंगलातच राहत असल्याने त्याची वन्य प्राण्यांशी मैत्री झालेली असते. तो राजकुमारीबरोबर असताना मागे राजाचे सैनिक लागल्याने घोड्यावरून पडून बेशुद्ध पडतो. हिरा नावाच्या हत्तीला असे वाटते की, राजेंद्रकुमारला वैजयंतीमालानेच बेशुद्ध केले आहे. त्यामुळे तो तिच्या मागे लागतो. घाबरून, ती जीव घेऊन पळत सुटते आणि एका झाडावर चढते. हत्ती त्या झाडालाच आपले प्रचंड दात लावून ते पाडायला लागतो. ते दृश्य पाहताना खरेच खूप भीती वाटते. तितक्यात राजेंद्रकुमारला जाग येते आणि तो हत्तीला परत बोलावतो. त्यावेळी तो हत्तीचा आणि राजकुमारीचा परिचय करून देतो. तेव्हा हे गाणे होते. महम्मद रफीच्या भावुक आवाजातले हे गाणे अजूनही अनेकांच्या ओठावर आहे. ते कित्येक लग्नात बँडवर वाजवले जाते. तब्बल ५५ वर्षांनंतरही त्याची गोडी आणि लोकप्रियता कायम आहे. त्या गाण्याचे शब्द होते –

बहारों फूल बरसाओ,
मेरा महबूब आया हैं.
हवाओं रागिनी गाओ,
मेरा महबूब आया हैं…

जंगलातून शहरातील राजवाड्यात रात्रीच्या वेळी जाणे शक्य नसल्याने राजकुमारी अर्थात वैजयंतीमाला, सुरजकडे राहणार असते. ती त्याची पाहुणी असते. तिच्या आगमनामुळे खूश झालेल्या राजेंद्रकुमारच्या भावना हसरत जयपुरी यांनी अतिशय तरलपणे गाण्यात गुंफल्या होत्या. सुरजला ‘काय करू आणि काय नको?’ असे झालेले असते.

माझी प्रिया आज प्रथमच माझ्या घरी आली आहे म्हणजे केवढा आनंदाचा क्षण! तो म्हणतो तिच्यावर फुलांचा वर्षाव करा. तिच्यासाठी सुखद अशी गाणी गा. तिच्या गोऱ्या, नाजूक, सुंदर हातांवर फुले चुरून त्यांचीच मेहंदी करून लावा. आकाशातल्या काळ्या ढगांच्या रंगांचे काजळ तिच्या डोळ्यांत हळुवारपणे लावा.

सुखस्वप्नात हरवलेला सुरज पुढे तर आकाशातील चमचमणाऱ्या ताऱ्यांनाही विनंती करतो, ‘तुम्हीच तिच्या केसांच्या भांगात येऊन बसा. तोच तिचा सिंदूर बनू द्या.’
ओ लाली फूलकी मेहंदी लगा इन गोरे हाथोंमें,

उतर आ ए घटा, काजल लगा,
इन प्यारी आँखों में,
सितारों माँग भर जाओ, मेरा महबूब आया हैं…

त्या काळी कथेतले पात्र कुणीही असले तरी गाण्यात मात्र त्याची प्रतिमा अतिशय अभिरूची संपन्न, कलासक्त अशा व्यक्तीची चितारलेली असायची. त्यामुळे टी. प्रकाश राव यांचा हा डाकू असलेला प्रियकर हसरत जयपुरींच्या शब्दांत म्हणतो, “माझी प्रिया खूप लाजाळू आहे. ती लाजून निघून न जावो म्हणून एक मंद प्रकाशाची चादर सगळ्या आसमंतावर ताणून बसवून टाका. आज तुम्हीच तिचे मन रिझवण्याचा प्रयत्न करा” –

नज़ारों हरतरफ़ अब तान दो, इक नूरकी चादर,
बडा शर्मीला दिलबर हैं, चला जाये न शरमाकर.
ज़रा तुम दिलको बहलाओ, मेरा महबूब आया हैं…

गाणे अतिशय रोमँटिक पार्श्वभूमी तयार करून चित्रित केलेले होते. उंच डेरेदार झाडावरून, सुंदर डवरलेल्या फुलांच्या वेलींच्या वेली जमिनीवर लोंबत होत्या. अशाच फुलांचा एक झोका तयार झालेला असतो. वैजयंतीमाला त्या झोक्यावर बसते, हळूच पहुडते. तेव्हा राजेंद्रकुमार जवळ येऊन तिचे केस कुरवाळतो. त्याच्या तोंडी शब्द येतात –

“आज प्रेमाचा हा बिछाना टवटवीत ताज्या कळ्यांनी सजवला आहे. जणू त्यांना माहीतच होते की कधी न कधी माझ्या जीवनात हा प्रेमाचा वसंत ऋतू फुलणार आहे. आता वरून सुंदर रंगांची पखरण होऊ द्या कारण माझी प्रिया माझ्याजवळ आलेली आहे.”

सजाई है जवाँ कलियोंने अब ये सेज उल्फ़तकी,
इन्हें मालूम था आएगी इक दिन ऋतू मुहब्बतकी…
फ़िज़ाओं रंग बिखराओ, मेरा महबूब आया हैं…
बहारों फूल बरसाओ…

प्रियेच्या नुसत्या आगमनाचा असा उत्सव करून टाकणारे गाणे शंकर जयकिशन यांनी असे हाताळले होते की, ते अजरामर होऊन गेले. त्यात रफिसाहेबांनी एक बेधुंद आवाज लावून त्याला मधासारखे गोड करून टाकले होते. प्रेम ही जेव्हा फक्त स्वच्छंदी शृंगारासाठी केलेली नांदी नसायची, तर जगताना साजरा करण्याचा प्रेम हाच मुख्य विषय असायचा तेव्हाच्या या गोष्टी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -