Monday, May 20, 2024
Homeमहामुंबईभारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यास उद्योगांनी द्यावे योगदान

भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यास उद्योगांनी द्यावे योगदान

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन

मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर होता. गेल्या आठ वर्षात पंतप्रधानांनी देशाला पाचव्या क्रमांकावर आणले आहे. आता पंतप्रधानांनी २०३० मध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आणायचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी उद्योगांनी योगदान द्यावे’, असे प्रतिपादन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.

लघू आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिन तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी वांद्रे कुर्ला संकुलातील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे, उद्योग तयार करणे, त्याला लागणारी साधन सामुग्री, आधुनिक मशीनरी उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती तरुण – तरुणींना देण्यासाठी प्रशिक्षण देणे, माहिती देणे, कोणत्या देशात कशाची मागणी आहे, याची माहिती देण्याचे काम सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभाग करत आहे. देशाची प्रगती करायची असेल तर उद्योगधंदे वाढविल्याशिवाय, उत्पादन वाढल्याशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

आपल्या देशात मोठे उद्योजक आहेत. चीनमध्ये अनेक कारखाने बंद झाले. त्या उत्पादनांचे कारखाने साऊथ कोरिया, इंडोनेशिया या देशांनी सुरु केले. ते आता देशभर पुरवत आहेत. चीनचे जे उत्पादन बंद पडले ते आपण घेऊन जिथे चीन उत्पादन पुरवत होते, तिथे आपण मालाची निर्यात केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी उद्योगांना केले. उद्योगांना बँकांकडून अर्थसहाय्य होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत वैयक्तिक अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना दिले.

भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत २०३० मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला पाहिजे. त्यातून अमेरिका, चीन आणि नंतर भारताचा क्रमांक येण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून देशातील प्रत्येक राज्यात जाऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे राणे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योजक हिच माझी लक्ष्मी…

‘जगाच्या पाठीवर भारत महासत्ता व्हावा, जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर यावा यासाठी उद्योगांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्योगांनी प्रगती साध्य केल्यास जगाच्या पाठीवर देशाचे नाव होईल. उद्योगांनी प्रगती केल्यास देश महासत्ता होणे दूर नाही. लक्ष्मी म्हणजे प्रगतीचे एक प्रतीक आहे. पण माझ्यासाठी भारताच्या प्रगतीसाठी उद्योजक हीच माझी लक्ष्मी आहे, असे मी समजतो’, असे राणे यावेळी म्हणाले.

५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी उद्योगांची भूमिका मोठी

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु – मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु, मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -