Friday, May 17, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गजनवादी संमेलनाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ

जनवादी संमेलनाचा ग्रंथदिंडीने शुभारंभ

भजन, फुगडी, चित्ररथांनी वेधले सावंतवाडीकरांचे लक्ष

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाचा भव्य शुभारंभ शनिवारी सायंकाळी शोभायात्रेने शानदारपणे करण्यात आला. ग्रंथदिंडी व भव्य मिरवणुकीतील सहभागी विविध चित्ररथांनी सावंतवाडीकरांचे लक्ष वेधून घेतले. गोवा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील विविध संस्कृतीवर आधारीत आकर्षक चित्ररथ शोभायात्रेत साकारण्यात आला असून या सोहळ्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा समता प्रेरणाभूमी येथून ही शोभायात्रा वाजतगाजत गुरुवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरी आरपीडी हायस्कूल अशी ही भव्य शोभायात्रा विविध चित्ररथांसह काढण्यात आली.

यावेळी जनवादी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, अध्यक्ष संपत देसाई, सचिव अंकुश कदम, कार्याध्यक्ष प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष मधुकर मातोंडकर, मिलिंद माटे, खजिनदार संतोष पाटणकर, रणजित कालेकर, युवराज जाधव, योगेश सकपाळ, कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, प्रा. रुपेश पाटील, कवयित्री प्रा. नीलम कांबळे, प्रा. श्वेतल परब, कवयित्री मंगल नाईक-जोशी, पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांच्यासह आजरा, गडहिंग्लज, गोवा तसेच सावंतवाडी येथील अनेक साहित्य प्रेमी बांधव उपस्थित होते.

या ग्रंथदिंडीत महापुरुषांचे प्रतिबिंब चित्ररूपाने साकारण्यात आले होते. तर तीन चित्ररथांचा यात समावेश करण्यात आला होता. यात ‘इडा पिडा टळो – बळीचे राज्य येवो’ असा संदेश देणारा बळीराजावर आधारित चित्ररथ तर दुसऱ्या चित्ररथात स्त्री मुक्तीचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला तर तिसरा चित्ररथ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारलेला होता. याच बरोबर आजरा येथील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने भजनात तल्लीन होऊन ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भजन गायनाने मिरवणुकीत रंगत आणली.

सावंतवाडी शहरातील आरपीडी प्रशालेच्या भव्य पटांगणात रविवारपासून सुरु होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाची सुरुवात झाली आहे. दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले असून प्रसिद्ध लेखिका व पत्रकार संध्या नरे पवार या संमेलनाच्या अध्यक्षा असून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -