Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीMumbai Air Pollution : चार दिवसांत प्रदूषण आटोक्यात आले नाही तर दिवाळीत...

Mumbai Air Pollution : चार दिवसांत प्रदूषण आटोक्यात आले नाही तर दिवाळीत बांधकामबंदी होणार

दिवाळीत तीन तास फटाके फोडण्याची परवानगी 

मुंबई उच्च न्यायालयाने दिले मुंबई महापालिकेला निर्देश

मुंबई : मुंबईतील प्रदूषणाचे (Mumbai Air Pollution) वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) हा १५० ते २०० तर कधीकधी २०० पार जात आहे. हा निर्देशांक सर्व वयोगटातील व्यक्तींना हवा हानिकारक असल्याचे दर्शवतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारत नसल्याने मुंबई महापालिकेला (BMC) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) चांगलंच धारेवर धरलं. येत्या चार दिवसांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही, तर दिवाळीचे (Diwali) चार दिवस मुंबईतील सर्व बांधकामं थांबवली जातील, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी कोर्टाने प्रशासनाला चार दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यानंतर देखील प्रदूषण कमी झालं नाही, तर बांधकामबंदी अटळ असेल, अशा शब्दांत कोर्टाने इशारा दिला आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फटाके फोडताना आखून दिलेल्या निर्देशांकांचं काटेकोर पद्धतीने पालन करावं, असंही कोर्टाने सांगितलं आहे.

मुंबईतील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीनुसार,

  • चार दिवसांत प्रदूषण कमी झालं नाही तर बांधकामबंदी अटळ असेल.
  • बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहनं ताडपत्रीने झाकणं बंधनकारक असेल.
  • बांधकामाच्या ठिकाणी पुरेशा उंचीच्या मेटल शीट लावल्या गेल्या आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यास सांगितलं आहे.

मुंबईतील हवेची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. ही कोणा एकाची जबाबदारी नाही तर संपूर्ण यंत्रणेने एकत्रित काम करावं, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. नैसर्गिकरित्या परिस्थिती पूर्वपदावर येईल याची वाट पाहत बसू नका, असं कोर्टाने सांगितलं आहे.

मुंबईत आठवडाभर आधीच सण साजरा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीत फटाक्यांवर (Crackers) बंदी घालायची कोर्टाची इच्छा नाही. मात्र, मोठे फटाके फोडण्यास रात्री सात ते दहा या वेळेतच परवानगी असेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. मुख्य सचिव, एमएमआरडीए (MMRDA), वाहतूक विभाग, मुंबई पोलीस आयुक्त यांनाही प्रतिवादी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

नागरिकांची देखील ही जबाबदारी

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यास केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर नागरिकदेखील जबाबदार आहेत. बांधकामबंदी झाली तरी दिवाळीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे पुन्हा एकदा गुणवत्ता खालावण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या दिवाळीत फटाके न फोडण्याचा संकल्प केला पाहिजे. दिवाळी साजरी करण्याचे अनेक पारंपरिक मार्ग आहेत. त्यासाठी प्रदूषणाला कारणीभूत फटाकेच फोडण्याची गरज नाही. दिवाळीत दिव्यांची रोषणाई केली पाहिजे, तर पुढील प्रत्येक वर्षीची दिवाळी आपल्याला प्रदूषणविरहित साजरी करता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -