नवरात्रीतील नवरंग : चौथा दिवस – नारंगी रंग

नारंगी रंग : चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.

मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा – महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या – त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे [email protected] आणि [email protected] या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.

आई महाकाली ग्रुप
मिनल नर्वेकर
सेन्सो क्रिएशन
किलबिल परिवार (भांडुप-पूर्व)
निसर्ग, लालबाग
प्रतिक्षा नगर सोसायटी सायन
रसिका चंदन गावडे
सरिता सचिन धाडवे (पुणे कसबा पेठ))
पद्मश्री ऐताल
सरोज अरोंडेकर

दिघ्यात नियमबाह्य नळजोडणी

नवी मुंबई ( प्रतिनिधी) : झोपडपट्टी परिसरात १९९५ पूर्वीच्या घरांना काही अटी व शर्थीवर अधिकृत नळ जोडणी मिळत आहे; परंतु दिघा परिसरातील ईश्वर नगर येथील प्रभाग क्रमांक १ व २ विभागातील रहिवाशी नियमबाह्य नळ जोडणी करत आहेत. याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होत आहे. यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ती वसुली करावी, अशी मागणी क्रांती ज्योती सावित्रीबाई महिला विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणपत डोळस यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.

झोपडपट्टी परिसरातील १९९५ पूर्वीच्या घरांचे पुरावे असतील, तर त्यांना अधिकृतपणे नळ जोडणी मनपाकडून दिली जाते. परंतु दिघा, ईश्वर नगर परिसरातील कमीतकमी ५० टक्के नागरिकांनी आजही अधिकृत नळ जोडणी घेतली नाही. हे नागरिक खासगी नळ जोडणी कारागिरला बोलावून मनपाला न घाबरता नियमबाह्य नळ जोडणी करून देत आहेत. त्यामुळे मनपाला नवी मुंबई स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून कोट्यवधी रुपयांचा चुना लागला असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.

अवैध नळ जोडणी घेणारा रहिवाशी वारेमाप पाणी वापरून बिनधास्तपणे जगत आहे. पण, दुसरीकडे ज्यांनी अधिकृत नळ जोडणी घेतली आहे. त्यांनी त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला आहे. तसेच नियमित पाणी देयके भरत आहे. त्यामुळे अवैध नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई करून मागील पूर्णपणे पाणी देयके वसूल करावी, अशीही मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डोळस यांनी केली आहे.

तक्रारींचे आलेले निवेदन पाणी पुरवठा विभागाला पाठवले आहे. तसेच कारवाईच्या सूचना देखील केल्या आहेत. – मनोहर गांगुर्डे, विभाग अधिकारी, दिघा

फटाके विक्रेत्यांकडे लायसन्स नसल्याने पालिकेने बजावली नोटीस

सोनू शिंदे

उल्हासनगर : दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाच उल्हासनगरात वर्दळीच्या बाजारपेठेत फटाके विक्रेत्यांकडे लायसन्सच नसल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे. लायसन्स नसलेल्या या दुकानांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

दिवाळीपूर्वी फटाक्यांच्या दुकानाचे लायसन्स,आग प्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही, याचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, उपअधिकारी कुशवाह यांनी कॅम्प नंबर २ मधील वर्दळीच्या नेहरू चौकात असलेल्या ३ आणि कॅम्प नंबर ४ भाजी मार्केटमध्ये असणाऱ्या एका फटाके विक्री करणाऱ्या दुकानाचे सर्वेक्षण केले. तेव्हा त्याच्याकडे लायसन्स नसल्याची बाब उघडकीस आली असून एकाकडे आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ४ फटाके विक्रीच्या दुकानांना तडकाफडकी नोटीस बजावण्यात आल्याचे मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.

लायसन्स आणि आग प्रतिबंधक यंत्रणा नसणे म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळ असून तो खपवून घेतला जाणार नाही. लायसन्स तत्काळ काढले नाही तर ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार, असा इशारा देखील नाईकवाडे यांनी दिला आहे.

विजेत्या संघाला १२ कोटी

दुबई (वृत्तसंस्था) : टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून, १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उप विजेत्या संघाली किती रुपयांचे बक्षीस मिळणार, याबाबत आयसीसीने घोषणा केली आहे. विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स मिळणार आहेत.

सुपर १२ मधील विजेत्या संघांना बोनस मिळणार आहे. सुपर १२च्या प्रत्येक ३० सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स दिले जातील. तर या टप्प्यात नॉकआउट होणाऱ्या संघांना ७० हजार डॉलर्स मिळतील. राउंड १ मध्ये बांगलादेश, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका देश आहेत. तर आफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्टइंडिज हे संघ सुपर १२ मध्ये आहेत.

टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. २०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. भारतात होणारा टी २० वर्ल्डकप करोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे.

बळीराजाचे कष्ट पाण्यात; परतीच्या पावसाचा धुमाकूळ

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांना मोठा दणका बसला आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस मेघ गजनासह पडत असल्याने कापणीला आलेले भातपीक पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचा सुखाचा घास हिरावला आहे.

पावसामुळे झोपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांना मात्र गहिवरून येत आहे. त्यामुळे या भाताची कापणी करावी कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वषर्भर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पीकवावी की नाही. असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे. कापणीला आलेले भात जमीदोस्त झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मजुरीच्या वाढत्या दरामूळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची भात कापणी लवकरात लवकर करण्याकडे कल आहे. पण मजूर मिळेनासे झाले असून उपलब्ध असलेल्यांचा मजूरीचा भावही चांगलाच वधारला असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाचा वाढलेला धोका पाहता मजूरी वाढीसाठी अडून बसलेल्या मजुरांना विनंत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

निलेश राणेंचा शिवसेनेला झटका

मुख्यमंत्र्यांचा पायगुण!

कुडाळ (प्रतिनिधी) : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत परतून काही तास उलटत नाहीत तोच माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री शनिवारी सिंधुदुर्गात येऊन गेले. म्हणूनच हा धक्का दिला आहे. ही तर सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांवर अनेक लोकांचा विश्वास नाही, हे दाखवण्यासाठी कुडाळमधील तीन पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अजूनही अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पक्षप्रमुखांना कोणी किंमत देत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे १०, तर भाजपचे संख्याबळ ८ आहे. वर्षभरापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ ८ वरून ११, तर शिवसेनेचे संख्याबळ १० वरून ७ वर घसरले आहे.

शिवसेना कधी संपेल कळणारही नाही

शिवसेना कधी संपेल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कधीच कळणार नाही. सुरुंग लावला आहे. अनेकजण कुंपणावर आहेत. शून्य आमदारांचे पक्षप्रमुख कधी होतील ते उद्धव ठाकरेंना कळणार देखील नाही. ती वेळ लांब नाही. आज झटका दिला आहे, अजून भरपूर बाकी आहे, असा दावाही त्यांनी केला.

नवाब मलिक, तोंड उघडायला लावू नका

निलेश राणे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. नवाब मलिक आपल्या मतदारसंघात काय करतात. ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत. तुमचा जावई ड्रग्ज केसमध्ये अडकला होता. आज तुम्ही वांद्र्यात कुणाला पण विचारा. नवाब मलिक यांचा जावई ड्रग्ज विकतो, हेच तुम्हाला ऐकायला मिळेल, असा दावा करतानाच शाहरुख खान तुम्हाला हे बोलण्यासाठी पैसे देतोय का? तुम्ही एका ड्रग्ज अॅडिक्टला साथ देत आहात हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

संवादासारखं राहिलं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यात संवाद झाला नाही. त्यावरही त्यांनी मिष्किल भाष्य केलं. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होण्यासारखं काही नाहीच नव्हतं. नारायण राणे मनात ठेवून काही वागत नाहीत. उद्धव ठाकरे कुजक्या मनाचे आहेत. त्याला आमचे साहेब काय करणार? असा सवालही माजी खासदार निलेश यांनी केला आहे.

दुसऱ्या लढतीतही भारत पराभूत

गोल्डकोस्ट (वृत्तसंस्था): भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात १४ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे यजमानांनी ही मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावत १४९ धावा केल्या आणि विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय संघ २० षटकात ६ गडी गमवून १३५ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १४ धावांनी पराभव झाला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली. या सामन्यातही शफालीची बॅट चालली नाही. अवघ्या १ धावसंख्येवर बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांचा भागीदारी केली. जेमिहा रॉड्रिग्स हीच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. ती २६ चेंडूत २३ धावा करून तंबूत परतली. स्मृतीने झुंज सुरुच ठेवली होती. ४९ चेंडूत ५२ धावा करून बाद झाली. त्यानंतर धावगती मंदावली आणि चेंडू आणि धावांचा फरक वाढला. हरमनप्रीत कौर १३, तर पूजा वस्त्रकार ५ या धावसंख्येवर बाद झाली. हरलीन देओल २ या धावसंख्येवर धावचीत झाली.

आघाडीला आलेल्या अलिसा हिली दुसऱ्या षटकात अवघ्या ४ धावा करून बाद झाली. रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर ऋचा घोषने तिचा झेल घेत तिला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लानिंग या जोडीनं डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ४४ असताना लानिंग बाद झाली. १४ या धावसंख्येवर असताना राजेश्वरीच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाली. त्यानंतर आलेली गार्डनरही जास्त काळ मैदानात तग धरू शकली नाही. अवघी एक धाव करत तंबूत परतली. असं असताना बेथ मूनीने एकाकी झुंज सुरुच ठेवली. एलिस पेरी ८ धावा करून बाद झाली. बेथ मूनी ४३ चेंडूत ६१ धावा करून राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर बाद झाली. या खेळीत तिने १० चौकार मारले.

ड्रग्ज प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील अमली (ड्रग्ज) पदार्थांच्या पार्टी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नबाव मलिकांची आदळआपट का सुरू आहे? कारण तो खान आहे, सुशांतसिंह राजपूत नाही. खान आडनाव असल्यामुळे तो पीडित आहे का? सुशांतसिंह राजपूत हिंदू होता म्हणून तो व्यसनाधीन झाला काय?, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणी राजकारण आता वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणात एक खान अडकल्यामुळे मलिक त्याची दखल घेताहेत, असे राणे यांचे म्हणणे आहे.

कोळसाटंचाईचे संकट गडद

मुंबई (मुंबई) : कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.

वापर काटकसरीने करा

ग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

उद्यापासून सर्वसामान्य साधणार थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून पुन्हा भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचे भाजप पक्षाने जाहीर केले आहे.

उद्यापासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. कार्यकर्ते आणि सामान्यांच्या समस्या सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.