Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL 2024गुजरातची विजयी सलामी

गुजरातची विजयी सलामी

५ विकेट राखून चेन्नईचा केला पराभव

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : मोहम्मद शमी, राशीद खान आणि अल्झेरी जोसेफ यांची दमदार गोलंदाजी त्याला मिळालेली शुभमन गिलच्या अर्धशतकाची जोड या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट आणि ४ चेंडू राखून पराभूत करत आयपीएलच्या १६व्या हंगामात विजयी सलामी दिली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सने बरी सुरुवात केली. वृद्धीमान साहाने १६ चेंडूंत २५ धावा तडकावल्या. साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने शुभमनच्या जोडीने संघाची धावसंख्या शतकाजवळ नेऊन ठेवली. या क्षणाला गुजरातचे पारडे जड वाटत होते. परंतु कर्णधार हार्दिक पंड्या झटपट बाद झाला आणि ६३ धावांची खेळी खेळणाऱ्या शुभमनने विकेट गमावल्याने गुजरातचा संघ अडचणीत सापडला. विजय शंकरने २७ धावांचे योगदान देत गुजरातला विजयासमीप आणले होते. शेवटी राहुल तेवतिया आणि राशीद खान यांनी नाबाद राहत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. मराठमोळ्या रुतुराज गायकवाडने चेन्नईतर्फे सर्वाधिक धावा जमवण्याची कामगिरी केली. त्याने ५० चेंडूंत ९२ धावांचे योगदान दिले. त्यामुळे चेन्नईला ७ फलंदाजांच्या बदल्यात १७८ धावा करता आल्या. गतविजेत्या गुजरातने सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सवर दबाव ठेवला. मोहम्मद शमीने देवॉन कॉनवेला अवघ्या एका धावेवर बाद केले. त्यानंतर रुतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईच्या धावसंख्येला आकार दिला. या जोडगोळीने चेन्नईला अर्धशतक पार करून दिले.

मोईन अली बाद झाल्यावर रुतुराज गायकवाडला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे धावांची गती जरी वाढत असली तरी फलंदाज मैदानात थांबतच नसल्याने चेन्नईला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा ही मधली फळी स्वस्तात परतली. त्यातल्या त्यात शिवम दुबे (१९ धावा) आणि महेंद्रसिंह धोनी (नाबाद १४ धावा) यांनी त्यातल्या त्यात बरी खेळी खेळली. गुजरातच्या मोहम्मद शमी, राशीद खान आणि अल्झेरी जोसेफ यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. जोश लिट्टलने एका फलंदाजाला माघारी धाडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -