Friday, May 17, 2024
HomeगुढीपाडवाGudi Padwa 2024: नवचैतन्याचा गोडवा, आला गुढीपाडवा! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि...

Gudi Padwa 2024: नवचैतन्याचा गोडवा, आला गुढीपाडवा! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

मुंबई : भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो. ढोल ताशांच्या मिरवणूका, मराठमोळ्या थाटात फेटे घालून निघणारी शोभायात्रा, रांगोळ्या अशी धामधूम सर्वत्र असते. गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. गुढी उभारून नववर्षाचे असं थाटामाटात स्वागत केले जाते. जाणून घेऊया गुढीपाडव्याची तिथी मुहूर्त आणि शुभ योग.

धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे, या तिथीला आणि सणाला विशेष असे महत्व आहे. गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते. त्यामुळे, या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa 2024 shubh Muhurt)

यंदा देशात ९ एप्रिल, मंगळवारी गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल. चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल, सोमवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी ९ एप्रिलला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे, यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी ९ तारखेला सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते १० वाजून १७ मिनिटांपर्यंत पुजेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता.

गुढीची पूजा कशी करावी?

  • गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करून प्रार्थना करावी.
  • ज्या जागेवर गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करावी. घर स्वच्छ करावे.
  • गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी, घर फुलांच्या माळेने सजवावे.
  • घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे.
  • गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी.
  • त्यावर हळदी-कुंकू लावावे. आता एका कलशावर हळदी-कुकंवाच्या मदतीने स्वास्तिक काढावे.
  • नंतर त्यावर रेशमी कापड गुंडाळावे. त्यावर फुलांचा हार, साखरेची गाठी लावावी आणि कडुनिंबाचा पाला गुंडाळावा.
  • त्यानंतर, हळदी-कुंकू,अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. अगरबत्ती, धूप लावावे. त्यानंतर, नारळ फोडावा.
  • गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.
  • उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याची ही परंपरा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -