Sunday, June 16, 2024
Homeताज्या घडामोडीघाटकोपर होर्डिंग प्रकरणाचा दुर्घटनेचा एसआयटी करणार तपास

घाटकोपर होर्डिंग प्रकरणाचा दुर्घटनेचा एसआयटी करणार तपास

जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू, मृतांची संख्या १७वर

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा नाहक जीव गेला. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या एसआयटीच्या पथकामध्ये एकूण ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे या पथकाचे नेतृत्व करणार आहेत.

एसआयटीने मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या निवासस्थानी तपास करून तेथून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यांची विविध बँकांमध्ये एकूण ७ बँक खाती आहेत. भिंडे यांना होर्डिंगचे कंत्राट कसे मिळाले? त्यांनी किती कमाई केली याचाही तपास पोलीस करत आहेत. एसआयटीने भावेश भिंडे यांच्या कंपनीतील काही अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.

काही कागदपत्रे जप्त- गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे एसआयटी प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंगचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ कोटी रुपये लागतात. त्यामुळे आरोपी भावेश भिंडे यांच्या व्यवसायाची आर्थिक बाजू तपासली जात आहे. होर्डिंग लावण्याची परवानगी कोणी दिली? प्रमाणपत्रे कोणी दिली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलुंड येथील भावेश भिंडे याच्या इगो मीडिया प्रा. लि. च्या कार्यालयातील काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली आहे. एसआयटीचे पथक मंगळवारी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट) येथे पोहोचले. घाटकोपरमध्ये पडलेले होर्डिंग व्यवस्थित लावण्यात आले होते की नाही? हे शोधण्यासाठी पोलिसांना व्हीजेटीआयची मदत घ्यायची आहे. एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती नवी माहिती बाहेर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

दुर्घटनेत जखमी झालेले रिक्षा चालक राजू सोनवणे यांना केईएम रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी, १९ मे रोजी रात्री बारा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढून एकूण संख्या १७ इतकी झाली आहे. राजू सोनवणे हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्याची पत्नी घरगुती काम करते. त्यांच्या मुलाला नोकरी नाही. त्यांनी कर्ज घेऊन बदलापूर येथे घर घेतले होते. मात्र, मृत सोनवणे यांचे कुटुंबीय रमाबाई आंबेडकर नगर येथे राहत असल्याचे त्यांचे नातेवाईक अश्वजित सोनवणे यांनी सांगितले.

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भावेश भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली आहे. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. आरोपी भावेश भिंडे यांच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग उभारले होते. हे होर्डिंग १३ मे रोजी धुळीच्या वादळात पेट्रोल पंपावर कोसळले होते. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान ३०४, ३३८, ३३७ आणि ३४ अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -