Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकांदा दरासाठी शेतकऱ्यांचे सोशल मीडियावर अनोखे कमेंट्स आंदोलन

कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे सोशल मीडियावर अनोखे कमेंट्स आंदोलन

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्युब, व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून नेत्यांचे लक्ष वेधणार

नाशिक (प्रतिनिधी) : कांद्याच्या दरासाठी आता शेतकऱ्यांनी देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेंट्स आंदोलन शनिवारपासून सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी याबाबत माहिती दिली. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

देशातील सर्वच राजकीय नेते व राजकीय पक्ष सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक पेजेस, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्युब, अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून राजकीय नेत्यांकडून विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, सभा, दौरे यांचे फोटो, बातम्या, व्हीडिओज सातत्याने पोस्ट केल्या जातात. राज्यात व देशात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत असून कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सांगितले की, कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असताना राज्यातील नेत्यांचे मात्र सोयीस्कररीत्या कांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांचे कांदाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील व्हीडिओज आणि मेसेजेसजच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला तत्काळ ३० रुपये प्रति किलोचा भाव द्यावा, अशी मागणी करावी आणि वरील मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात, अशी शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे.

कांदा दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी केलेले हे आगळेवेगळे सोशल मीडियावरील कमेंट्स आंदोलनही मोठे प्रभावी ठरेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -