Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखशेतकरी बांधवांनो, ‘रडायचं नाही; लढायचं’

शेतकरी बांधवांनो, ‘रडायचं नाही; लढायचं’

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाच्या गेटवरच सुभाष देशमुख या शेतकऱ्यांने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एका शेतकऱ्याने शोले स्टाइल आंदोलन केले. हे आंदोलन बराच वेळ सुरू होते. त्याच्या विविध मागण्यांसाठी तो टेरेसवर चढला. गेल्या काही वर्षांतील घटना पाहिल्या, तर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आता आत्महत्येसारखे धाडसी पाऊल उचलण्यासाठी विधान भवन किंवा मंत्रालयाच्या परिसरात जागा निवडतात. या घटनांमध्ये अनेकदा बंदोबस्तावरील सुरक्षारक्षकांची भंबेरी उडते. मुंबईत या आधी धर्मा पाटील या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला अनेक कारणे आहेत. त्यावर अभ्यास केला गेला आहे. तरी राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालय परिसरात या घटना घडल्यामुळे, शिंदे सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांकडे आता पुन्हा एकदा लक्ष गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. ‘रडायचं नाही, लढायचं…’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन केले आहे. ‘‘महाराष्ट्र लढवय्यांचा… कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात. म्हणून मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे’’, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांचे आहेत. ‘‘आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश असते. माझे सरकार सतत तुमच्यासोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणे बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधू या आणि आपण मिळून छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया’’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई शहरात एसी ऑफिसमध्ये बसलेल्या व्यक्तीला ग्रामीण भागातील निसर्गचक्रावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची मेहनत याची जाणीव नसते. तरीही हा शेतकरी राजा शेतात कष्ट करतो म्हणून आपल्यापर्यंत अन्नधान्य येते. पण आज हा शेतकरी अडचणीत आला आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, याची भ्रांत त्याला कायम असते. या आर्थिक विवंचनेतून काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा, असे अनेक घटनांतून पुढे आले आहे. तरीही आत्महत्येच्या घटनांची अनेक कारणे आहेत. महाराष्ट्राचा विचार करता बीड जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत तब्बल १६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोसमी शेती करतात किंवा त्यांना मोसमी शेतीवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्यात फळबागा, बागायती, भाजीपाला आदींचे क्षेत्रही तसे बरेच अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिक हे स्थलांतर करतात किंवा ऊस तोड मजूर म्हणून कामाला जातात. पाणीटंचाई आणि वीजटंचाई अशाही गोष्टींचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. या कारणास्तव इथला शेतकरी चिंताग्रस्त असतो.

राज्यातील चार कृषी विद्यापीठ असून यामध्ये अकोल्याच्या विद्यापीठअंतर्गत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. विदर्भात कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. महत्त्वाचा असा भाग आहे की, विदर्भामध्ये पाऊस जास्त असला, तर त्यात कापूस आणि सोयाबीन हे पीक जास्त घेतले जाते, याचे कारण हे नगदी पीक आहे. पैसे देणारे पीक असून खर्चही आहे. त्यामुळे या दोन पिकांखालचे क्षेत्र जास्त व्यापलेले आहे. जर कापसाची लागवड केल्यास ५ ते ६, तर सोयाबीनला ३ ते ४ वेळा फवारणी करावी लागते. साधारणत: हे पीक पाच ते सहा महिन्यांचे असते, ऑक्टोबरपर्यंत पूर्ण तयार होते अन् त्यात अनेक भागांत बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो, कितीही फवारणी केल्यास त्याच्यावर नियंत्रण येत नाही. अशा काळात उत्पन्न कमी होते आणि शेतकरी संकटात सापडतो. यामुळे लागवड ते बियाणे, फवारणी यांसह अन्य खर्चही झालेल्या उत्पन्नातून निघत नाही. त्यात बाजारामध्ये बाजारभाव पण कमी-जास्त होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. या नैराश्यातून शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतात, असे कृषिविषयक अभ्यासकांचे म्हणणे आहे.

वाईट काळ येतो आणि तो काळ निघून जातो. संकटं येतात आणि जातात. शेतकरी बांधवांनो, तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, याची जाणीव कायम असू द्या. तुम्ही खचून न जाता तुमचा तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे. तिचा सकारात्मक विचार करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -