Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

पुणे : ‘नादातूनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम’ या नाम गजरातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध संगीतकार व गायक किशोर कुलकर्णी (Kishore Kulkarni) यांनी वयाच्या ६०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

त्यांच्या निधनानंतर संगीतसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. त्यांची गाणी लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांना देखील आवडत असत. पं. यशवंतबुवा मराठे आणि महंमद हुसेन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेल्या किशोर कुलकर्णी यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन मिळाले. लता मंगेशकर यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास लाभला. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ आणि ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. तर, त्यांच्या रचनांवर आधारित ‘दिन तैसी रजनी’ या कार्यक्रमाचे ते संगीतकार आणि निर्माते होते. स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यावरील रचना कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केल्या होत्या. कवी ग्रेस यांच्या कविता स्वरबद्ध करून त्यावर आधारित ‘ग्रेसफुल’ या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली होती. गेली काही वर्षे ते नवोदितांना संगीत मार्गदर्शन करत असत.

त्यांची भक्तीगीते आजही सकाळी अनेकांच्या घराघरात ऐकायला मिळतात. कवी ग्रेस, सुरेश भट यांच्या कवितांवर ते कार्यक्रम करत असत. ‘मी उदास तू उदास…’ ‘आभाळ जिथे घन गरजे…’‘त्या फुलांच्या गंधकोषी’, ‘प्रतिबिंब गळे की पाणी…’,‘एक मी बंदिस्त पेटे’, ‘आसवांनो माझिया…’, ‘अरण्ये कुणाची…’ ही त्यांनी गायलेली गाणी प्रसिध्द आहेत. त्यांच्या यूट्यूबवर देखील ही सर्व गाणी अपलोड केलेली आहेत

अत्यंत गुणी मित्र आम्हाला कायमचा सोडून गेला – धनश्री

आमचा एक अत्यंत गुणी गायक संगीतकार मित्र आम्हाला कायमचा सोडून गेला. हे स्वीकारणं खूप अवघड जातंय. गेली जवळपास ३०-३२ वर्षांची आमची ओळख आणि गाण्यामुळे झालेली मैत्री. सतत एकमेकांची थट्टा मस्करी करायचो. पण गाणं सुरू झालं की तितक्याच प्रामाणिकपणे गाणे गायचो, समजून घेऊन गाणे, त्याबद्दल बोलताना अगदी गंभीरपणे बोलणे, काही नवे रियाज कळले, तर एकमेकांना आवर्जून सांगणे. हे सतत सुरू असायचे. कितीतरी वेळा आम्ही सुगम संगीत स्पर्धांचे परीक्षण एकत्र केले. जवळपास २५ एक वर्षांपूर्वी श्री यमाई देवीच्या गाण्यांची एक संपूर्ण कॅसेट किशोरच्या आणि माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली होती. तेव्हा त्यात कॅसेटची सुरूवात देवीच्याच एखाद्या श्लोकाने करावी असं आयत्या वेळेस ठरलं, म्हणून देवीचा एक श्लोक किशोरने स्टुडिओत ऑन द स्पॉट संगीतबद्ध केला आणि लगेच माझ्या आवाजात तो रेकॉर्डही केला होता, अशा अनेक आठवणी गायिका धनश्री गणात्रा यांनी व्यक्त केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -