Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजतालुका-जिल्ह्यात प्रायोगिक नाट्यगृहे उभारावीत!

तालुका-जिल्ह्यात प्रायोगिक नाट्यगृहे उभारावीत!

५, ६, ७ जानेवारी २०२४ या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड येथे संपन्न होत असलेल्या १००व्या नाट्य संमेलनात अध्यक्षपदाची सूत्रं डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करताना नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी काही मागणी केली आहे. त्यांच्या भाषणाचा थोडक्यात दै. प्रहारने घेतलेला हा गोषवारा…

विशेष : प्रेमानंद गज्वी, अध्यक्ष ९९ वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन, नागपूर

प्रायोगिक रंगभूमीचं क्षेत्र मुंबई-पुणे सोडून तालुका-जिल्हा पातळीवर विकसित होत आहे. या प्रायोगिक नाटकांसाठी अपेक्षित रंगमंच उपलब्ध नाही. जिल्हा- तालुका पातळीवर २००-२५० आसन क्षमता असलेली प्रायोगिक नाट्यगृहे बांधणे ही काळाची गरज आहे. प्रायोगिक रंगभूमीचा पुढील १०० वर्षांचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नाट्यगृहे बांधणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक रंगभूमीची ही गरज लक्षात घ्यावी. १९०५ साली पहिले नाट्य संमेलन मान, खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाले. आता २०२४ साली शंभरावे नाट्य संमेलन पुणे-पिंपरी-चिंचवड येथे होत आहे. या शंभरही नाट्य संमेलनांचा सविस्तर इतिहास अगदी निमंत्रण पत्रिकांसह लिहिला गेला पाहिजे, तशी व्यवस्था परिषदेनं करावी.

मी, नागपूर येथे संपन्न झालेल्या ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. २२ ते २५ फेब्रुवारी २०१९ या काळात हे संमेलन संपन्न झालं. मी वर्षभर महाराष्ट्रात नाट्य परिषदेच्या शाखांच्या सहकार्यानं १० नाट्य लेखन कार्यशाळा घेतल्या. ३० संहिता वाचल्या गेल्या. मान्यवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि ५ निवडक नाटकांची निवड करून त्या नाटकांचा एक महोत्सव मुंबईत परिषदेच्या वतीनं घेण्यात यावा असे सुचवले. सोबतच वाचलेल्या ३० संहितांवर आधारित एक समीक्षा ग्रंथ सर्व कार्यशाळांना उपस्थित नाटककार पत्रकार महेंद्र सुके यांनी सिद्ध करावा, असेही आम्ही सूचित केलं होतं. पण यातलं काहीच घडलं नाही. याशिवाय वर्षभर आम्ही ७५ कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. तरीही मराठी नाटक कौटुंबिक चौकटीतच अडकून पडलं.

आमच्या कार्यकाळातच शंभरावं नाट्य संमेलन सांगली येथे डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली २५ ते २८ मार्च २०२० या तारखांना आयोजित केलं होतं आणि हे संमेलन मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङ्मयाला वंदन करून सुरू होणार होतं. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि नाट्य संमेलनाध्यक्ष आणि मी तंजावरला जाऊन, सरस्वती महालात सुरक्षित ठेवलेल्या आद्य मराठी नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नाट्य वाङ्मयाला वंदन करणार होतो. आम्ही २५ मार्च २०२० रोजी निघणार होतो पण आदल्याच दिवशी २४ मार्च रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर केले. परिणामी सदर नाट्य संमेलन आणि संमेलनाच्या निमित्ताने वर्षभर होणारे सर्व उपक्रम स्थगित करण्यात आले.

कोरोना संपला, तरीही अनेक कारणांनी स्थगित झालेले नाट्य संमेलन होऊ शकलं नाही. मग परिषदेची निवडणूक झाली. नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. तोपर्यंत २०२० ते २०२३ इतका काळ निघून गेला. आता पुणे-पिंपरी-चिंचवड येथे नाट्य परिषदेचे नवे अध्यक्ष प्रशांत दामले आणि त्यांची नवी टीम यांच्या मार्गदर्शनाखाली ५, ६,७ जानेवारी २०२४ या तारखांना स्थगित झालेले ते १०० वं संमेलन डॉ. जब्बार पटेल यांच्याच अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. ही आनंददायी घटना होय.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर १६७४ साली झाला आणि बरोब्बर दोनच वर्षांनी तामिळनाडूतील तंजावर येथे आणखी एका मराठी माणसाचा राज्याभिषेक सोहळा १६७६ झाला. हा मराठी माणूस म्हणजे शिवाजी महाराजांचा सावत्र बंधू व्यंकोजी भोसले. व्यंकोजी भोसले यांना इ.स. १६७५ साली त्रिचीचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने तंजावरला पाठवले. त्रिची आणि व्यंकोजी या दोघांत युद्ध झाले आणि व्यंकोजींनी त्रिचीचा पराभव केला. पुढं आदिलशहाचा मृत्यू झाला आणि व्यंकोजींनी स्वतःचा १६७६ साली राज्याभिषेक सोहळा करवून घेतला. अशा या व्यंकोजींना पत्नी दीपांबिकापासून तीन पुत्र झाले. शाहराज, सरफोजी, तुकोजी. शाहराज (जन्म १६७०) हा हुशार आणि कल्पक होता. त्याची हुशारी पाहून व्यंकोजींनी शाहराज चौदा वर्षांचा असतानाच १६८४ साली त्याचा राज्याभिषेक केला. त्यानंतर व्यंकोजींचं १६८७ सालीच निधन झालं. खरं तर १६८४ सालापासूनच शाहराज नाटकं लिहू लागला होता. पण ते इतरांना फारसं माहीत नव्हतं. इ. स.१६८४ ते१७११ या काळात शाहराजनं बावीस मराठी, वीस तेलगु, तीन हिंदी, एक संस्कृत, एक तामिळ अशी विपुल नाट्य रचना केली. ‘पंचभाषाविलास’ हे नाटक तर मराठी, तेलगु, तामिळ, हिंदी, संस्कृत अशा पाच भाषांमध्ये लिहिले आहे. हे तर अलौकिक भाषा प्रतिभेचंच लेणं होय.

अशा या अलौकिक मराठी नाटककाराचा सन्मान अ. भा. मराठी नाट्य परिषद तर करीलच; पण महाराष्ट्र शासनानंही दहा लाख रुपये रोख रकमेचा भरीव असा, ‘आद्य मराठी नाटककार शाहराज राजे भोसले, जीवन गौरव पुरस्कार’ दरवर्षी एका बुद्धिवंत, ज्ञानवंत नाटककारास द्यावा अशी विनंती आणि मागणी आम्ही करीत आहोत. आद्य नाटककार शाहराज राजे भोसले यांनी १६९० साली ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे पहिलं मराठी नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीचा पाया घातला गेला. म्हणून मराठी नाट्य परिषदेनं आद्य नाटककार शाहराज राजे भोसले यांच्या नावे नाटककारांसाठी, ‘नाट्य जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करावा.

तसेच ‘व्यावसायिक रंगभूमी, पुरस्कार’ नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावे सुरू करावा. जोतीबा फुले यांनी १८५५ साली, ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहिलं आणि मराठी रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीचा पाया घातला, म्हणून नाटककार जोतीबा फुले यांचे नावे, ‘प्रायोगिक नाट्यलेखन पुरस्कार’ सुरू करावा. काशीबाई फडके यांनी १८८७ साली, ‘संगीत सीताशुद्धी’ हे नाटक लिहिले. हे एका स्त्री नाटककारानं लिहिलेलं पहिलं मराठी नाटक होय आणि म्हणून नाटककार काशीबाई फडके यांच्या नावे, ‘स्त्री नाट्यलेखन पुरस्कार’ सुरू करावा. या चारही मागण्या नाट्य परिषदेनं मान्य केल्या, यासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.

संमेलनाच्या अध्यक्षानं मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी वेगळं काम करावं अशी अपेक्षा आहे. त्यासाठी फक्त एक लाख रुपयांचा निधी ठेवलेला आहे, ही रक्कम फारच कमी आहे. दहाएक वर्षांपूर्वी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अभिजात भाषेसंबंधी एक अहवाल तयार केला होता आणि महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारला विनंती केली होती की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. पण ते काम होताना दिसत नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारने स्वतःच पुढाकार घेऊन अभिजात मराठी भाषा आणि बोली भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी ही देखील आमची विनंती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -