Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअंधारातही दीपस्तंभ हा जाई तेजाळुनी...!

अंधारातही दीपस्तंभ हा जाई तेजाळुनी…!

आक्रमकता हा नारायण राणेंच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे आणि तीच आक्रमकता त्यांच्या भाषणांमध्ये प्रतीत होत असते. त्यांच्या भाषणात आवाहन असते आणि आव्हान देखील असते. त्यामुळेच शांत आणि रौद्र रसांचे हे रसायन श्रोत्यांना मनापासून आवडते. भाषणादरम्यान आपण काय बोलत आहोत आणि किती मागत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यांच्या बोलण्यात कुठलीही घाई अथवा गोंधळ नसतो. ते ज्या विषयावर बोलतात, त्याचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला असतो.

  • अॅड. उमेश सावंत

संघर्ष असा हा अविरत चाले येथे क्षणोक्षणी… अंधारातही दीपस्तंभ हा जाई तेजाळुनी…!’’ या कवितेच्या ओळी ज्या व्यक्तिमत्त्वाला लागू होतात त्या नारायणराव राणेंचा आज वाढदिवस…!

परिणामांची पर्वा न करणे हा वादळाचा स्थायीभावच असतो. वादळ फायद्या-तोट्याची गोळाबेरीज करून कधीच येत नाही. कालांतराने वादळाचा वेग मंदावतो. पण ते थांबत कधीच नाही. काही काळानंतर पुन्हा रौद्र रूप धारण करून उलथापालथ करण्यासाठी ते सदैव सज्ज असते. महाराष्ट्राच्या राजकारणाने हे वादळ नारायण राणेंच्या रूपात गेली तीन दशके अनुभवले आहे आणि आजही त्या वादळाचा झंझावात तसाच कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मोजक्या मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर शंभू राजेंनीही आपल्या पित्याला साजेसा असा पराक्रम घडवला. तेव्हा हताश झालेला औरंगजेब मोठ्या उद्विग्नतेने आपल्या एका सरदाराला म्हणाला होता -‘‘ ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को…?’’ औरंगजेबाच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की, ‘‘एवढ्या मोठ्या साम्राज्याला आव्हान द्यायची हिंमत या मराठ्यांमध्ये नेमकी कुठून येते…? त्यांना झुकवायचे कितीही प्रयत्न केले तरी ते का झुकत नाहीत…? प्रत्येक वेळी हे लोक संघर्षाच्याच भूमिकेत का उभे राहतात…?’’ या सर्व प्रश्नांची कोणतीही उत्तरे न मिळाल्याने अतिशय हताश होऊन शेवटी त्याच्या तोंडी हे उद्गार आले होते. मला वाटतं औरंगजेबाने नारायणराव राणेंचा राजकीय प्रवास अनुभवला असता तरीसुद्धा त्याच्या तोंडी हेच उद्गार आले असते, इतका उच्च प्रतीचा राजकीय पराकोटीचा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला आहे.

नारायण राणेंनी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला, तेव्हा पूर्वजांची प्रतिष्ठा, पैशाचे पाठबळ, बुद्धिवैभवाचा बडेजाव यापैकी कोणतीही गोष्ट त्यांना लाभलेली नव्हती. तरीही अवघ्या तीस वर्षांत त्यांनी नव्हत्याचे होते करून टाकले. त्यांनी सिंधुदुर्गाच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हा नव्यानेच स्थापन झालेल्या या जिल्ह्यातील जनमानसावर बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्या समाजवादी विचारांचा पगडा होता. समाजवाद्यांबरोबर जिल्हाभरात काँग्रेसची संघटना देखील तितकीच मजबूत होती. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींवर काँग्रेसचीच सत्ता होती. त्यावेळी जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे तितकीशी रुजली नव्हती. काही ठरावीक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा होत्या. त्यांना सारे काही शून्यातून उभे करायचे आहे याची पूर्ण कल्पना होती. अखेरीस नारायण राणे नामक अवलियाने हे आव्हान स्वीकारले आणि या शून्यातूनच शिवसेनेचे भगवे विश्व तळकोकणात निर्माण करून दाखवले. त्यांनी समाजवाद्यांच्या बालेकिल्ल्याला असा काही सुरुंग लावला की, कालांतराने जनता दल हा पक्षच अस्तित्वहीन झाला. त्यांनी शिवसेनेची भगवी संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र रुजवली. जिल्हाभरात शिवसेनेच्या शाखांचे जाळे निर्माण केले. एकेक ग्रामपंचायत, पंचायत समिती जिंकून घेतली. बघता-बघता संपूर्ण जिल्हाच भगवामय झाला आणि सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेवरही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा मानाने फडकला.

नारायण राणेंनी २००५ साली शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला असला तरी शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक त्यांच्या मनामध्ये तसाच कायम राहिला. अन्यथा झालाच तर तो मग कोणत्याही परिस्थितीत सहन करायचा नाही, ही बाळासाहेबांची शिकवण अंगीकारलेल्या त्याच शिवसैनिकाने काँग्रेस पक्ष नेतृत्वाविरोधात दंड थोपटून त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. २००९ साली नारायण राणेंनी काँग्रेस पक्षावर ज्या आवेशात तोफ डागली, ते टीव्हीवर पाहताना दस्तखुद्द शिवसेनाप्रमुखांचेही डोळे अभिमानाने पाणावले असतील. शेवटी तो त्यांच्या विचारांचा व शिकवणुकीचा विजय होता. त्यांनीच आपल्या प्रखर विचारांतून नारायण राणे नामक मातब्बर नेता महाराष्ट्राच्या राजकारणाला दिला होता.

आचार्य विनोबा भावे म्हणायचे की, आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला, तर तो पिण्यायोग्य असतो, गरम तव्यावर पडला तर त्याच अस्तित्वच संपून जातं, कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासाखा चमचम करतो. पण शिंपल्यात पडला तर तो प्रत्यक्ष मोतीच बनतो. थेंब तोच पण कुणाच्या सहवासात येणार यावर त्याच अस्तित्व आणि प्रतिष्ठा अवलंबून असते. जिल्ह्यातील असंख्य राजकीय कार्यकर्ते नारायण राणेंच्या संपर्कात आले आणि त्या प्रत्येकाला त्यांनी मोतीच बनवले. हजारो कार्यकर्ते सोबत बाळगणारे अनेक नेते या महाराष्ट्राने बघितले असतील. पण हजारो कार्यकर्ते घडवणारा नेता या जिल्ह्याने अनुभवला. त्यांच्या परिस स्पर्शाने कित्येकांच्या आयुष्याचे सोने झाले, अनेक संसार उभे राहिले, आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध निर्माण झाले आणि त्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी प्राणपणाला लावून लढू लागले. फक्त कार्यकर्तेच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेशी त्यांची जन्माजन्माची नाळ जुळली. त्यांनी मालवणी माणसाची नस बरोब्बर ओळखली होती. आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीवर कोणतेही संकट आले तरी प्रतिकुल परिस्थितीत त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देत त्यांनी मदत केली. कोणतीही मदत करताना ती व्यक्ती आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे की, राजकीय विरोधक आहे याचा हिशेब त्यांनी कधीच ठेवला नाही. म्हणूनच सर्वसामान्य जनतेला हा नेता फारच थोड्या कालावधीत आपलासा वाटू लागला. मात्र समाजात विचारवंत म्हणून परिचित असणारा एक ठरावीक वर्ग त्यांच्यावर नेहमीच नाराज राहिला. विचारवंतांवर भुरळ पाडणारा बौद्धिक आशय ते आपल्या राजकीय संकल्पनांना कधीच देऊ शकले नाहीत. किंबहुना त्यांना विचारवंतांची कधी फिकीरच नव्हती…! विचारवंतांना इतर अनेक गोष्टीतले कळत असले तरी मानवी जीवनाविषयी ते अनभिज्ञ असतात, हे त्यांनी जाणले होते. राजकारणात वावरणाऱ्या माणसाला मानवी स्वभावाच्या गहन गुंत्याशीच खेळावे लागते. त्यामुळेच राजकारणात विद्वतेपेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची असते. परमेश्वर जर नुसता विद्वान असता तर या जगात गोंधळाशिवाय काहीच घडले नसते. अशा प्रकारे नारायण राणे राजकारणाकडे गेले नाहीत, तर राजकारण त्यांच्याकडे चालून आले.

आक्रमकता हा नारायण राणेंच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे आणि तीच आक्रमकता त्यांच्या भाषणांमध्ये प्रतीत होत असते. त्यांच्या भाषणात आवाहन असते आणि आव्हान देखील असते. त्यामुळेच शांत आणि रौद्र रसांचे हे रसायन श्रोत्यांना मनापासून आवडते. भाषणादरम्यान आपण काय बोलत आहोत आणि किती मागत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यांच्या बोलण्यात कुठलीही घाई अथवा गोंधळ नसतो. ते ज्या विषयावर बोलतात, त्याचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला असतो. त्यांचे विचार स्पष्ट आहेत. ते कधीच मोघम बोलत नाहीत. सगळा खुला मामला असतो. अशा माणसाशी मतभेद झाले तरी त्याच्यावर रागावता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि ते कसं साध्य करता येईल, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. नारायण राणे ध्येयवादी असेल तरी हवेत भरकटणारे नाहीत. आकाशात उडण्याची महत्त्वाकांक्षा असली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ते उभे आहेत. मुळातच नारायण राणे हे नेते आहेत, राजकारणी नव्हेत…! इतर राजकारण्यांपेक्षा छक्केपंजे करून राजकारण करणे त्यांना जमत नाही. त्यांच्या संपूर्ण राजकारणाचे एकाच वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास प्रचारात अतिरेकी, विचारात ध्येयवादी पण आचारात व्यवहारवादी असेच करावे लागेल. त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जेव्हा प्रवेश केला तेव्हा ‘मनीऑर्डवर जगणारा जिल्हा’ अशीच सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होती. जिल्ह्यात रोजगारच उपलब्ध नसल्यामुळे जे असंतोषाचे पीक फुलारून आले होते, त्याचे नारायण राणे हा धगधगता धुमारा होता. रोजगाराविना आलेल्या प्रचंड गरिबीमुळे अर्धपोटी उपाशी राहिलेल्या तरुणांच्या पोटात नैराश्येचे इंधन खदखदत होते आणि याच तरुणांना त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून साद घातली. त्यांच्या भाषणात असलेला प्रामाणिकपणा, सच्चाई, वेदना, परिपूर्णता यांनी मालवणी माणसाच्या मनाचा अचूक वेध घेतला. विकल आणि विफल जनमानसाला अशाच बेभान नेतृत्वाची आस असते. सिंधुदुर्गाच्या भवितव्याला कलाटणी देण्याचे सामर्थ्य एकट्या नारायण राणेंपाशीच आहे, असे मानणारा एक वर्ग तयार झाला. दहा भ्याड विचारवंतांपेक्षा विरोधकांशी त्यांच्याच भाषेत बोलू शकणारा भडक माथ्याचा माणूस अधिक कार्य करून जातो. त्यामुळे नारायण राणे जिल्ह्याला लवकरात लवकर विकासाच्या शिखरावर नेऊन पोहोचवतील याची अनेकांना खात्री पटली आणि त्यांनी आपले भवितव्य त्यांच्या हाती मोठ्या विश्वासाने सुपूर्द केले.

Behind every successful person there is a woman…! नारायण राणेंच्या जीवनात देखील निलमताई पत्नी म्हणून आल्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला निलमताईंनी मनापासून प्रोत्साहन दिले, सहकार्य दिले, जुळवून घेतले. मुलांची, घराची पूर्णपणे जबाबदारी घेतली. त्यांच्या व्यवसायाचे फार मोठे साम्राज्य कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या सांभाळले. त्यांच्या आनंदात, दु:खात, निराशेत, पराक्रमात त्यांनी तितकाच सहभाग दाखवला. दादांनीही त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या. एकमेकांची मने आणि जीवितप्रवाह एकमेकांत सर्वस्वी एकरूप झाले. If I love you and thine,will you sacrifice all for me and be mine…? असे त्यांनी न विचारताच करून दाखवले. निलमताईंच्या जीवनातील ते सूर्य झाले आणि त्या त्यांची रोहिणी बनल्या. त्यांना एकमेकांचे, शब्दावाचून कळले सारे, याचा सुखद अनुभव येत गेला. दादा ताईंचे सहचर बनले आणि त्या त्यांच्या सहचारिणी बनल्या. त्यांच्या श्वासाचे प्रबंध झाले… ते अविभिन्न एकात्म झाले. राजकारणासाठी नारायण राणेंएवढीच किंमत निलमताईंनीही मोजली. त्यामुळेच नारायण राणे उत्तरोत्तर यशाची शिखरे पादाक्रांत करू शकले.

असीम इच्छाशक्ती हेच माणसाचे खरखुरे सामर्थ्य असते. जे सैनिक केवळ स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार करतात ते कधीच लढाई जिंकू शकत नाहीत. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना नारायण राणेंनी राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहिले, यातच त्यांची असीम इच्छाशक्ती दिसून येते. त्यांनी फक्त हे स्वप्न पाहिलेच नाही, तर या एका स्वप्नासाठी ते आपले संपूर्ण आयुष्य जगले. आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. राजकारण आणि युद्ध म्हटलं की जय-पराजय हे त्याचे अविभाज्य घटक आहेत. अशावेळी महत्त्वाचे असते ते कोणत्याही पराभवानंतर खचून न जाता, पुन्हा त्याच ताकदीने नवीन युद्धाला सामोरे जाणे…! फार कमी जणांना ही गोष्ट जमते. त्यामुळेच एखाद-दुसऱ्या पराभवानंतर राजकीय पटलावरून नामशेष झालेल्या नेत्यांची संख्या जास्त आहे. पराभव झाल्यानंतरही जखमांचे भळभळते घाव घेऊन राजकारणाच्या कुरूक्षेत्रावर जो नेता त्याच ताकदीने पुन्हा उभा राहतो त्यालाच खरा ‘जातिवंत राजकारणी’ म्हणतात. पराभव मान्य करून युद्धातून सपशेल माघार घेणे ही गोष्टच अशा नेत्याला कधीच मान्य नसते. त्यामुळे कितीही लढाया हरल्या तरी अंतिम युद्धात मीच विजयी होणार या ईर्ष्येने तो योद्धा लढत राहतो, या ईर्ष्येतूनच त्याला लढण्याचे नैतिक बळ मिळत राहते व सरतेशेवटी आपल्या याच लढाऊ बाण्यामुळे तो योद्धा अक्षरश: विजयश्री खेचून आणतो. गजलसम्राट सुरेश भटांच्या शब्दांत नारायण राणेंचे वर्णन करायचे तर ‘पटले न जगाशी माझे, साऱ्यांना नडलो आहे… मजलाच अचंबा वाटे, मी कैसा घडलो आहे…’ असेच करावे लागले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे एखाद्या कुरूक्षेत्राप्रमाणे आहे आणि ते मात्र लढवय्या योद्धाला साजेशा अशा अाविर्भावात आजही लढत आहेत. रणजित देसाईंच्या ‘राधेय’ कादंबरीत ‘‘मी योद्धा आहे… जखमांची भीती बाळगून पळायंच नाही… जन्माबरोबर सुरू झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे… त्यातच माझ्या जीवनाच यश सामावल आहे…!’ असे सांगणारा मृत्युंजय कर्ण नारायण राणेंच्या राजकीय प्रवासाला तंतोतंत लागू पडतो. आज त्यांच्या वाढदिवशी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो अशीच त्यांच्याचरणी प्रार्थना करतो.

(लेखक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -