Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीBaba Ramdev Patanjali : माफी मागितल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेवांना खडसावलं!

Baba Ramdev Patanjali : माफी मागितल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेवांना खडसावलं!

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पतंजलीच्या (Patanjali) उत्पादनांसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी पतंजली आयुर्वेदला फटकारले होते आणि योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांना हजर होण्यास सांगितले होते. हे दोघेही आज सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर दोघांनीही न्यायालयाकडे बीनशर्त माफी मागितली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा रामदेव बाबांना सुनावलं आहे.

जाहिरातींच्या प्रकरणात आज बाबा रामदेव स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांनी बिनशर्त माफी मागितली. मात्र, यावेळी न्यायालयाने रामदेव बाबांनी या सर्व प्रकरणात सर्व गोष्टी गृहीत धरल्यावरून त्यांना परखड शब्दांत सुनावलं. सुनावणी वेळी पतंजलीचे वकील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात बोलताना म्हणाले, आमच्या माध्यम विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात गेली. यावर सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीलाच खडसावलं आहे.

न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, “यासंदर्भात आपल्याला माहिती नव्हती असे गृहित धरणे अवघड आहे. हा फक्त शब्दांचा खेळ आहे. पतंजलीने त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आणि आता तुम्ही माफी मागताय?” अशा शब्दांत न्यायालयाने रामदेव बाबांना खडसावलं.

नेमकं प्रकरण काय?

पतंजलीच्या औषधांबाबत रामदेव बाबांनी जारी केलेल्या जाहिरातींमध्ये लोकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आला होता. अॅलोपथी उपचारांविरोधात अपप्रचार व करोना काळात अॅलोपथी औषधांसंदर्भात केलेल्या विधानांवर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेमध्ये तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने १९ मार्च रोजी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व बाबा रामदेव यांना २ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. २१ मार्च रोजी पतंजलीकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या शपथपत्राच्या माध्यमातून पतंजलीने बिनशर्त माफीही सादर केली होती. आज रामदेव बाबा स्वत: न्यायालयात हजर होते. आजही त्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.

गेल्या वर्षीही २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अशा जाहिरातींबद्दल पतंजलीला खडसावलं होतं. मात्र, त्यानंतरही ४ डिसेंबर रोजी पुन्हा पतंजलीकडून एका इंग्रजी दैनिकात अशाच प्रकारची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्यावरून न्यायालयाने बाबा रामदेव व पतंजली व्यवस्थापनाला आजच्या सुनावणीत फैलावर घेतलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -