Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखइंग्लंड, न्यूझीलंडचे दमदार ‘कमबॅक’

इंग्लंड, न्यूझीलंडचे दमदार ‘कमबॅक’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या तीन महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मालिका खेळल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेची अॅशेस सीरिज सुरू आहे. बांगलादेशचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेशी त्यांच्या घरच्या मैदानावर दोन हात करत आहे. या मालिकांमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने खेळ उंचावताना सुरेख पुनरागमन (कमबॅक) केले आहे. मालिका गमावली तरी प्रतिस्पर्ध्यांचा विजयी वारू रोखण्याची हिंमत इंग्लिश संघाने दाखवली. ‘होमग्राऊंड’वर आम्ही खेळ उंचावू शकतो, हे किवींनी (न्यूझीलंड) दाखवून दिले. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळ उंचावून त्यांना त्यांच्या पाठिराख्यांसमोर हरवण्याची किमया साधणार का, याची उत्सुकता आहे.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत सलग तीन सामने गमावल्याने इंग्लंड संघाची सर्वत्र छी थू झाली. तीन सामन्यांनंतरची ३-० अशी विजयी आघाडी पाहता सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स आणि सहकाऱ्यांचे पारडे जड होते. मात्र प्रत्येक सामना नवा असतो. प्रत्येक मैदान नवे असते आणि दोन्ही संघ नव्याने सुरुवात करत असतात. अशा वेळी मागील सामन्यांतील कामगिरी फारशी महत्त्वाची नसते. त्या आधारे केवळ अंदाज बांधले जाऊ शकतात. सिडनी क्रिकेट मैदानावर उतरलेल्या ज्यो रुट आणि सहकाऱ्यांसमोर केवळ सलग चौथ्या विजयाची नामुष्की टाळण्यासह खेळ उंचावून मालिकेत पुनरागमनाचे आव्हान होते. पहिल्या डावातील धावांचा डोंगर तसेच १२२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी पाहता ऑस्ट्रेलिया संघ सलग चौथा विजय नोंदवणार, असे चित्र दिसत होते.

३८८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा बिनबाद ३० धावा करणाऱ्या इंग्लिश संघासमोर शेवटचा आणि पाचवा दिवस खेळून काढण्याचे चॅलेंज होते. आपल्या खेळपट्ट्यांवर अचूक मारा करणारे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज निर्धास्त होते. मात्र, तो दिवस (९ जानेवारी) यजमानांचा नव्हता. त्याबरोबर इंग्लंडचे नशीब जोरावर होते, असेही म्हणावे लागेल. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाच्या नऊ विकेट पडल्या होत्या. एक विकेट शिल्लक राहिल्याने कांगारूंचा सलग चौथा विजय थोडक्यात हुकला. मात्र, त्याच्या हुकलेल्या विजयापेक्षा इंग्लंडच्या जिगरबाज खेळाचे विशेष कौतुक आहे. त्यांनी दिवसातील ९८ षटके (ओव्हर्स) खेळून काढले. सलग तीन सामने गमावलेल्या पाहुण्या संघाने हार मानली नाही.

सलामीवीर झॅक क्रावलीसह कर्णधार ज्यो रुट, बेन स्टोक्स आणि जॉनी बेअर्स्टोसह तळातील जॅक लीच तसेच स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन या शेवटच्या जोडीने मैदानावर थांबून राहताना प्रतिस्पर्ध्यांचा मारा खेळून काढलेले धाडस निश्चितच उल्लेखनीय आहे. मालिका हरले तरी ‘व्हाइटवॉश’ टाळल्यामुळे इंग्लंड संघाने चाहत्यांची मने जिंकली आहे.
न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध मायदेशात खेळली गेलेली दोन सामन्यांची १-१ अशी बरोबरीत सोडवली. वास्तविक पाहता पहिल्या सामन्यात यजमानांना ८ विकेटनी मात खावी लागली होती. पहिली-वहिली आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या किवींविरुद्धचा बांगलादेशचा विजय विक्रमी ठरला. मात्र दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत आहे. याचे क्रेडिट यजमान संघाला जाते. दुसऱ्या आणि अंतिम कसोटीत टॉम लॅथमचा संघ डावाने विजयी झाला. न्यूझीलंड संघाने एकदाच बॅटिंग करताना पाचशेपार धावा केल्या. त्यात सलामीवीर, कर्णधार लॅथमचे द्विशतक आणि तिसऱ्या क्रमांकावरील डेवॉन कॉन्व्हेचे शतक मोलाचे ठरले. फलंदाजांच्या मजबूत पायावर गोलंदाजांनी कळस चढवला आणि बांगलादेशला दोनदा बाद करत तीन दिवसांत विजयावर नाव कोरले.

भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करतोय. विजयी सलामीनंतर पाहुण्या संघाच्या गोटात आनंद होता. १-० अशी आघाडी भारताला दक्षिण आफ्रिकन भूमीत दुर्मीळ मालिका विजयाची संधी चालून आली होती. मात्र, आघाडीचा आनंद फार काळ टिकला नाही. भारताची फलंदाजी कागदावर मजबूत असल्याचा प्रत्यय दुसऱ्या कसोटीमध्ये आला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात छोटेखानी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात अचूक मारा करताना विजयाच्या दिशेने झेप घेतली. पावसाने व्यत्यय आणला तरी त्यांचा आत्मविश्वास खचला नाही. पावसाचे सावट कायम असताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने चौथ्या दिवशीच मॅच संपवण्याची दाखवलेली जिगर प्रशंसनीय आहे. त्याला रॉसी वॅन डर तसेच अन्य सहकाऱ्यांनी दाखवलेली साथही तितकीच महत्त्वाची ठरली.

जोहान्सबर्गमध्ये झालेली दुसरी कसोटी जिंकून यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघांमधील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीला मंगळवारपासून (११ जानेवारी) सुरुवात झाली आहे. विजयाने भारावून जायचे नाही. तसेच पराभवाने पूर्णपणे खचून जायचे नाही, हे अॅशेससह न्यूझीलंडविरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजयांनी दाखवून दिले. दुसऱ्या कसोटीतील पराभवातून बोध घेत भारताचे क्रिकेटपटू केपटाऊनमध्ये खेळ उंचावतील का, याची उत्सुकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -