Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीEknath Khadse : एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात!

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात!

वेळेत दंड भरला नाही तर मालमत्तेचा होणार लिलाव; गिरीश महाजन यांनी दिली माहिती

जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची सर्व मालमत्ता (Property) शासनाने आपल्या ताब्यात घेतली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना १३७ कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावण्यात आला. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा दंड दिलेल्या मुदतीत भरला नाही तर शासनाने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा लिलावही (Auction) केला जाऊ शकतो, अशी शक्यताही गिरीश महाजन यांनी वर्तवली. यामुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत.

एकनाथ खडसेंनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेऊन, त्यातून मुरूम उत्खनन केले. मात्र, त्यांनी रॉयल्टी भरली नाही, कोट्यवधी रुपयांचा मुरूम विकला, सगळा पैसा काळया मार्गाने घेतला. त्यांनी याबाबत रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. म्हणून त्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याबाबत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे. ३५ कोटी रुपयांचा दंड तातडीने त्यांना भरावा लागणार होता. मात्र, त्यांनी तो भरला नाही म्हणून त्यांची सगळी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उदाहरण

पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, “सत्ता असली की आपलं कोणी वाकड करू शकत नाही आणि गेली की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन नालायक कसे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खडसेंच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई जेलमध्ये जाऊन आला. स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उदाहरण आहे. खडसे नेहमी इतरांच्या भष्टाचार संदर्भात बोलतात, मात्र खडसे हे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, आता त्यांना भोगावे लागत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.

जे पेरले तेच उगवणार

आपण स्वच्छ असू तरच इतरांना त्रास द्यावा आणि छळ करावा. आपण असे असतांना इतरांकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे राहतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता होती तेव्हा आमच्यावर मोका लावला होता, खोटे गुन्हे दाखल केले होते. आम्ही तर असे काही केलेही नव्हते. आता त्यांनी उत्तर द्यावे की त्यांनी मुरूम कुठे टाकला. जे पेरले तेच उगवणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

खडसे निवडणूक लढवू शकतील का?

खडसेंकडे सरकारी फी बाकी असल्याने त्यांना निवडणूक लढता येईल का, हे निवडणूक आयोग ठरवेल. कारण ग्राम पंचायतीची फी बाकी असली तरी निवडणूक लढता येत नाही, मात्र आपला कायद्याचा अभ्यास नाही, असे म्हणत खडसे यांच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवारी वरच बोट ठेवत महाजन यांनी टीकास्त्र सोडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -