Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजEk Tareekh Ek Ghanta : राज्यात उद्या राबवणार 'एक तारीख एक तास'...

Ek Tareekh Ek Ghanta : राज्यात उद्या राबवणार ‘एक तारीख एक तास’ उपक्रम; सहभाग घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

मुंबई : स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ (Ek Tareekh Ek Ghanta) हा उपक्रम येत्या रविवारी म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत.

गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजल्यापासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्रही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.

याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे.

संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -