Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीएखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून जीवघेणा प्रवास टाळा

एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून जीवघेणा प्रवास टाळा

दिवाळीपर्यंतची डेडलाइन; नितेश राणेंचे महापौरांना पत्र

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार नितेश राणे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून, खड्डे तातडीने भरण्याबाबत दिवाळीपूर्वी ठोस पावले उचला. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. एखादा पेंग्विन कमी पाळा. पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला आहे.

मुंबईकरानी गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगरपालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय की, एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असे नितेश यांनी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

कराचा पैसा खड्ड्यात घातला की क्रॉन्ट्रक्टर्सच्या घशात?

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

म्हणूनच आयुक्तांना आमची भीती?

महानगरपालिकेतील सत्ताधारी सेना काँट्रॅक्टरधार्जिणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल, तर लोकशाही मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्चाच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत.

याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही काँट्रॅक्टरच्या संगनमताने सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची आयुक्तांना भीती वाटतेय, असे राणे यांनी नमूद केले आहे. सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवा. अन्यथा, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरू, असं नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -