टाकाऊ औषधांची विल्हेवाट

Share

डॉ. जान्हवी गांगल : मुंबई ग्राहक पंचायत

दिवाळीनिमित्त घराची सफाई करताना जुनी औषधे कचरा म्हणून लोकांनी नक्की फेकली असतील. हा औषधी कचरा वेगवेगळ्या प्रकारांनी सृष्टीचे नुकसान करतो. मागे अमेरिकेत झालेल्या पाहणीतून असे निदर्शनास आले की, मनुष्यवस्तीपासून खूप दूर असून सुद्धा जलाशयातील माशांची संख्या रोडावलेली व वागणूक बदललेली होती. त्या पाण्यात औषधांचे प्रमाण खूप जास्त आढळले. प्रजनन संस्थेवर किंवा मेंदूवर परिणाम करणाऱ्या पाण्यातील औषधांचा हा परिणाम होता.

निसर्गातील या औषधप्रदूषणाची तीन मुख्य कारणे : १) आपण निष्काळजीपणे कचऱ्यात टाकलेला औषध-कचरा, म्हणजेच मुदतबाह्य (expiry date उलटलेली), न वापरलेली-उरलेली, खराब झालेली, टाकाऊ औषधे (गोळ्या, कॅप्सुल्स, पावडरी, ड्रॉपस्, मलमे इ. स्वरूपातील)

२) मनुष्य व प्राणी यांना दिलेली औषधे मलमूत्राद्वारे बाहेर पडून सांडपाण्यात मिसळतात.

३) औषध कारखाने व रुग्णालयातील नकोशी झालेली औषधे नियमानुसार प्रक्रिया न करता किंवा पुरेशी प्रक्रिया न होता तशीच फेकल्यास.

ही औषधे जमिनीत, पाण्यात मिसळतात व प्रवाहाबरोबर वाहत जाऊन दूरवर जलाशय, समुद्रात गोळा होतात व पाण्याबरोबर मासे इतर जलचरांच्या शरीरात जातात व घातक परिणाम करतात. याच माशांचे आपण सेवन करतो. तसेच जमिनीतील दूषित खत, पाण्यावर वाढलेल्या वनस्पती अन्नरूपात आपण सेवन करतो. अशा प्रकारे आपण टाकलेल्या औषधांचा परत शरीरात शिरकाव होतो. अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य बिघडते, प्रजनन संस्थेच्या समस्या, हृदयविकार, मज्जासंस्थेचे विकार, त्वचारोग, कर्करोग संभवतात. गरज नसताना, नकळत ही औषधे कमी जास्त प्रमाणात आपल्या शरीरात गेल्यास अपाय केल्याशिवाय कशी राहतील? ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध खाल्लेल्या प्राण्यांचे मांस खाल्याने, व्याधीग्रस्त होऊन नामशेष होऊ लागलेल्या गिधाडांचे उदाहरण सर्वांना माहीत आहेच.

औषध-कचरा निष्काळजीपणे टाकण्याचे इतर दुष्परिणाम :

१) चुकून/अनवधानाने खाल्ल्यास लहान मुले, प्राणी यांना विषबाधा

२) अनेक प्रतिजैविके (अॅण्टिबायोटिक्स), पाण्यातून, जीवाणूंच्या संपर्कात आल्यास, ते जीवाणू सावध होऊन त्यावर मात करण्यासाठी, ते आपल्या शरीरात बदल घडवून आणतात. परिणामी अशा प्रतिजैविकांना प्रतिरोध निर्माण होतो.

३) कचऱ्यातील औषधे काही समाजकंटकांच्या हाती लागल्यास, त्यांची वेष्टने बदलून, बनावट औषधे बाजारात आल्यास हानिकारक ठरू शकतात.

मात्र यासंदर्भात सर्वेक्षण करता, ही औषधे पर्यावरणास व पर्यायाने आपल्यालाच घातक ठरू शकतात, हेच बऱ्याच जणांना माहीत नव्हते; तर काहींना जाणीव असली तरी, आपल्याकडील टाकाऊ औषधांचे काय करायचे हे न कळल्याने, ती त्यांनी कचराकुंडीत, नाल्यात टाकली अथवा टॉयलेटमध्ये फ्लश केली. प्रत्येक घरातून थोडासाच औषध-कचरा टाकला तरी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रचंड कचरा जमा होतो.

घराघरातून फेकलेल्या औषध कचऱ्यात खालील प्रकारची औषधे आढळतात : वेदनाशामक, प्रतिजैविके, संप्रेरके (हार्मोन्स) केमोथेरपी, स्टिरॉईड्स, अॅण्टासिड्स, काही रेडिओअॅक्टिव्ह औषधे व इतर.

अनेक विकसित देशांमध्ये औषधांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याच्या नियमांची व पद्धतींची माहिती दिली जाते, त्यानुसार काटेकोरपणे व्यवस्था केली जाते. उत्पादकांना त्यांच्याकडील औषध संबंधित कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असतेच, पण घरगुती स्वरूपातील कचरा वेगळा ठेवून, केमिस्ट, रुग्णालये, शासकीय केंद्रे इत्यादी ठिकाणी सीलबंद खोक्यातून गोळा केला जातो. नंतर हा कचरा काळजीपूर्वक, औषध प्रशासनाच्या देखरेखीखाली जाळून नष्ट केला जातो.

आपल्या देशातही याबाबत जागरूकता निर्माण होत असून, अजून खूप पल्ला गाठायचा आहे. केरळ राज्याने आघाडी घेत, प्रायोगिक तत्त्वावर पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. औषध प्रशासन व केमिस्ट संघटना यांनी एकत्र येऊन नागरिकांचे प्रबोधन केले व काही निवडक केमिस्टकडे सीलबंद खोके ठेवून त्यात नकोशी, मुदतबाह्य औषधे टाकण्यास सांगितले व त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आपले पर्यावरण सुरक्षित व आरोग्यदायी राखण्याच्या दृष्टीने, पुढील गोष्टी करता येतील.

१) विनाकारण, over the counter औषधे घेणे टाळावे.

२) डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आवश्यक तेवढीच विकत घ्या व ती सांगितलेल्या मात्रेत, पूर्णपणे घ्या म्हणजे उरणार नाहीत.

३) आपल्याकडील जास्तीची, सुस्थितीतील, मुदतीतील औषधे, वेळीच काही सेवाभावी संस्था / रुग्णालये यांना दान करा.

४) टाकाऊ औषधे गोळा करून त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करणे.

५) अशी व्यवस्था नसल्यास, औषधे मूळ वेष्टनात न फेकता, स्ट्रीप्स कापून गोळ्या वेगळ्या कराव्यात व वापरलेल्या चहा/ कॉफी पावडरबरोबर मिसळून प्लास्टिक पिशवीत बंद करून टाकावी.

प्रायोगिक तत्त्वावर ठाण्यात ‘आर निसर्ग फाऊंडेशन’ या एनजीओतर्फे ‘स्वच्छता सारथी फेलोशिप’अंतर्गत ‘ग्रीन फार्मसी’ हा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात सामील होणाऱ्या गृहसंकुलांमध्ये ‘ग्रीन बिन’ हे सीलबंद डबे ठेवण्यात आले आहेत. नागरिकही ही जबाबदारी ओळखून या चळवळीला चांगला प्रतिसाद देत आहेत. पर्यावरण व सामाजिक आरोग्य राखण्यासाठी औषध-कचरा प्रदूषणाचे गांभीर्य ओळखून, आपण आपापल्या विभागांत ही चळवळ सुरू करावी. ही काळाची गरज आहे.

mgpshikshan@gmail.com

Recent Posts

पंतप्रधान मोदींना विश्वास, एनडीए ४०० पार करणार

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले. चौथ्या टप्प्यापासूनच वेगवेगळ्या संस्था, संघटना, यूट्यूबवर भाजपाची घसरण…

29 mins ago

अत्त दीप भव

लता गुठे गौतम बुद्धांचे विचार हे अखंड खळखळ वाहणाऱ्या नदीसारखे पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ असे…

59 mins ago

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता……

मंगला गाडगीळ, मुंबई ग्राहक पंचायत इंदिरापूरम, गाझियाबाद येथे ‘लोटस पॉण्ड’ निवासी प्रकल्पाबाबत एका विकासकाने वर्तमानपत्रात…

1 hour ago

लेखक गज आनन म्हात्रे लिखित आगरी भाषा सौंदर्य : ज्ञानेश्वरीतील आगरी शब्दांचा आगर पुस्तकाचे प्रकाशन

नवी मुंबई(प्रतिनिधी)- लेखक, कवी गज आनन म्हात्रे यांनी संशोधनात्मक लिहलेले " आगरी भाषा सौंदर्य :…

4 hours ago

आशियाई देशांत जीवघेणा उन्हाळा! भारतात आठ राज्ये तापली

प्राण्यांचा तडफडून मृत्यू ; अनेक देशांमध्ये शाळा बंद; एल निनोमुळे तापमानात विक्रमी वाढ नवी दिल्ली…

5 hours ago

काँग्रेसचे सरकार सात जन्मात येणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले ठाम मत हरियाणा : "काँग्रेसचे सरकार सात जन्मातही येणार नाही.…

5 hours ago