Share

लता गुठे

गौतम बुद्धांचे विचार हे अखंड खळखळ वाहणाऱ्या नदीसारखे पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ असे आहेत. ज्याप्रमाणे नदी तिच्या शीतल पाण्याने पशुपक्ष्यांची तहान भागवते. ते पाणी शेतीसाठी, झाडांसाठी उपयोगी येते, तसेच माणसाचे जीवन सुजलाम सुफलाम करते. तसेच गौतम बुद्धांनी जे तत्त्वज्ञान सांगितले ते तत्त्वज्ञान माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठीच आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त मांडलेले हे त्यांचे विचार. वैशाख शुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही  पौर्णिमा  बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. जगाला शांतीचा महामंत्र देणारा हा एकमेव धर्म म्हणून ओळखला जातो. म्हणून या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

गौतम बुद्धांचा जन्म लुम्बिनी, नेपाळ येथे इ. स. पूर्व ५६३ मध्ये एका राजघराण्यात झाला. आजूबाजूला सर्व सुख असतानाही त्यांना दुःखाचा शोध का घ्यावासा वाटला? याचे उत्तर शोधताना बुद्धांना जाणून घेऊन त्यांचे तत्त्वज्ञान अंगीकारले पाहिजे. ‘अत्त दीप भव’ हे बुद्धांचे तत्त्वज्ञान मनाशी संबंधित आहे. आयुष्यभर आपण उघड्या डोळ्यांनी जग पाहतो; परंतु स्वतःचा आत्मशोध घेण्यासाठी विपश्यनेचा मार्ग अवलंबला तरंच मानवाला दु:खाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. शाश्वत सुख हे बाह्य जगामध्ये नाही. ते आत्मज्ञानात असून ते प्रत्येकाने स्वतः मिळवावे लागते. म्हणूनच गौतम बुद्ध म्हणतात ‘स्वयंप्रकाशित व्हा.

बुद्धांचे तत्त्वज्ञान हे वास्तव जीवनाशी निगडित आहे. म्हणूनच मला सर्वात जास्त बुद्धांचे तत्त्वज्ञान आवडते. कारण की, ते जातीपातीपलीकडे जाऊन मानव कल्याणासाठी बुद्धांनी निर्माण केले आहे. म्हणूनच जगभरामध्ये बुद्ध धर्माचे अनुयायी आहेत. हा धर्म कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नाही. जगभरातील २०० पेक्षा अधिक देशांमध्ये या धर्माचे पालन केले जाते. त्यापैकी काही महत्त्वाचे देश नेपाळ, भूतान, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आणि लाओस  या देशांमध्ये बौद्ध धर्माचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. म्हणून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हा धर्म आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या धर्मामध्ये कोणतेही थोतांड नाही, कर्मकांड नाही. बौद्ध धर्म हा धर्म आहे जो मानवी कल्याणाचा विचार करणारा आहे.
सिद्धार्थ गौतम  बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पौराणिक कथेनुसार, सिद्धार्थ एक  हिंदू  राजपुत्र होता. ज्याने आध्यात्मिक तपस्वी म्हणून आत्मज्ञान मिळविण्यासाठी आपले स्थान आणि संपत्तीचा त्याग केला. त्यांनी आपले ध्येय गाठले आणि दुःख दूर करण्याच्या मार्गाचा उपदेश केला. इ.स.पूर्व ६व्या/५व्या शतकात भारतात  बौद्ध  धर्माची स्थापना केली.

भगवान गौतम बुद्ध आई-वडील, बायको, संसार सोडून तपश्चर्यासाठी आत्मज्ञानाच्या शोधात घराबाहेर पडले. ध्यानमार्ग आणि तपश्चर्येच्या मार्गाने ज्ञानकेंद्र उघडल्यानंतर जे केंद्राच्या ठिकाणी असलेले बंदिस्त वैश्विक ज्ञान आहे ते अनुभवले तर मानवाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी मदत करू शकते हे गौतम बुद्धांनी जाणले होते. अहिंसेच्या मार्गाने जर आपण वर्तन करू लागलो, तर मानसिक शांती मिळू शकते. प्रेमाने माणूस जग जिंकू शकतो. ‘जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी’ याचा साक्षात्कार त्यांना झाला.

बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा धर्म आहे. या काळात बुद्ध यांना असामान्य गुणवत्ता असलेले, पण मानवदेह धारण करणारेच मानला जात होते. त्यांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत याचे ज्ञान प्राप्त झाले. भगवान सिद्धार्थ यांनी दुःखाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना चार आर्य सत्य सापडली ती म्हणजे… आजूबाजूच्या समाजाचे अवलोकन करत असताना त्यांच्या मनात विचार आला की, सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी लोक करतात? असंतुष्ट विचारामुळे सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव त्यांना झाली. या गोष्टीचा त्यांनी मुळापर्यंत शोध घेतला तेव्हा जर माणसाच्या मनातून हिंसा कमी करायची असेल, तर लोभ, मोह, माया हे विकार दूर करावे लागतील. अतृप्त इच्छा म्हणजेच तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे. हे त्यांनी जाणले आणि ती कोणत्या मार्गाने कमी होऊ शकते याचा शोध घेतला.  दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले ते असे, ज्या गोष्टीला एखादे कारण आहे त्या गोष्टीमागील कारण नाहीसे केल्यास वर्तन बदलू शकते. त्यामुळे सत विचार मनात निर्माण होतात हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो.

तिसरे आर्य सत्य त्यांना समजले ते म्हणजे कोणत्याही दुःखावर मात होऊ शकत असेल, तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यासाठी राजघराण्याचा त्याग करून बुद्ध तपश्चर्यासाठी घराबाहेर पडले आणि अवघ्या जगाला सत्य, अहिंसा आणि करुणा या मानवी कल्याणकारी तत्त्वांची देणगी दिली. म्हणूनच चिरकाल टिकणारे तत्त्वज्ञान महात्मा गौतम बुद्धांनी जगभरातल्या कानाकोपऱ्यांत बौद्ध धर्माच्या मार्फत पोहोचवले. म्हणूनच भगवान गौतम बुद्धांना धर्माचे जनक समजले जातात. ‘अत्त दीप भव’ बुद्धांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं, स्वयंप्रेरित व्हावं असं म्हटलं जातं. हे स्वयंप्रकाशित्व म्हणजे काय? ते कसं व्हावं? कशानं होता येतं? आणि ते आलं नाही,  तर काय होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा.
कुठल्या प्रकाशानं आपण स्वयंप्रकाशित व्हायचं? याचं उत्तर आहे… हा प्रकाश ज्ञानाचा, अनुभवाचा आहे. जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांनी माणूस शहाणा बनतो आणि ते शहाणपण तो इतरांना आपल्या कृती-उक्तीतून सांगत असतो; परंतु या अनुभवाने माणसातील विकार नाहिसे होत नाहीत.

विकार समूळ नाहिसे झाल्याशिवाय प्रकाशाचा मार्ग सापडत नाही. अहंकार, लालसा, असत्य माणसांना अधोगतीकडे घेऊन जातात. आपल्या ठिकाणी असलेले अज्ञान हाच आपला खरा शत्रू आहे. अज्ञानाचा अंधार नाहीसा झाल्याशिवाय प्रकाशाचा मार्ग सापडत नाही. आपल्या ज्ञानाच्या, विकासाच्या दिशाच खुंटतात. असत्याच्या मागे भटकत राहिलं, तर सत्याचा अनुभव कधीच होणार नाही. म्हणूनच बुद्धाने ‘अत्त दीप भव’ हा मंत्र दिला. हाच मंत्र फक्त दुःखाचे निवारण करू शकतो. दुसरा अर्थ म्हणजे माणसाला त्याच्या मर्यादित कक्षेत होणारी ज्ञानाची प्राप्ती. त्या घटनेचा होणारा अनुभव ही या ज्ञानसाधनेतली पहिली पायरी. तो अनुभव ज्या ताकदीचा, ऊर्जेचा, सत्त्वाचा असेल, तर त्या दिव्य प्रकाशाने माणसाच्या ज्ञानाचीही पातळी वाढते. या ज्ञानाच्या अनुभूतीनेच आपण उन्नत होत जातो; परंतु माणसाचा प्रवास अंधारातून अंधाराकडे चाललेला असतो. त्यामुळे त्याला आत्मीक ज्ञानाची अनुभूती होत नाही; परंतु ज्ञानमार्गाचा प्रवास ज्याचा त्यानेच करावा लागतो.

बौद्ध धर्माला मानणारे लोक भारतासह जगभरात विखुरले आहेत. जीवनात ज्ञानाचा प्रकाश हवा असेल आणि जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल, तर महात्मा बुद्धांचे अनमोल तत्त्वज्ञान एकदा नक्की वाचले पाहिजे. माणूस जसा विचार करतो, तसाच तो बनत असतो. जर एखादी व्यक्ती वाईट विचार करत असते किंवा वागत असते, तर त्या व्यक्तीला फक्त दु:खच वाट्याला येते.  म्हणूनच मानवाने शुद्ध विचार, आचार अंगीकारले पाहिजेत. चांगले बोलले किंवा वागले तर त्याला जीवनात आनंद मिळेल. हाच खरा आनंद आहे, जो माणसाची साथ कधीच सोडत नाही. महात्मा गौतम बुद्धांनी म्हटले की, आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला असेल, तर विजय नेहमीच तुमचा असेल.  ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.  गौतम बुद्ध म्हणतात की, माणूस कधीही जन्माने वाईट नसतो तो विचाराने वाईट असतो. म्हणूनच त्यांचे वर्तन वाईट असते.

प्रेमाने जगातील सर्व महान गोष्टी जिंकता येतात.  महात्मा बुद्धांच्या म्हणण्यानुसार, भविष्याची स्वप्ने पाहून निराश होऊ नका. भूतकाळाची आठवण करून पश्चात्ताप करण्यापेक्षा वर्तमानात जगणे केव्हाही चांगले. आनंदी राहण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जसा जळणारा दिवा हजारो लोकांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे आनंद वाटून प्रेम वाढते. बुद्धांच्या मते, आनंद नेहमी वाटून घ्यावा, तो कधीही कमी होत नाही. माणसाने जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दुष्ट मित्राची भीती बाळगली पाहिजे. एखादा जंगली प्राणी भलेही तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, पण वाईट मित्र तुमच्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो. गौतम बुद्धांच्या मते जीवनातील तीन गोष्टी कधीही लपवून ठेवता येत नाहीत. त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये बौद्ध संस्कृतीचा ठसा हा  विहार,  स्तूप,  चैत्य  व  लेण्या  या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवनविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धम्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.
आपण जेव्हा आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपलं जीवन प्रकाशमान करण्यासाठी धडपडतो. ही धडपड ज्याची त्याची आपापल्या परीने असते. या प्रवासात प्रत्येकालाच तर उजळून निघायचं असतं. आपलं उजळणं दुसऱ्याच्या जीवनातला अंधार नाहीसा करण्यासाठी असेल, तर त्याचं फलित म्हणजे आपलं जीवन उन्नत करणे होय. जीवनाचा स्वर्ग करण्याचे सामर्थ्य फक्त बुद्धांच्या तत्त्वज्ञानातच आहे.

Recent Posts

Patana news : गंगा स्नानासाठी १७ भाविकांना घेऊन निघालेली बोट नदीत बुडाली!

१३ जणांना वाचवण्यात यश तर ४ जण बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरु पाटणा : गेल्या काही…

46 mins ago

NCERT : बाबरी मशिदीचा उल्लेख ‘तीन घुमट रचना’, अयोध्या वाद चारवरुन दोन पानांवर!

एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात अनेक मोठे बदल मुंबई : एनसीईआरटीचे (National Council of Educational Research…

1 hour ago

Salman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan)…

2 hours ago

ST Bus : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रशासनाने राबवली ‘ही’ विशेष मोहिम

आता एसटी पाससाठी रांगेत ताटकळावं लागणार नाही मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Bus) बसेसमधून प्रवास…

2 hours ago

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार! कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी शिक्षकांची नियुक्ती

नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने धरला जोर सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा (Sangli Zilla Parishad) अजब…

4 hours ago

Post Office Scheme : आनंदवार्ता! पोस्टाने आणली ‘ही’ भन्नाट योजना

गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे…

4 hours ago